Do you know Sabrina and Mira's struggle to get justice to Jessica Lal ? | जेसिका लालला न्याय मिळवून देण्यासाठी झटणा-या  सबरीना आणि मीराचा संघर्ष माहिती आहे का?

जेसिका लालला न्याय मिळवून देण्यासाठी झटणा-या  सबरीना आणि मीराचा संघर्ष माहिती आहे का?

- माधवी वागेश्वरी 

दिल्ली दिल्ली दिल्ली
मेरा काट कलेजा दिल्ली
ले गयी काट कलेजा दिल्ली
मुई दिल्ली ले गयी.
म्हणत सुरू होणारा ‘नो वन किल्ड जेसिका’ हा सिनेमा. सध्या देशात सुरू असलेली परिस्थिती पाहू जाता हे गाणं आजही लागू होईलच. जगातली मोठी  लोकशाही म्हणून दिमाखानं मिरवणारा भारत. त्याची राजधानी असलेल्या दिल्लीत एका नाइट क्लबमध्ये 1999 साली एक घटना घडली होती. हरियाणाच्या एक मंत्र्याच्या मुलानं त्याला पिण्यासाठी दारू मिळाली नाही म्हणून सेलिब्रिटी बार टेण्डर म्हणून काम करणा-या 23 वर्षीय मुलीला, जेसिका लाल हिला गोळी घातली होती. साक्षी-पुराव्यांच्या अभावी खुनी असूनही तो सुटला  होता. नंतर मात्र मीडियाच्या प्रभावानं जे काही झालं त्यामुळे जेसिका लाल  ही केस देशात गाजली होती. त्यावर आधारित फिल्म म्हणजे ‘नो वन किल्ड जेसिका.’
‘नो वन किल्ड जेसिका’ ही 2011ची फिल्म आहे. राज कुमार गुप्ता यांनी या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. जेसिकाची बहीण सबरीनाची  भूमिका यात विद्या बालननं केली होती आणि मीरा या टेलिव्हिजन न्यूज रिपोर्टरची भूमिका यात राणी मुखर्जी हिनं केली होती. दोघींच्या अभिनयासाठी या फिल्मचं खूप कौतुक झालं होतं. ‘तन्नू वेडस मन्नू’, ‘रांझना’ ‘रईस’सारख्या सिनेमातून अभिनयाची छाप पाडणारा मोहम्मद झिशान आयुबची ही पहिली फिल्म होती. जेसिका लालवर गोळी झाडणा-या राजकारणी माणसाच्या सनकी मुलाची भूमिका त्यानं यात केली होती. जेसिका लाल केस लढत असताना तिच्या बहिणीला आणि आईवडिलांना खूप त्रस झाला. ते एक सामान्य कुटुंब. जेसिकाची बहीण सबरीना. अबोल स्वभावाची, कोणाच्याही अध्यातमध्यात न पडणा-या सबरीना या सामान्य तरुणीची भूमिका यात विद्या बालननं खूपच उत्तम साकार केली होती. ‘आपल्या देशात एखाद्याचं आयुष्य इतकं स्वस्त कसं असू शकतं? एक ड्रिंक मिळालं नाही म्हणून गोळी घातली हे कसं होऊ शकतं?’ हा या व्यक्तिरेखेनं  केलेला प्रश्न आजही कायमचा खिळे ठोकल्यासारखा लोंबकळत राहिलेला आहे. त्या दिवशीच्या नाइटक्लबच्या पार्टीत आलेल्या 300 लोकांची निष्क्रियता आणि सत्ता, पैसा यांच्या जोरावर फिरलेले सातही साक्षीदार यामुळे सुटलेला आरोपी या काळातली सबरीनाची हतबलता, तिला घेरून राहिलेला एकटेपणा बघून पोटात कालवाकालव होते. सहा वर्ष हिमतीनं लढलेली केस, त्यात आलेलं अपयश, आयुष्याची उमेदीची सगळी वर्ष वाया जाणं यावर सिनेमात सबरीना मीरा समोर जो त्रगा करते तो अगदीच स्वाभाविक आणि खरा वाटतो. टेलिव्हिजन न्यूज मीडियात पक्क्या मुरलेल्या मीराचं (राणी मुखर्जी) वर्णन करणारं गाणं या सिनेमात आहे आणि ते म्हणजे आली रे साली रे. मीराच्या    स्वभावाप्रमाणो अत्यंत फटकळ, कशाचाच मुलाहिजा न बाळगणारं असं उडत्या चालीचं हे गाणं. यात एक ओळ आहे की,   
‘आली रे साली रे..
सुर्खीयोंसे बुनती है मकडी की जाली रे..’ 


