do yourselves.. This is real happiness for childeren. | करून बघण्याचा आनंद मोठे मुलांपासून का हिरावून घेतात?

करून बघण्याचा आनंद मोठे मुलांपासून का हिरावून घेतात?

- रती भोसेकर
मूल कसं शिकतं’ या विषयातील तज्ज्ञ आणि मार्गदर्शक जीनन यांच्या मार्गदर्शनानं जेव्हा शाळेत काम सुरू झालं, तेव्हा त्यांच्या प्रत्येक विचारामधून दिव्य साक्षात्कार झाल्यासारखं वाटत होतं. आपलं मूल धाडसी असेल, दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असेल तर एक पालक म्हणून आपल्याला याचा नेहमीच अभिमान वाटतो. किंबहुना एक माणूस म्हणून घडताना, धाडसी असणं, जबाबदारी स्वीकारणं आणि ती समर्थपणो पार पाडणं हे कौतुकपात्र गुण मानले जातात. तसंच एखादं जिवाला धोका किंवा इजा होण्याची शक्यता असणारं काम स्वीकारणं आणि अत्यंत काळजीपूर्वकरीत्या पार पाडणं ही एक धाडसाची कृती मानली जाते. त्यासाठी एक प्रकारची जबाबदारी स्वीकारावी लागते. नेमकं काय करायचं, कशी आणि कोणती दक्षता घ्यायची, याची जाणीवपूर्वक आखणी करावी लागते. एकदा का ते काम नीट पार पाडलं तर आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावरचा विश्वास तर वाढतोच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपला आपल्यावरचा विश्वास वाढतो. 
मुलांचं हे अशा प्रकारचं घडणं साध्य करायचं असेल तर त्यांना त्यांच्या वयाला अनुसरून धाडसाचे, ख-या कामाचे अनुभव द्यायला     हवेत. त्या कामांतील जबाबदारी त्यांना स्वीकारायला लावली पाहिजे. त्यातून, मी जे करीन त्याची जबाबदारी माझी असल्यानं, ते मी नीट करीनच आणि माझ्यावरचा विश्वास सार्थ करीनच, ही पुढील  यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली त्यांना सापडेल. 
दिवाळीचे दिवस होते. शाळेत सजावटीची जोरदार तयारी सुरू होती. यावेळेस किल्ला करताना मोठय़ा शिशूच्या मुलांवरच सगळ्या कामाची जबाबदारी देण्याचं ठरवलं.  सगळी वानर सेना मैदानात आली. ‘किल्ला करायचा म्हणजे  आपल्याला दगड लागतील,’ कोणीतरी मोठय़ानं म्हणालं. झालं, चारी दिशेला चाळीस जण पांगले. आपल्या आपल्या क्षमतेनुसार आणि आकलनानुसार दगड घेऊन यायला लागले. थोडय़ा वेळानं वेगवेगळ्या आकाराच्या दगडांची रास एका ठिकाणी जमली. त्यांना किल्ल्याची जागा दाखवली, त्याबरोबर सगळे दगड तिथे नेण्यात आले.
 दगडांच्या राशीची उंची बघून हे काही किल्ल्यासारखे वाटतं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्यातील चार-पाच जणांनी फर्मान सोडलं, ‘ए, आपल्याला मोठ्ठे दगड लागतील. चला, मोठ्ठे दगड आणू या.’ 
आम्हा मोठ्यांना वाटलं, खरंच मुलांना मोठ्ठे दगड आणू द्यायचे का? - पण म्हटलं, मुलांवर विश्वास ठेवू या. त्यांनी कामाची जबाबदारी आपणहून घेतली आहे, तर निभावतीलच. एक एक करत मोठे दगड आणायला मुलांची सुरु वात झाली. सगळ्यांच्या हालचाली मी निरखत होते. किती जपून, आपल्याला इजा होणार नाही याचा विचार करून प्रत्येकजण दगड आणत होता. एखादा दगड जास्त मोठ्ठा असेल तर दोघं-तिघं मिळून आणत होते. सगळे जण सगळ्या हालचाली जबाबदारीनं करत होते. 
