Every child is creative, but when? | प्रत्येक मूल सृजर्नशील असतं पण ते कधी?

प्रत्येक मूल सृजर्नशील असतं पण ते कधी?

- रती भोसेकर

सृजनशीलता. नवनिर्मिती क्षमता. जी निसर्गाच्या चराचरात दिसते. आपणही तर निसर्गाचाच भाग आहोत. 
 ही सृजनशीलता मग आपल्या सगळ्यांमध्ये नैसर्गिक असते का? 
- अर्थात त्याचं उत्तर लगेचच मनात येतं ते म्हणजे नाही. चाकोरीबाहेर विचार करून निर्मिती करणं याला आपण बहुधा सृजनशीलता असं म्हणतो. त्यामुळे आपल्या मते सृजनशीलता ही आपल्यापैकी काही जणांनाच लाभलेलं ईश्वरी देणं आहे. पण सहजशिक्षण अभ्यास प्रवासात समजत आहे की हे खरं नाही. सहजशिक्षणाचा अभ्यास असं सांगतो आणि  त्या अनुषंगानं मुलांच्या वागण्याचं निरीक्षण करताना जाणवतं, सृजनशीलता ही नैसर्गिक देणं आहे आणि ती सगळ्यांमध्येच असते. मोकळं वातावरण मिळालं की ती आपल्या प्रत्येकामधून आपसूक बाहेर येते. याबाबत भिन्न वर्तणूक असलेल्या मुलांची उदाहरणं मला आठवतात.
उदाहरण एक
केदार. वय वर्ष पाच-सहा. गोरापान, नाक बसकं डोळे मोठे मोठे काळेभोर आणि हसरे. बघता क्षणीच कोणालाही आवडावा असा. पण वर्गात अजिबात ऐकत नाही, सर्वाना त्रास देतो अशा त्याच्याबद्दल तक्रारी होत्या. एके दिवशी त्याचे पालकही त्रस्त होऊन मला भेटायला आले. घरातील त्याच्या कारनाम्यांची बरीच मोठी यादी होती. टीव्हीची काच फोडली, गॅसचा पाइप कापत होता असं बरचं काही. अभ्यास तर अजिबातच करत नव्हता. दोघंही हवालदिल झाले होते. तेव्हा माझे एकीकडे सहजशिक्षण वर्गाचे प्रयोग सुरू होते. मी त्याच्या बाईंना म्हटलं, ‘आता त्याला आजपासून माझ्याकडे सहजशिक्षण वर्गात पाठवा. बघू या काय होतय ते.’ आई-वडील दोघांनाही म्हटलं, ‘मी जरा बघते आणि मग तुमच्याशी बोलते. तोर्पयत त्याला मारू वगैरे नका.’ कारण बाबा त्याला मार देत होते, असं त्यांच्या बोलण्यातून आलं.
त्यानंतर तो माझ्या वर्गात यायला लागला. इतका हसरा होता की, याच्यामुळे आई-वडील आणि बाई त्रसल्या असतील अशी शंकाही येत नव्हती. तो      त्याचं त्याचं काम करायचा. मला आणि  त्याच्याबरोबरच्या मुलांना अजिबात त्रास देत नव्हता. एकदा ढुर ढुर असा तोंडानं आवाज काढत तो इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या हातात काहीतरी होतं. मी त्याच्या न कळत, काय आहे पाहू लागले आणि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. त्या टाकावू सामानात एक मोडकी बाटली, चार्जरची वायर, असं बरचं काही होतं. त्यापासून त्यानं एक डास मारण्याचा फवारा सोडतात तसंच दिसणारं एक यंत्र तयार केलं होतं. ते पाठीवर लावून आणि वायर लावून बाटलीच्या   भोकातून तो फवारा सोडल्यासारखा आवाज करत फिरत होता. किती अफाट सृजनशीलता होती ती. हळूहळू लक्षात आलं, तो दरदिवशी काहीतरी वेगळंच करत असे. साधं मातीकाम असलं तरी याची निर्मिती वेगळीच असायची. बरं मी बघावं, छान म्हणावं वगैरे अपेक्षाच नाही. कारण त्याला कोणी छान म्हणण्याची सवयचं नव्हती. त्यामुळे मला काही दाखवायला यायचा प्रश्नच नव्हता. त्याच्या निरीक्षणातून जाणवत होतं की त्याच्यामध्ये भरपूर नवनिर्मितीची क्षमता आहे.  