DM IT- Is it really essential? | डीएम आयटी- पालकांसाठी एक नवा खड्डा

डीएम आयटी- पालकांसाठी एक नवा खड्डा

-डॉ. श्रुती पानसे

आपल्याला काय आवडतं? काय आवडत नाही? आपला स्वभाव कसा आहे? आपलं एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर ते वाक्य कोणतं? जोडीदारचं तुमच्यावर किती टक्के प्रेम आहे? अशा पद्धतीच्या टेस्ट्स अर्थात चाचण्या सोशल मीडियावर फिरत असतात. अनेकांना असं वाटतं की या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांना कौल विचारावा. गंमत म्हणून का होईना, लोक अशा प्रश्नावल्या सोडवत असतात. त्या इतरांना शेअरही करत असतात. ही गंमत असेलही कदाचित; पण ‘मला कोणती शाखा घ्यायची आहे? कोणती शाखा निवडली तर बरं राहील?’ असे प्रश्न विद्यार्थी जेव्हा इतरांना किंवा सोशल मीडियावर विचारतात तेव्हा त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं कोण देईल बरं? याचं उत्तर अगदीच सोपं आहे. या प्रश्नाचं खरंखुरं उत्तर तो विद्यार्थी स्वत:च देऊ शकेल. त्यानं स्वत:च्या मनाचा कानाकोपरा शोधला तर उत्तर नक्की मिळेल. 
‘माझी बुद्धिमत्ता कितपत आहे? म्हणजे मी तशी बुद्धीनं बरी/बरा आहे ना की माझ्यात काही घोळ आहेत?’ हा प्रश्न स्वत:ला विचारायचा की इतर कोणाला? 
पण सध्या अशा प्रश्नावल्यांचं पेव फुटलंय. 
काय आहे हे सगळं? अशा प्रश्नावल्यांतून, चाचण्यांतून बुद्धी मोजली जाते का?
 

बुद्धीचं मोजमाप

बुद्धी मोजण्यासाठी जी चाचणी करतात त्याला सोप्या भाषेत  ‘आयक्यू टेस्ट’ म्हटलं जातं. इंग्रजीतला शब्द आहे  ‘इन्टेलिजन्स कोशन्ट’. अल्फर्ड बिने यांनी या विषयात महत्त्वाचं काम केलं आहे, तर फ्रान्सिस गॅल्टन  यांच्याकडे बुद्धीचं मोजमाप करता येईल का, या कल्पनेचं श्रेय जातं. पुढे अनेकांनी यावर काम केलं. माणूस बुद्धिवान आहे की नाही, हे शोधायची आपल्याला अत्यंत हौस असते. ते शोधण्यासाठी फार फार पूर्वींपासून अनेकांची धडपड चालू होती. इथे आपलं सख्खं किंवा जुळं भावंडं आपल्यासारखं नसतं. प्रत्येक माणूस वेगळा. त्याच्या मेंदूतली बुद्धिमत्ता वेगळी. आयक्यू टेस्टनुसार ज्यांचा बुद्धिगुणांक 140च्या वर असतो, ते अतिबुद्धिमान (जिनिअस) ज्यांचा बुद्धिगुणांक 90 ते 100 यामध्ये असतो ते सरासरी असतात, तर यापेक्षा कमी अंक आला तर त्यांना सरासरीच्या खाली समजलं जातं. याचा एक वाईट परिणाम म्हणजे ज्याचा बुद्धिगुणांक कमी ते मूल त्याच्या आयुष्यभर ‘आपल्याला बुद्धी कमी आहे’ असा समज घेऊन वावरतं. यामुळे त्याच्या विचारक्षमतेवरच पहिला प्रहार होतो आणि दुसरा त्याच्या आत्मविश्वासावर. 
अनेक वर्षं या आयक्यूचं गारूड लोकांवर होतं; पण आता मेंदू संशोधनांमध्ये प्रगती झाल्यामुळे आयक्यू म्हणजेच फक्त बुद्धिमत्ता हा समज मागे पडतो आहे. ज्याला नॉर्मल मेंदू आहे, तो प्रत्येकजण बुद्धी वापरतो. प्रत्येक काम हे सर्व वयात बुद्धीचा वापर करूनच केलं जातं. हे सगळ्यात खरं. 