विशेष लक्ष द्यावं अशी ही ओळ आहे. कारगिल युद्धाचं वार्ताकन करणारी नंतर भारतीय विमान हायजॅक केलं होतं त्याची बातमी देणारी मीरा. तिला जेसिका प्रकरणात काडीचाही रस नसतो कारण  ‘आजकल हिंदी फिल्म्स में भी पॉलिटिशयन्स व्हिलन नहीं होते’, असं ती एका प्रसंगात म्हणते. आरोपी सुटल्यावर मात्र तिला चपराक मारल्यासारखं होतं आणि मग ती आकाश  पाताळ एक करते. तिच्या खटाटोपामुळे पब्लिक प्रेशर नक्कीच तयार होतं; परंतु या पूर्ण काळात तिला आता स्टोरीत रस तयार झाला आहे हेच अधिक दिसत राहतं. ही मीरा भावनिक प्रसंगातदेखील चुकूनही सबरीनाला जवळ घेत नाही. इथे हा सिनेमा खरा वास्तविक होतो. मीडियाच्या धंद्यात पुरु षाप्रमाणोच  बेदरकार आणि बथ्थडपणो काम करणा-या बायकांचं मीरा प्रतिनिधित्व करते. ज्यात तिलाही बातम्या, सनसनाटी, राजकारण, सत्ता यांच्या स्पर्धेत घुसायचं आहे आणि नुसतं घुसायचं नाही तर जिंकायचंसुद्धा आहे. अशा या स्पर्धेत कोणी भरडलं गेलं तर ती मागे-पुढे पाहात नाही. 
या सिनेमात त्या पुढा-याची जी बायको आहे ती फक्त ‘मेरे मुन्नू को कुछ नहीं होना चाहिये.’ हा एकच संवाद तीन तीन वेळा म्हणते. आपल्या मुलानं एका मुलीला मारून टाकलेलं आहे याचं कुठलंच गांभीर्य तिला नाही. डोक्यावर पदर घेऊन ती पडद्याआडून त्या पुढा:याला तेच वाक्य फक्त ऐकवत राहते. या बाई प्रमाणोच, जिनं पार्टी दिली होती ती सुशिक्षित बाई, उच्चभ्रू वर्गातली, मालविका तिचं नाव. तिनं प्रत्यक्ष गोळी झाडलेली पाहिलेली असते. पण तीदेखील पुढे येऊन सबरीनाला मदत करत नाही. स्वत:ची कातडी वाचवत दारूचे आणि कॉफीचे कप रिचवत राहते. या दोन बायका म्हणजे  बायकाच बायकांना साथ देत नाहीत या उक्तीला सार्थ ठरवत राहतात. आपण जर निष्क्रिय राहिलो तर होणा-या अन्यायाला आपणही जबाबदार असतो याची भेदक जाणीव हा सिनेमा करून देतो. मीडियानं टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग करत तयार केलेली  ‘जनता की आवाज’ ज्यामुळे पुन्हा केस ओपन करावी लागली आणि जेसिकाला अखेर न्याय मिळाला. हातात आलेला मोबाइल फोन काय करू शकतो, मीडिया आणि टेक्नॉलॉजी हे जर एकत्र आले तर राजकीय डाव कसे उधळले जातात आणि नव्यानं आखले जाऊ शकतात याचा प्रत्यय घेत आज आपण फेक व्हिडीओ कुठले आणि खरे कुठले यानं भ्रमिष्ट होण्याच्या उंबरठय़ावर येऊन ठेपलो आहोत. सिनेमाच्या सुरुवातीच्या एका प्रसंगात मीरा विमानात बसलेली आहे.  कारगिल युद्धाची असाइनमेण्ट संपवून ती आता दिल्लीला जाते आहे तेव्हा तिचा एका प्रवाशाशी झालेला संवाद आणि तिनं त्याला त्यावर दिलेलं चोख उत्तर खूप महत्त्वाचं आहे. सतत चाललेली हिंसा, जगात कुठे ना कुठे चाललेली युद्धं, स्थलांतरित झालेली माणसं, त्यांची कुटुंबं, सेक्स स्लेव्ह म्हणून आजही बायकांना विकलं जाणं, जागतिक तापमानवाढीमुळे जळून राख होत असलेली जंगलं या आणि अशा कितीतरी मनाचा थरकाप उडवणा-या घटना यांच्याकडे आपण नकळतपणो ‘जैसे के कोई फिल्म चल रही है’, असा विचार करून मनोरंजन  प्रमाणो तर बघत तर नाही आहोत ना या विषयी हा सिनेमा विचार करायला  लावतो.
‘क्या ये लढाई जरु री थी?’
  ‘किसकी जान इतनी सस्ती कैसे हो सकती है?’ 
- हे जीवघेणो प्रश्न मीरा आणि सबरीना सतत विचारत राहातात.


(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

madhavi.wageshwari@gmail.com

 

                                                                                                                                                                                                                                                                                                                                              

Web Title: Do you know Sabrina and Mira's struggle to get justice to Jessica Lal ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.