Counting and cracking...an amusing play... | काउंटिंग अँण्ड क्रॅकिंग :- नाटक नव्हे कलाकृती

काउंटिंग अँण्ड क्रॅकिंग :- नाटक नव्हे कलाकृती

- हिमानी नीलेश

एखाद्या नाटकाला कलाकृती म्हणून संबोधण्यासाठी त्या नाटकाचा पट त्या दर्जाचा असावा लागतो. अशा दोन कलाकृती अँडलेडमध्ये माझ्या पाहण्यात आल्या.एकीचं नाव काउंटिंग अँण्ड क्रॅकिंग तर दुसरीचं ओक्लाहोमा. आज मी तुम्हाला काउंटिंग आणि क्रॅकिंग पाहायला नेणार आहे. 
हे नाटक निव्वळ चमत्कार आहे असं मला वाटतं. ते एशियन लोकांना   जितकं आपलं वाटतं तितकंच पाश्चिमात्य लोकांनां. याचं मूळ कारण या नाटकाचा लेखक एस शक्तिधरन हा श्रीलंकन आहे नि दिग्दर्शक एमन  फ्लॅक हा ऑस्ट्रेलियन आहे.
‘बेलव्हॉयर थिएटर’ चं हे नाटक शक्तिधरन यांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांवर बेतलेलं आहे. नुकताच मिसरूड फुटलेला, ऑस्ट्रेलियात वाढलेला श्रीलंकन मुलगा,   आपल्या आईच्या भूतकाळाचा शोध घेत जातो. या ‘ऑस्ट्रेलिया बॉर्न कॅफुस्ज्ड देसी’ मुलाला आपल्या आईच्या श्रीलंकन नीती मूल्यांचा थांग नसतो. त्यांच्यामधल्या तुटलेल्या संवादाची नाळ जोडली जाते ती त्यानं    घेतलेल्या जीवघेण्या शोधामुळे. हा आईच्या भूतकाळात घडलेल्या,  श्रीलंकेतील भाषावाद, त्यातून उसळलेल्या दंगली, मग तिचं घडलेलं  मनाविरुद्धचं स्थलांतर आणि अचानक ना भूतो ना भविष्यती अशा  समजलेल्या बातमीमुळे त्या मुलानं घेतलेला शोध! हा प्रवास थक्क करणारा आहे. ती बातमी कोणती ? त्या बातमीभोवती नेमक्या काय घटना घडतात ? आणि त्यामुलाच्या आयष्यात त्यामुळे काय बदल होतो त्या शोधाचं फळ काय हे कळण्यासाठी हे नाटकच पाहायला हवं. 

फोटो- ब्रेट ब्रॉडमन 

हे नाटक श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोनच देशात घडत जाणारे प्रसंग    दाखवत असले; तरी  त्यातून उलगडणारे सामाजिक नि राजकीय प्रश्न हे केवळ श्रीलंका  नि ऑस्ट्रेलियापुरते मर्यादित नाहीत. मला ते वैश्विक  वाटतात. ते प्रश्न  सर्व स्थलांतरित लोकांचे आहेत. मग ते गांधी हत्येच्या  वेळेस झालेल्या दंगलीतील लोकांचं स्थलांतर असो, बोटीवरून देश सोडून दुसरीकडे शरण आलेल्या लोकांचे असो, नाझी आक्र मणाच्या वेळेस  झालेल्या विस्थापितांचे असो, करोनाच्या विळख्यात सापडलेल्या शेकडो    मैल वाट  तुडवत जाणा-या   मजुरांचे असो किंवा अगदी बघुयात तरी परदेशात चार वर्ष राहून’ म्हणणा-या   पांढरपेशा मध्यमवर्गीयांचे असो. त्याची तीव्रता नि झळ कमी जास्ती असली तरी मूलभूत प्रश्न सामायिक आहेत. हरवलेपण ,भाषा, संस्कृतीतिला विरोधाभास ,उपरेपण, अर्थार्जन, भौतिक  सुख, एका टप्प्यावर  येणारं  सरावलेपण अशा अनेक मुद्यांना ते स्पर्श करतं. अशा मूलभूत प्रश्नावर प्रकाश टाकणारं परदेशात राहून ज्यांच्या तीन पिढ्या नांदल्या त्यावर अपर्णा वेलणकरांचे ‘‘फॉर हिअर  ऑर  टू गो’’ नावाचं अत्यंत वास्तवदर्शी पुस्तक आहे.  इथे संपादिकेनं स्वत:ची मतं वाचकांवर मुळीच   लादलेली नाहीत; तर अमेरिका नि कॅनडातील मराठी रहिवाश्यांच्या यशापयशाच्या गाथा नि त्यांची जीवनशैली त्यांच्या मनाच्या तळघरात जाऊन मिळविल्या आहेत. तर सांगायचा मुद्दा हा कि नाटक श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात घडत असलं तरी माझ्यासारख्या स्थलांतरित भारतीय स्त्रीला    ते तितकंच माझं वाटतं ते त्याच्या वैश्विक बैठक नि मांडणीमुळे. नाटकात नेमक्या काय घटना घडतात यासाठी आणि त्याच्या सादरीकरणारच्या प्रत्येक बाबींसाठी हे नाटक पाहायला हवं. 

