The exit which hurt the mind | मनाला चटका लावणारी ती एक गोष्ट
मनाला चटका लावणारी ती एक गोष्ट

-गिरिजा मुरगोडी


एका सकाळी व्हॉट्सअँप ग्रुपवर मैत्रिणीनं नीलिमा पालवणकर यांची पुस्तकांबद्दलची कविता पोस्ट केली. त्या कवितेसोबत अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या.
या कवितेचं मॅजेस्टिकनं केलेलं छानसं पोस्टर मला बहिणीनं, माझ्या पुस्तक प्रकाशनानिमित्त आलेली असताना भेट दिलं होतं. माझ्या पुस्तकाच्या कपाटावर मी ते लावलं होतं. गोव्यात दरवर्षी होणा-या  महिला साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेची कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकरनं ते पाहिलं. कविता वाचली. काहीशा व्यग्र मनस्थितीत असताना तिला ती खूप भिडली. त्याचवेळी आमची त्या वर्षीच्या संमेलनाबाबत चर्चा चालली होती.  मग कविसंमेलनाच्या अध्यक्ष म्हणून नीलिमा पालवणकर यांनाच बोलवूया असं सुचलं. त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी तिनं माझ्यावर सोपवली.
नंतर फोनवर नीलिमाताईंशी या कवितेबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल, लेखनाबद्दल अशा बर्‍याच गप्पा झाल्या. त्यांनी मान्यता दिली. संमेलनासाठी त्या गोव्याला आल्या. ओळख झाली. वाढली आणि नंतरही अनेकदा त्यांचे फोन येत, गप्पा होत. पुस्तकांबद्दल, कवितांबद्दल, त्यांच्या गायनाच्या छंदाबद्दल. अनेक. छान वाटत असे. 
अलीकडेच एका कॉलेजमधील कार्यक्रमाच्या भाषणात मी ही कविता वाचून दाखवली, त्यावर भाष्य केलं. ‘वाचू आनंदे’ नावाच्या उपक्रमातील एका सत्रात वाचनाबद्दल बोलताना ही कविता वाचली. दोन्हीकडे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांनाही ती खूप आवडली. तिथल्या मराठी विभागासाठी त्या पोस्टरचे झेरॉक्सही काढून दिलं. हेही सगळं आठवलं. 
गेल्या काही दिवसांपासून नीलिमाताईंना फोन करावा असं पुन: पुन्हा मनात येत होतं. 
खूपच दिवसात, महिन्यात की वर्षात कोण जाणे त्यांचा फोन नव्हता. मीही काही घरगुती व्यापात 1-2 वर्षं बुडालेली होते आणि अशा ओळखी अनेकदा कालांतराने पुसटही होतात. 
जो-तो आपापल्या व्यापात असतोच, मग हळूहळू संपर्क कमी होत जातो.
त्या दिवशी मनात आलं त्यांना फोन करावा आणि त्यांच्या कवितेला कॉलेजमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सगळं सांगाव, आनंद होईल त्यांना. म्हणून त्यांना फोन लावला सकाळीच. कारण फार विचार करत बसलं की कधी कधी नंतर राहूनच जातं. 
लॅण्डलाइन नंबर होता, त्यावर केला. कोणी उचलला नाही. म्हटलं, कामात असतील वा गाणं, बागकाम, बाजारहाट असं काही असेल चाललेलं. 
मग तास-दीड तासानं पुन्हा केला. बराच वेळ वाजत राहिला. वाटलं गावाला वगैरे गेलेत की काय?.. बघूया पूर्ण रिंग वाजून होईपर्यंत मग ठेवू असा विचार करत होते इतक्यात फोन उचलला गेला. त्यांचे पती बोलत होते. ‘हॅलो..’ मी म्हटलं, ‘नमस्कार, कसे आहात? नीलिमाताई आहेत का?’ किंचितशा त्रासिक स्वरात ते म्हणाले, ‘कोण बोलताय तुम्ही?’ मग लक्षात आलं, अरे लॅण्डलाइनवर केलाय आपण आणि नाव वगैरे सांगितलंच नाही..’ मग दिलगिरी व्यक्त केली आणि नाव आणि कुठून बोलतेय वगैरे सांगितलं. 
ते एकदम म्हणाले ‘हां. हां.. बरं बरं, सांगा..’ मी म्हटलं ‘नीलिमाताई आहेत का? खूप दिवसात बोलणं नाही झालं..’
क्षणभरच पलीकडे अगदी शांतता. आणि अगदी खालावल्या स्वरात उत्तर आलं.
‘त्यानं निधन झालं, दीड वर्षापूर्वी..’
बाप रे! प्रचंड धक्का बसला.. इतकं कानकोंड वाटलं. इतक्या संमिर्श भावनांचा कल्लोळ माजला क्षणभरात मनात. शब्द सुचेनात. सुन्न झाले, काय बोलू आता?
‘सॉरी.. मला काहीच कल्पना नव्हती.. क्षमस्व..’ एक-दोन क्षण गेले तसेच.. मग त्याविषयीचे जुजबी तपशील विचारले. ‘हार्ट अटॅक .. मॅसीव्ह.. काहीच करता आलं नाही. अवधीच मिळाला नाही..’
हे कळल्यावर त्याबद्दल आणखी बोलणं नको, त्रास होईल त्यांना, असं वाटलं, त्याचवेळी ते सावरून घेत म्हणाले.
‘बरं, काही कार्यक्रम वगैरे आहे का पुन्हा..’ मग सांगितलं..कविता..व्हॉॅट्सअँप, कॉलेज, विद्यार्थी, प्रतिक्रिया.. हे सांगण्यासाठी..’
माझ्या या सांगण्यातला निर्थ त्याचवेळी आकळत गेला आणि आपोआपच माझं बोलणं मंदावलं.. ते म्हणाले, ‘अहो कालच साठेंचा फोन होता याच कवितेबद्दल आणि तिच्या आणखी कविता वाचण्याबद्दल. तर तिच्या पंधरा कविता मी नुकत्याच फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. वाचायला मिळतील पाहा तुम्हाला..’
मला हे सगळं ऐकताना काय वाटत होतं सांगताच येत नाहीये.
किती अनिश्चित असतं सगळं.. आपल्याला माहीतही असतं. पण किती बाजूला सारत असतो आपण हे माहीत असणं. अनपेक्षितपणे सगळं संपून जातं आणि जो चटका लागतो जिवाला तो विलक्षण असतो!

(लेखिका गोव्याच्या साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत)

gmmurgodi@gmail.com

Web Title: The exit which hurt the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.