पूर्ण दिवस दगडं जमा करणं आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं रचना करून बघणं यामध्ये गेला. दुस-या-तिस-या दिवशी त्यांचा स्वत:चा एक छानसा किल्ला तयार झाला. त्यावर त्यांना हवीतशी खेळणी     मांडली गेली. किल्ला सगळ्यांना दाखवताना किती आत्मविश्वास होता त्यांच्या चेह:यावर! प्रत्येक जड दगड त्यांनी आणला होता. त्यातला धोका त्यांनी पत्कारला होता आणि काम पूर्ण केलं होतं. 
असचं एकदा फ्रूट सलॅड करायचं ठरवलं. त्यासाठी फळं कापायची होती. परत वय वर्ष पाच ते सहा. ‘काय करायचं? द्यायची का सुरी त्यांच्या हातात?’ प्रश्न उपस्थित झाला; पण शेवटी फळं आणि सुरी समोर ठेवली आणि काय होतंय याचं निरीक्षण करायला लागले. सु-यांची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीतरी कमी होती. तरी ‘मला दे, मला दे’ म्हणून त्याच्यावरून मारामारी वगैरे न करता जपून आळीपाळीनं सगळे एकमेकांना सु:या देत होते, घेत होते. कापताना नीट काळजीपूर्वक फळं कापत होते. कोणीही एकीकडे बघत, दुसरीकडे कापणो असे प्रकार करत नव्हतं. अगदी लक्षपूर्वक हात सांभाळत फळं कापणं सुरू होतं. 
दोन्ही कामात मुलांनी आपणहून जबाबदारी स्वीकारली तर होतीच; पण ती पूर्णही करून दाखवली!
आता एरव्ही वरच्याच दोन्ही उदाहरणांचं सांगायचं झालं तर प्रथम दिवाळीसाठी किल्ला करायचा, तर मुलं पाच ते सहा वयोगटातील असल्यानं त्यांना मोठे दगड आणणं वगैरे नको या विचारानं सगळी जमवाजमव वॉचमनकाकांना करून ठेवायला सांगायचो. त्यांची रचना आम्हीच करत असू, उगीच कोणाच्या पायावर दगड पडायला नको. बहुतेकवेळा मुलांना फक्त बघ्याची भूमिका देऊन आम्ही मोठे सुबक छान किल्ला मुलांसाठी तयार करत असू. मुलांनी तो दुरून बघायचा. किल्ल्याची खेळणी म्हणजे मातीचे शिवाजी, मावळे. त्यांनाही हात लावू द्यायचो नाही. उगीच मोडले-तोडले तर! सगळा मोठय़ांचाच  कारभार! दुस:या उदाहरणातही फळं कापणं हे आमचं काम असायचं आणि मुलांना फार फार तर एकत्र करण्यास द्यायचो. त्याही उपर एक गंमत मला माझी सहज शिक्षण प्रवासातील मैत्रीण सांगत होती, ‘अगं, माझ्या भाचीला काल तिची आई ‘फळ कापणो’ असं खेळणं घेऊन आली. त्यात काय तर म्हणो प्लॅस्टिक फळांचे दोन भाग वेलक्रोनं जोडलेले असतात. एक प्लॅस्टिकचीच सुरी असते. त्यानं ती फळ कापायची की त्याचे दोन तुकडे होतात. ‘किती हा खोटेपणा!’ तीचं हे शेवटचं वाक्य अंतर्मुख करणारं होतं.
 रेडिमेड किल्ला किंवा हा फूट्र कटिंग खेळ या आणि अशाप्रकारच्या कितीतरी खेळांमधून मुलांना ख:याचे खोटे अनुभव आपण सारखे देत असतो. किती आणि कशाला हे खोटेपण द्यायचं मुलांना? सगळंच खोटं, खोटंचं जगणं आणि खोटे खोटे अनुभव. तसंच असाही एक प्रश्न आहे किती वेळा या अशा संधी आपण आपल्या मुलांना द्यायला तयार असतो? मुलांना जमणार नाही. त्यांना लागेल. ती धडपडतील. ती मोडतील, ती तोडतील या आणि यासारख्या अनेक आपल्या भीतीपासून मुलांना जपत राहातो. ती कामं त्यांच्यासाठी करून टाकतो किंवा त्याप्रकारचे खोटे अनुभव त्यांना देऊन एक आभासी दुनिया त्यांच्याभोवती उभी करतो. आणि एक धाडसी, जबाबदार व्यक्तिमत्त्व घडण्यापासून दूर दूर नेतो.


(लेखिका सहज शिक्षण केंद्राच्या संचालिका आहेत.)

ratibhosekar@ymail.com  

 

 

Web Title: do yourselves.. This is real happiness for childeren.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.