प्रत्येक माणूस वेगळा कसा?

विशिष्ट शाखा, विशिष्ट कोर्सेस, विशिष्ट व्यवसाय याला जरा विशेष प्रकारची बुद्धी लागते. असं एक कारण समाजानं, घरादारानं, शिक्षणव्यवस्थेनं मनावर बिंबवलेलं असतं. बुद्धी म्हणजे काय, हे मुलांपर्यंत आपण पोहोचवूच शकलो नाही. ही बौद्धिक विषमता मोठय़ा लोकांच्या मनात आहे. तिथूनच ती लहानांच्या मनात पोहोचली आहे. 
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते. विविध क्षेत्रं ठरलेली असतात. त्यातली कामंही ठरलेली असतात. मात्र त्यातल्या न्यूरॉन्स या पेशींनुसार फरक पडत जातो. या पेशींमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरतो. 
अमेरिकेतील डॉ. हॉवर्ड गार्डनर हे प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट आहेत. त्यांनी अनेक मेंदूंवर संशोधन केलं. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्यानं मेंदूत काय चालतं, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यावरून ही गोष्ट लक्षात आली की, माणसाची अवघी बुद्धी ही त्याच्या न्यूरॉन्समध्ये साठवलेली असते. 

एक नाही, अनेक बुद्धिमत्ता 

प्रत्येकाच्या विविध क्षेत्रांमधल्या न्यूरॉन्सच्या गतीनुसार त्याची बुद्धिमत्ता ठरत असते. हे लक्षात आल्यावर ‘बुद्धी कमी की जास्त,’ हा प्रश्न सुटला. बुद्धी कमी किंवा जास्त, अशी समस्या नसते. तर एकाची बुद्धी काही विषयात, तर दुस-याची बुद्धी इतर काही विषयात, असं असतं. हे निष्कर्ष सर्वांच्याच दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी 1983 साली एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे ‘फ्रेम्स ऑफ माइंड’. यात ‘मल्टिपल इंटेलिजन्सेस’ हा सिद्धांत मांडला आहे. याला मराठीत ‘बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हणता येईल. कारण यात बुद्धीच्या विविध आयामांचा विचार केला आहे.  प्रत्येकाच्या बुद्धीची काय खासियत असते हे सांगितलं आहे. 
बुद्धिमत्ता एक नसते, तर अनेक असतात, असं समाजाला दिशादर्शक ठरेल असं महत्त्वाचं विधान केलं आहे. 
चाचणीनं बुद्धिमत्ता मोजली जाते?
सध्या ‘डीएम आयटी’चा बराच प्रचार-प्रसार झालेला आहे. अंगठय़ाच्या ठशावरून तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता सांगितली जाते. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. स्वत: डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी अनेकदा सांगितलं आहे की बुद्धिमत्ता या केवळ निरीक्षणातून ओळखल्या जाऊ शकतात. यासाठी कोणतीही टेस्ट नाही. खरं तर कोणत्याही टेस्टपेक्षा पालक आणि मुलांनी एकमेकांसोबत वेळ काढला, त्यांनी एकमेकांशी कायम मोकळा संवाद साधला तर आपल्या मुला-मुलीत काय चांगले गुण आहेत हे त्यांना सहज समजेल. मग या गुणांना प्रोत्साहन देणं आणि जे दोष आहेत ते काढण्यावर भर देणं एवढं केलं तर जास्त चांगलं.
शाळेतला  अभ्यास. त्याच्या जोडीला एक आवडेल ती कला आणि आवडेल तो खेळ एवढय़ा तीन गोष्ट केल्या तर  मुलांच्या बुद्धीला चांगलं खाद्य पुरवलं जातं.

(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

drshrutipanse@gmail.com

Web Title: DM IT- Is it really essential?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.