lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > स्तन सैल झाले, ओघळलेत? करा रोज ८ व्यायाम, मिळवा सुडौल फिगर

स्तन सैल झाले, ओघळलेत? करा रोज ८ व्यायाम, मिळवा सुडौल फिगर

स्तन सैल झाले म्हणून आत्मविश्वास गमावू नका, काही सोप्या व्यायामप्रकारांनी तुम्ही नक्की पू्र्वपदावर येऊ शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 08:10 PM2021-11-18T20:10:50+5:302021-11-18T20:24:45+5:30

स्तन सैल झाले म्हणून आत्मविश्वास गमावू नका, काही सोप्या व्यायामप्रकारांनी तुम्ही नक्की पू्र्वपदावर येऊ शकता...

Breasts loose, sagging? Do 8 exercises daily, get curvy figure again | स्तन सैल झाले, ओघळलेत? करा रोज ८ व्यायाम, मिळवा सुडौल फिगर

स्तन सैल झाले, ओघळलेत? करा रोज ८ व्यायाम, मिळवा सुडौल फिगर

Highlightsकधी लठ्ठपणामुळे, कधी ब्रेस्ट फिडींगमुळे तर कधी आणखी काही कारणांनी मुलींचे स्तन सैल पडतात. काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते.

आपण सुंदर आणि फिट असावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. यामध्ये आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच शरीराच्या इतरही घटकांचा समावेश असतो. ताठ खांदे, सुडौल बांधा आपल्या सौंदर्यात नक्कीच भर घालतो. स्तन हाही आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा घटक असतो. पण हे स्तन सैल आणि ओघळणारे असतील तर मात्र आपण पार निराश होऊन जातो.

Image: Google

स्तनांच्या अशा ठेवणीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी ब्रेसियर उशीरा वापरण्यास सुरुवात केल्यामुळे तर कधी लठ्ठपणामुळे, कधी ब्रेस्ट फिडींगमुळे तर कधी आणखी काही कारणांनी मुलींचे स्तन सैल पडतात. एकदा हे स्तन सैल पडले की ते ताठ होण्यासाठी काय करावे आपल्याला कळत नाही. मग नकळत आपण निराश होतो आणि अनेक मुलींमध्ये तर या कारणामुळे आत्मविश्वासही कमी होतो. पण काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते. पाहूयात कोणते व्यायाम केल्याने तुम्ही या समस्येतून स्वत:ला बाहेर काढू शकता...

Image: Google

स्तन सुडौल करण्यासाठीचे उपाय 

१. छातीसाठी व्यायाम सुरु करताना एकदम सुरु न करता सुरुवातीला थोडा वॉर्म अप करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे दोन्ही हात शरीराच्या बाजुनी वर नेऊन एकमेकांना जोडा, म्हणजेच अर्धवर्तुळाकार फिरवा. ही क्रिया थोडी वेगाने करा. त्यामुळे छातीच्या बाजुचे स्नायू आखडले असतील तर ते मोकळे होण्यास मदत होईल. साधारण ५० ते १०० आकड्यांपर्यंत हा व्यायाम करा.

२. हाताची बोटे खांद्याला लावून हात कोपरात फोल्ड करा आणि हात बाहेरुन आतल्या बाजुने फिरवा. यामुळे छातीच्या वरच्या आणि आतल्या स्नायूंचा व्यायाम होईल. हा वॉर्म अप व्यायाम म्हणून तुम्हाला माहित असला तरी स्तनांचा भाग सैल झाला असेल तर तो वर उचलण्यास याची मदत होते. हाच व्यायामप्रकार उलट्या बाजुने म्हणजे आतुन बाहेर फिरवा. असे शक्य तितके जास्त वेळ करा.

३. छातीच्या मध्यभागी दोन्ही हात एकमेकांना जोडा. हाताची नमस्कारासारखी पोज करा. दोन्ही कोपर जमिनीशी समांतर राहतील असे बघा. दोन्ही हाताने ए्कमेकावर जोर द्या. याचा तुमच्या ब्रेस्ट मसलवर ताण येईल. त्यामुळे त्याठिकाणच्या स्नायूंचा व्यायाम होईल. ५ सेकंद ताण द्या, रिलॅक्स करा.

४. नमस्कार पोज करा, पण यामध्ये बोटांपासून कोपरांपर्यंत हाताचा सगळा भाग जोडलेला ठेवा. हे जोडलेले हात वरखाली फिरवा. सुरुवातीला हा व्यायामप्रकार सोपा वाटेल पण नंतर तुमच्या छातीच्या भागाकडे ताण यायला सुरुवात होईल. यामुळे तुमचे स्तनांचे ओघळलेले स्नायू पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

५. हातसमोर घ्या, तळवे एकमेकांकडे राहतील असे ठेवा आणि एकदा डावा हात वर आणि एकदा उजवा हात वर घ्या. यामुळे तुमचे खांदे दुखत असतील तर त्यांनाही आराम मिळेल आणि हाताच्या स्नायूंचाही चांगला व्यायाम होईल.

Image: Google

६. पाय भिंतीपासून बऱ्यापैकी मागे ठेऊन हात भिंतीला टेकवा. आता शरीराचा भाग हातावर जोर देऊन भिंतीकडे न्या. हे करताना नकळत तुमच्या छातीवर ताण येतो आणि येथील स्नायू बळकट होण्यास मदत होते. भिंतीच्या दिशेला गेल्यावर पुन्हा मागे येताना हळूवार या जेणेकरुन छातीच्या भागावर ताण येईल.

७. दोन्ही हात कंबरेच्या दिशेने मागे करा आणि मागच्या बाजूला टाळ्या वाजवायचा प्रयत्न करा. हा व्यायामप्रकार छातीसाठी नसून छातीमुळे किंवा इतर कारणांनी तुमचे खांदे खाली पडल्यासारखे झाले असतील तर यामुळे खांदे ताठ होण्यास मदत होईल. अनेकदा खांदे पुढच्या बाजुला झुकलेले असतात, या व्यायामामुळे हे प्रमाण कमी होईल. यामध्ये प्रत्यक्ष टाळ्या वाजल्या नाही तरी चालेल.

८. दोन्ही हातांच्या मुळी वळा आणि एकमेकांच्या बाजुने दोन्ही हात गोल फिरवा. यामुळे छातीचे स्नायू वर येण्यास मदत होईलच पण तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल. हा व्यायामप्रकार वेगाने करा, ज्यामुळे तुम्हाला याचा खरा फायदा होईल.
 

Web Title: Breasts loose, sagging? Do 8 exercises daily, get curvy figure again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.