आता सादरीकरणाकडे येते. नाटकात मंद धुपाच्या उदीनं तुमचं स्वागत होतं. त्या पहिल्या श्वासापासून बाहेरपडेपर्यंत नाटक तुम्हाला खिळवून           ठेवतं.   लोकनाट्यात असतं त्याप्रमाणो  नाटकातली पात्र त्या त्या प्रसंगाला साजेल असं खिडक्या , खुर्च्या  असं साहित्यवजा नेपथ्य  घेऊन ते थाटत सिन संपल्यावर ते घेऊन जातं. तर या साहित्यात त्यांनी चक्क पोहण्याचा   तलावही थाटला होता. नेपथ्य थाटण्याला पडलेल्या टाळ्या मी तरी  पहिल्यांदाच ऐकल्या. ते काही गिमिक नव्हतं तर नाटकाच्या सादरीकरणासाठी आवश्यक नि सौंदर्यात भर घालणारा असा तो महत्वाचा घटक होता.तो प्रसंग तर इतका नाट्यपूर्ण होता कि त्यासाठी आणि अत्यंत बोलक्या नेपथ्यासाठी हे नाटक पाहायलाच हवं.  
अमर फोटो स्टुडिओ नाटकात एका प्रसंगी सुव्रत जोशी एका लाइटमुळे आपल्याला बरोबर अर्धा अंधारात नि अर्धा प्रकाशात दिसतो. शीतल तळपदे  यांनी या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. तळपदे हे या क्षेत्रत मुरलेले प्रकाशयोजनाकार.  त्यांच्या प्रकाशयोजनेमुळे रंगमंचाच्या कॅनव्हासवरची पात्रं गडद आणि  फिकी होऊ शकतात. हे संतुलन जमायला ती दृष्टी लागते . तळपदे हे कमालीच्या परिणामकारक रीतीने करतात. ते जर हा प्रयोग    पाहायला असते तर त्यांनी प्रकाश योजनाकाराला मिठी मारली असती इतकी परिणामकारक प्रकाशयोजना आपल्याला नाटकातली  ऊन सावली दाखवत राहाते. त्यासाठी हे नाटक पाहायलाच हवं. 

 

