Dialogue in a closed house in China in corona situation |  चीनमधल्या बंद घरातले संवाद

 चीनमधल्या बंद घरातले संवाद

- अपर्णा वाईकर

चीनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. जनजीवन विस्कळीत होणं म्हणजे काय ते या कोरोनामुळे आम्हाला कळलं. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मोठा परिणाम मुलांच्या शाळेवर आणि अभ्यासावर झालाय. गेल्या दोन महिन्यांपासून शाळा तर बंदच आहेत इथल्या. सुरुवातीला चिनी नवीन वर्षाच्या सुट्टय़ा होत्या. त्यातच कोरोना आल्यामुळे पुढे शाळा उघडल्याच नाहीत. आजर्पयत त्या बंदच आहेत.
आम्हा सगळ्या पालकांना प्रश्न पडला होता की आता पुढे काय? हे किती दिवस चालणार याचा काहीही अंदाज येत नव्हता. त्यात भरीस भर म्हणून जवळपास सगळ्याच देशांनी त्यांची विमानसेवा बंद केल्यामुळे सुट्टय़ांसाठी इतर देशांत गेलेले बरेच शिक्षक आणि विद्यार्थी परतच येऊ शकत नाहियेत. आता तर परिस्थिती अजूनच बिकट आहे कारण आता हा विषाणू जगभर पसरलाय. अशा वेळी या सगळ्या शाळांनी तंत्रज्ञानाला हाताशी घेऊन  ‘ई-लर्निग’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आम्हा सगळ्यांसाठीच हा एक खूपच नवा अनुभव होता.
युरोप अमेरिकेत खूप लोक होम स्कूलिंग करतात हे ऐकून माहीत होतं. पण मुळातच शिक्षिकेचा पिंड नसल्यामुळे मला ते फारच जड आणि किचकट काम वाटलं होतं. आता दीड महिना झालाय मुलं ई-लर्निग करताहेत. सुरुवातीला थोडं कठीण वाटलं; पण मग सवय झाली. विज्ञान आणि गणित शिकवताना आपले शाळेचे दिवस आठवले. या निमित्तानं आमच्या वेळची शाळा कशी होती ते मुलांना सांगायचा चान्स मिळाला. त्या वेळची शिक्षणाची पद्धत या आंतरराष्ट्रीय शाळेपेक्षा किती तरी पटीनं वेगळी होती. ‘इतक्या कडक शिक्षकांच्या शिस्तीत तू कशी सरव्हाइव झाली?’ असा गोंडस प्रश्न माझ्या सहावीतल्या मुलानं विचारल्यावर मला फार गंमत वाटली. माझं गणित कसं कच्चं होतं पण तरी माङो पाढे कसे काय अजूनही पाठ आहेत याचंही त्याला प्रचंड आश्चर्य वाटलं. यातून मला असा फायदा झाला की मुलांच्या अभ्यासात मलाही इंटरेस्ट वाटायला लागला आणि ‘अरे देवा’  वरून मी ‘अरे वा’ वर आले.
काही मैत्रिणींनी तर या संधीचा पूर्णपणो फायदा घेऊन प्रत्येक विषय मुळापासून शिकवला. नुसतं स्वत:च्या मुलांना शिकवून थांबल्या नाहीत तर इतर मुलांनाही त्याचा फायदा करून दिला. मिडल स्कूलच्या मुलाचे विज्ञानाचे आणि गणिताचे प्रोजेक्ट ऑनलाइन करताना मला त्याच्याकडून तंत्रज्ञान कसं वापरता येऊ शकतं ते शिकायला मिळतं आहे. ही मुलं इतक्या लहान वयात हे सगळं किती सहजपणो करू शकतात हे खरंच कौतुकास्पद आहे. 
अगदी लहान मुलांच्या आयांचंसुद्धा मला विशेष कौतुक वाटतं. कारण 4-5 वर्षाच्या मुलांना दिवसभर घरात बसवून ठेवण्यासाठी त्यांना काय काय उपाय करायला लागताहेत. थोडा वेळ पुस्तक वाचन, मग एखादं पझल सोडवणं, चित्र काढणं, इत्यादी करूनही मुलं कंटाळत होती. मग या सगळ्यांनी एक ग्रुप तयार केला आणि आळीपाळीनं त्यावर गोष्टींचे, गाण्यांचे व्हिडीओ टाकू लागल्या. आपल्या आईकडून गोष्ट ऐकण्यापेक्षा दुस-या कुणाकडून ऐकायला मुलांना जास्त आवडतं. तसंच या ग्रुपवरून मुलंही एकमेकांशी व्हिडीओ प्ले डेट करू शकतात.
हायस्कूलमधल्या मुलांना अभ्यासात विशेष मदत लागत नाही कारण ही मुलं त्यांच्या शिक्षकांना मेल पाठवून विचारू शकतात. किंवा मित्रंशी फोनवर, अँपवरून बोलू शकतात. पण माझ्या अकरावीमधल्या मुलाबरोबर इतिहास, नागरिकशास्र या त्याच्या आवडत्या विषयावर चर्चा करताना मला सगळ्या जगाच्या इतिहासाची माहिती मिळाली. भारतातल्या राजकीय परिस्थितीवरची त्याची मतं ऐकता आली. तसंच तो शिकत असलेल्या रसायनशास्र आणि जीवशास्र या विषयांवरची मला तोंडपाठ असलेली माहिती बघून त्याला आश्चर्य वाटलं कारण या गोष्टींवर बोलायला इतका वेळ कधीच मिळला  नाही.
अगदी माझ्याकडे कामाला येणारी बाईसुद्धा तिच्या मुलाशी रोज त्याच्या अभ्यासाबद्दल बोलते. तिचा मुलगा दुस-या गावात आहे आणि तो रोज त्याच्या ई-लर्निगविषयी फोन करून हिला माहिती देतो.  या कोरोना विषाणूचा एक मोठा फायदा हा झालाय की, मुलं आणि आई जास्त जवळ आले. मुलं मोठी व्हायला लागली की, ती त्यांच्या शाळेच्या, मित्रांच्या जगात गुंतलेली असतात त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक दुरावा येतो आणि खूप वेळा तो गरज नसताना वाढत जातो. नुसती आईच नाही तर जे जागरूक पालक असतात ते ही गोष्ट जाणून असतात आणि जेव्हा जमेल तेव्हा मुलांशी संवाद साधत असतात. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. 
कारणं बरीच आहेत. पण या ‘कम्पल्सरी क्वारंटाइन’चा सदुपयोग करून मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला मात्र हरकत नाही.

(लेखिका गेल्या दहा वर्षापासून शांघायमध्ये असून मोझॅक आर्ट शिकवतात.)                                                                                                                                                   aparna.waikar76@gmail.com

 


 

Web Title: Dialogue in a closed house in China in corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.