Join us
Daily Top 2Weekly Top 5

5 मिनिटात 5 व्यायाम.. घरच्या घरी हे व्यायाम करा आणि मिळवा जिमसारखा फिटनेस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 12:53 IST

प्रसिध्द अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनर असलेल्या यास्मिन कराचीवाला यांनी पाच मिनिटात पाच व्यायामाचा एक व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर टाकला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. कराचीवाला सांगतात की पाच मिनिट पाच प्रकारचे व्यायाम केल्यास पोटांच्या , मांडीच्या आणि नितंबाच्या स्नायूंचा व्यवस्थित व्यायाम होतो. जिमसारखा फिटनेस मिळतो.

ठळक मुद्देपोट, कंबर, मांडी आणि नितंबावरची चरबी कमी करण्यासाठी घरच्या घरी प्रत्येकी एक मिनिटाचे पाच व्यायाम करावेत.हे व्यायाम करताना मधे थांबू नये. सलग करावेत तरच अपेक्षित परिणाम दिसतात.सलग पाच मिनिटं पाच व्यायाम करण्यासाठी जिमला जाण्याची आणि खूप वेळ काढण्याची गरज नाही.

  फिट अन दिवसभर मस्त उत्साहित राहायला कोणाला आवडणार नाही? अनेक महिलांची हीच इच्छा असते. पण फिट राहायचं तर मग जिमला जावं लागतं आणि त्यासाठी वेळ काढणं अवघड. मग फिट राहाण्याची इच्छा पूर्णच होत नाही. पण फिट राहाण्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही आणि खूप वेळ काढून व्यायाम करण्याचीही गरज नाही. पाच मिनिटात पाच व्यायाम प्रकार आपलं फिट राहाण्याचं, पोट मस्त सपाट असण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात. प्रसिध्द अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनर असलेल्या यास्मिन कराचीवाला यांनी पाच मिनिटात पाच व्यायामाचा एक व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर टाकला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. कराचीवाला सांगतात की पाच मिनिट पाच प्रकारचे व्यायाम केल्यास पोटांच्या , मांडीच्या आणि नितंबाच्या स्नायुंचा व्यवस्थित व्यायाम होतो. पोट, कंबर, मांडी आणि नितंबावरची चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत.पाच मिनिटात पाच व्यायाम

  • टक इन क्रंच

पाठीवर झोपावं. दोन्ही हात डोक्याच्या वर न्यावे, गुडघे वाकवावेत आणि दोन्ही पाय वर उचलावेत. दोन्ही हात खाली आणावेत आणि डोकं उचलून वर उठावं, गुडघे छातीच्या जवळ न्यावेत आणि पुन्हा पाठ जमिनीवर टेकवावी आणि हात वर डोक्याच्या दिशेने न्यावेत. पाय गुडघे दुमडलेल्या अवस्थेत ठेवून जमिनीला टाचा टेकवाव्यात. हा व्यायाम पूर्ण एक मिनिट सलग करावा.

  •  सिंगल स्ट्रेट लेग स्ट्रेच

पाठीवर झोपावं. उठताना डोक्यापासून खांद्यापर्यंतचा भाग हवेत अंधांतरी ठेवावा, कंबर जमिनीला टेकलेली असावी. मग दोन्ही पाय जमिनीपासून थोडे वर हवेत उचलावेत. दोन्ही पाय वर ९० अंशात ठेवावे. आधी डावा पाय आणखी वर नेत सरळ करावा. दुसरा पाय ९० अंशातच ठेवावा. पाय वर सरळ करतान हाताने पकडावा. मग तो पाय सोडून उजवा पाय वर सरळ न्यावा आणि त्याला हातानं पकडावं, ड़ावा पाय खाली न ठेवता ९० अंशातच ठेवावा. हा व्यायाम न थांबता एक मिनिट सलग करावा.

  • प्लँक टिक टॉक

प्लँकच्या अवस्थेत यावं. म्हणजे पालथ झोपून दोन्ही हातांवर बळ देत उठावं. त्याच अवस्थेत राहावं. पहिले डावा पाय बाजूला न्यावा मग तो जागेवर ठेवून उजवा पाय बाजूला न्यावा. त्याला साइड किक करणं म्हणतात. हा व्यायाम करताना नितंबावर भार पडणार नाही याची काळजी घ्यावी. हा व्यायाम सलग एक मिनिट करावा.

  •  सिंगल लेग वी अप

पाठीवर सरळ झोपावं. हात डोक्याच्या वर सरळ ठेवावेत. मग खांदे उचलून वर यावं हात एक पाय वर उचलून पायाच्या खाली न्यावे. या अवस्थेत पायाची स्थिती व्ही शेपसारखी होते. मग पुन्हा पाठ जमिनीला टेकवावी , हात डोक्याच्या दिशेने सरळ न्यावेत. खांदे उचलून वर यावं, दुसरा पाय वर उचलून हात पायाच्या खाली न्यावेत. सलग एक मिनिट हा व्यायाम करावा.

  • सीटेड क्रॉस बॉडी ट्विस्ट

यासाठी सरळ बसावं आणि पायही सरळ ठेवावेत. मग दोन्ही हात डोक्याच्या मागे नेऊन पकडावेत. पाय गुडघ्यात थोडे वाकवावेत. दोन्ही पायात अंतर ठेवावं. नंतर आपला उजवा पाय छातीपर्यंत न्यावा आणि शरीराचा वरचा भाग विरुध्द दिशेनं न्यावा. यात शरीराची क्रॉस बॉडी पोजिशन होते. असाच व्यायाम दुसऱ्या पायानेही करावा. सलग एक मिनिट हा व्यायाम करावा.हे पाच प्रकारचे व्यायाम न थांबता पाच मिनिट केल्यास जिममधे न जाता आणि व्यायामाला खूप वेळ न देताही फिट राहाता येतं.