Do gardening with your kids to make some hard things to do easier! | अवघड गोष्टी सोप्या करण्यासाठी मुलांसोबत बागकाम करा!

अवघड गोष्टी सोप्या करण्यासाठी मुलांसोबत बागकाम करा!

- मयूरी जाधव

ग्रेटा थनबर्ग ही सोळा वर्षांची मुलगी हवामान बदलाबद्दल मोठय़ांना त्यांची चूक लक्षात आणून त्यांना त्यांची जबाबदारी शिकवत आहे. ग्रेटानं आपल्या एका भाषणात म्हटलं आहे की, ‘तुम्ही वयानं लहान आहात म्हणून बदल करू शकत नाही, असं नाही. लहान मुलंही बदल करू शकतात.’ आणि म्हणूनच आपलं पर्यावरण वाचवायचं असेल तर मुलांनी मोठं झाल्यावरच निसर्गप्रेमी व्हावं असं नाही. पर्यावरणाचे अभ्यासक आणि संशोधक लहान मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम आणि काळजी निर्माण करण्याच्या गरजेवर आता भर देत आहेत. आणि त्यासाठी ते मुलांच्या आईबाबांनाही प्रयत्न करायला सांगत आहेत. हे प्रयत्न कसे करावेत याचा सोपा मार्गही त्यांनी सांगितला आहे. 
 

मुलांसोबत बागकाम का?

*  आपल्या पर्यावरणाबद्दल प्रेम वाटावं, लहान मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी, एखाद्या गोष्टीची काळजी घेण्याची सवय रुजविण्यासाठी आणि नासाडी न करण्याची वृत्ती मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी आईबाबांनी घरात मुलांसोबत थोडं बागकाम करावं.
*  मुलांना सोबत घेऊन झाडांना पाणी टाकणं, माती टाकणं, बाग साफ करणं अशी कामं केल्यानं मुलांना या कामाची आवड निर्माण होते. तसेच मुलांमध्ये जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी आपल्या बागेतल्या एखाद्या कुंडीतल्या झाडाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी. या झाडांच्या माध्यमातून मुलं फक्त झाडांचीच नाही तर माणसांची, पाळीव प्राण्यांची, स्वत:च्या आणि इतरांच्या वस्तूंची काळजी घेण्यास शिकतात.
 * मातीतून रोप कसं उगवतं हे मुलांना दाखवण्यासाठी घरातल्या बागेत त्यांच्याकडून धने आणि मेथीचे दाणे पेरून घ्यावेत. एखादं बी रुजल्यानंतर रोप कसं उगवतं याचं निरीक्षण करण्याच्या प्रक्रियेतून संयमासारखी अवघड गोष्ट सोप्या पद्धतीनं मुलांना शिकवता येतं.
 * आपण कष्टानं उगवलेलं रोप बघितलं की, ‘आपण हे केलं’ याचा आनंद तर त्यांना होतोच शिवाय ‘आपण हे करू शकतो’ हा  आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होतो. हा आत्मविश्वास कोणतंही काम करताना त्यांना उपयोगी पडतो.
*  बागकाम हे काही सोपं आणि सहज होणारं काम नाही. पण मुलं जेव्हा आईबाबांसोबत बागकाम करतात तेव्हा त्यांना या कष्टाचीही आवड निर्माण होते. 
*  लहान मुलं हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांना ही जबाबदारी ते शाळेत जायच्या आधीपासूनच आईबाबा अशा बागकामाच्या माध्यमातून शिकवू शकतात. 

Web Title: Do gardening with your kids to make some hard things to do easier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.