साडी ही भारतीय स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला उठाव देणारी, पारंपरिक आणि तरीही आकर्षक अशी वेषभूषा आहे. पण काही वेळा थोडं पोट सुटलेलं असल्यामुळे अनेकजणी साडी नेसणे टाळतात. साडीतून पोट दिसेल का, असे विचार मनात येतात. (Simple tricks can help you to look slim in saree, belly fat won't bother you )मात्र योग्य पद्धतीने साडी नेसली आणि काही सोप्या पण स्मार्ट टिप्स लक्षात ठेवल्या तर सुटलेलं पोट अजिबात दिसत नाही, उलट शरीराचा आकार अधिक सुंदर दिसतो.
सर्वप्रथम, साडीचा रंग आणि कापड निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गडद रंगाची साडी जसे काळा, निळा, तांबडा, गडद हिरवा किंवा जांभळा हे रंग नेहमी शरीराला सडपातळ दाखवतात. हलक्या रंगांच्या साड्या किंवा मोठे फुलांचे प्रिंट असलेल्या साड्या पोटाचा भाग ठळक करुन दाखवतात, त्यामुळे त्या टाळाव्यात. तसेच, मऊ आणि शरीरालगत बसणारे कापड जसे की जॉर्जेट, क्रेप किंवा शिफॉन यांची साडी घेतल्यास ती शरीराला नीट बसते आणि आकार अधिक सुबक दिसतो.
साडी नेसताना बेंबीच्या थोडी वर घट्ट नेसावी. यामुळे साडीचा पदर आणि प्लेट्स नीट बसतात आणि पोटाचा भाग झाकला जातो. पदर नेहमी थोडा सैल ठेवून हातावर सोडल्यास साडी जास्त सुंदर दिसते तसेच दंड जाड दुसत नाही. पोटाचा भाग सहज लपतो. जर साडीवर सुंदर बॉर्डर असेल तर तो हातावरचा पदर अधिक आकर्षक दिसतो आणि लोकांचं लक्ष पोटाकडे जात नाही. साडीखाली शेपर वापरणे हा आजकालचा सर्वात प्रभावी उपाय आहे. शेपर शरीराला योग्य आकार देतो, पोट आणि कंबर घट्ट धरतो आणि साडी परिपूर्ण शरीराच्या आकारात बसवतो. विशेष म्हणजे साडी शेपर आरामदायक असतात आणि दिवसभर घातले तरी त्रास होत नाही. कंबरपट्टा हा एक आधुनिक पण उपयोगी उपाय आहे. तो फॅशनचा भागही आहे. कंबरेजवळ बांधलेला कंबरपट्टा कंबरेवरील फॅट्स लपवतो. उलट ते जास्त आकर्षक दिसतात. त्यामुळे साडी व्यवस्थित दिसते आणि स्टाइलिश लूक येतो.
तसेच, ब्लाऊजचा कट आणि लांबीही महत्त्वाची भूमिका बजावते. थोडा लांब, कॉर्सेट स्टाइल लांब हातांचा ब्लाऊज निवडल्यास पोटाचा भाग झाकला जातो आणि शरीर छान आकारात दिसते. याशिवाय, साडी नेसताना आत्मविश्वास महत्त्वाचा घटक आहे. साडी कशी दिसेल याची काळजी न करता, आत्मविश्वासाने ती नेसल्यास व्यक्तिमत्त्व अधिक खुलते. हसतमुख राहून, सरळ पोश्चरमध्ये साडी नेसल्यास शरीर आपोआप आकर्षक दिसते.