त्यास वाव मिळणं नुसतंच आवश्यक होतं असं नाही तर ती त्याची आंतरिक गरजही होती. ती रोजच्या वर्गात आणि घरात, मोकळीक न मिळाल्यानं पूर्ण होत नव्हती आणि बहरत नव्हती. त्याचा विपरीत परिणाम तोडफोड आणि मारामारीत होत होता. 
उदाहरण दोन
ती दोघं काही मस्तीखोर वगैरे ख्याती असलेल्या मंडळींपैकी नव्हते. बाई जे देतील ते निमुटपणो ऐकण्याच्या सवयीचं झालेल्या मुलांपैकी होते ते. पण धडपडवर्गात मिळालेल्या मोकळिकीनं त्यांच्यातील सृजनशीलता नक्कीच फुलली असं म्हणता येईल. एकेदिवशी मुलांच्या सामानात शिंप्याकडून आणलेल्या भरपूर चिंध्या होत्या. मुलांचं वर्गभर पसरलेल्या सामानाबरोबर काम सुरू होतं. आमच्या त्या वर्गात मोठी जिम्नॅस्टिकची मॅट होती. जवळ जवळ आठ फूट लांबीची आणि पाच फूट रुंदीची. निळी निळी. त्या मॅटवर दोघांनी मिळून चिंध्यांचं मोठे कोलाज तयार केलं होतं. त्यामध्ये चिंध्यामधून एक मोठा उंट, त्या उंटाच्या जवळ एक मोठ्ठं झाड तर  काही अंतरावर एक पाण्याचं डबकं असं  होतं. लांबून बघताना ते अगदी निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्व्भूमीवर साकारलेलं  उंट चालण्याचं चित्र दिसत होतं. आम्ही सगळेच अवाक् झालो होतो. ज्या जोडीनं ही कामगिरी केली होती, त्यांच्याकडे ताईनं त्यांच्या न कळत हळूच बोट दाखवलं. इथेही एवढी भव्य निर्मिती हातून झाली तरी कुठल्याही  वाह वाहची अपेक्षा न बाळगता दोघे दोन वेगळ्या कामात गर्कही झाले होते. 
वरील दोन्ही उदाहरणं नक्कीच मला विचार करायला लावणारी ठरली. एरवी सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हीटी ही एखाद्याचीच मक्तेदारी असते, ती     प्रत्येकाकडे तर अजिबातच नसते, कधीकधी तर ती शिकवलीही जाते या आणि यासारख्या अनेक विचारांनी मी वेढलेली होते. किंबहुना आपण वेढलेले असतो. पण सहजशिक्षणामुळे या अशा विचारांचा पाया हलला आहे.
सृजनशीलता माझ्यात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे आणि सर्वत्र आहे. फक्त तिची रूपं वेगवेगळी आहेत. गरज आहे ती तिला वाव मिळेल अशा मोकळ्या वातावरणाची. ते मात्र आपल्याला मिळायला हवं. तसंच मुलांभोवती असं वातावरण राहील याची दक्षता घेऊन, त्यास बाधा न आणण्याची आपली ताकद आपल्याला वाढवायला हवी हे मात्र नक्की.

(लेखिका सहज शिक्षण केंद्राच्या संचालिका आहेत.)

smtpps123@gmail.com

 

 

Web Title: Every child is creative, but when?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.