फोटो- ब्रेट ब्रॉडमन ​​​​​​​

या नाटकाच्या सादरीकरणाची शैली ही ब्रेख्तच्या नाटककाराच्या शैलीप्रमाणो आहे. नाटकात जेव्हा दंगल सुरु  होते तेव्हा एखादा दगड तुम्हालाच लागेल की काय असं वाटू लागत. काय वाट्टेल ते झालं तरी या दंगलीतून आपली सुटका व्हावी असं पात्रंसकट तुम्हाला वाटू लागतं. सतत कुठल्यातरी  पात्रची  तुमच्याकडे पाठ असते तेव्हासुद्धा तुम्ही जणू त्या प्रसंगाच्या आत जाऊन बसता नि तुमच्या अवती भवती तो प्रसंग सहज घडावा तसा  उलगडत जातो. राजकीय नि सामाजिक प्रबोधनासाठी ब्रेख्तनं वापरलेल्या नाटकाच्या शैलीचा उपयोग दिग्दर्शकाने खुबीनं करून घेतला आहे.  एकाच वेळी आपणच नाटकातलं पात्रं आहोत असं वाटणं आणि तेच नाटक आपण बाहेरूनही बघतो आहोत याची जाणीव होणं हा अनुभव घेण्यासाठी तरी हे नाटक तुम्हाला पाहायलाच हवं
या नाटकात तीन भाषा बोलल्या जातात स्वाहीली, तमिळ, नि इंग्रजी. ऑस्ट्रेलियात मोठा कामगार  वर्ग ज्याला इथे प्रेमानं ‘ट्रेडी’ असं संबोधलं जात तो      ब-यापैकी स्थलांतरीत लोकांचाही आहे. हे गोरे लोक त्यांच्या  अँक्सेंटचं इंग्रजी बोलतात. या नाटकातला ‘ट्रेडी’ रशियन अँकंसेंटच इंग्रजी बोलून धमाल उडवून देतो.विश्वास ठेवा, यातल्या कुठल्याही भाषेचा  अडसर प्रेक्षकांना मुळीच झाला नाही. यातले 12 कलाकार जवळपास 5क् भूमिका करतात. त्यांची ऊर्जा इतकी आहे कि गणपतीतल्या अत्यंत टिपेला पोहोचलेल्या ढोलताशावर  चालणारा गणपतीडान्स  करणारेही लाजतील . एकामागून एक पात्रं साकारून हे नट जराही दमलेले दिसत नाहीत. भावनिक नात्यांची गुंफणंही  तितकीच तरल नि अलगद तुमच्यात ङिारपत  जाते .  तुम्ही त्यांच्यातले एक होऊन जाता अशी किमया हे सर्व अभिनेते करतात. 
नाटक संपल्यावर माझ्यासारखीच अवस्था इतरांची होती. लोक निशब्द झाले होते. कलाकारांना 6 वेळा कर्टन कॉल घ्यावा लागला. एवढे होऊनही प्रेक्षक थांबले. पात्रं नि रंग उतरवून  आलेल्या कलाकारांना त्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात अनौपचारिक सलामी दिली. हे  नट स्वाहिली  वा इंग्रजी बोलत असणार म्हणून त्यांच्याशी इंग्रजीत बोलायला गेले तर   नाटकातली फाडफाड स्वाहिली बोलणारी नि श्रीलंकन दिसणारी  नटी माझ्याशी चक्क हिंदीतच बोलू लागली. हे सर्वजण; फ्रान्स, भारत, सिंगापूर असे जगभरातून आले असतील, अशी पुसटशी शंका मनाला शिवली  नव्हती. जय इमॅन्युएल या नटाशी गप्पा झाल्या तेव्हा त्याने, नाटकातल्या फक्त एकालाच तमिळ समजते! बाकी सर्वांनी इंग्रजी लिपीत स्वाहिली नि  तमिळ लिहून संवाद पाठ केले नि श्रीलंकन पात्रं उभी केल्याचं सांगितलं,  तेव्हा प्रेक्षकातल्या श्रीलंकन बायकांना चक्कर यायची बाकी होती. या नाटकातून मी कधी बाहेर येईन असं वाटत नाही. काही कलाकृतींच्या आपण फक्त ऋणातच राहतो ते त्यांनी दिलेल्या निस्सीम आनंदासाठी . निदान यासाठी तरी तुम्हाला हे नाटक पाहायलाच हवं.

खेळाचे चाहते ऑलिम्पिकसाठी जगभर प्रवास करून कित्येक महिने आगोदर तिकीट बुक करून तो खेळ बघतातच म्हणो . या नाटकाचा खेळही   त्या दर्जाचा आहे. त्यांची टीम तयार आहे  तुमची तिकिटं ?

 

(अँडलेडच्या प्लेफोर्ड लायब्ररीत कार्यरत असलेल्या  लेखिका दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत) 
himaninilesh123@gmail.com

Web Title: Counting and cracking...an amusing play...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.