-नीरजा पटवर्धन


बाह्य सौंदर्याला अर्थ नाही. मनाचं सौंदर्य महत्वाचं.’ सोशल मीडियावर एका ढुढ्ढाचार्यांनी ठामपणे आपलं मत मांडलं. मग कातडी आणि त्यावरच्या आवरणाकडे लक्ष देणा-या बायकामुलींच्या गाभ्यात कांदेबटाटे आणि दुष्टपणा ठासून भरलेला असतो तो कसा हे सांगणा-या प्रतिक्रियांचा त्या मतावर पाऊस पडू लागला. 

यात चुकीचं काही नाही. आपल्याला हेच शिकवलेलं असतं पहिल्यापासून. प्रत्यक्षात मात्र आपण उलट वागत असतो. कातडी आणि आवरणावरूनच व्यक्तीचं मोजमाप करत असतो.  जीन्स घातलेली मुलगी म्हणजे स्वयंपाक करता येत नसणार. लिपिस्टक लावली की बायकांचा मनमिळावूपणा गायब होतो. व्यवस्थित मेकअप केला असेल तर ललना माठ असणार. मंगळसूत्र घातलं की संस्कारच संस्कार. मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट ड्रेस असेल तर बया छचोर. हे आणि असे हजारो आडाखे. यात गाव, शहर, वर्तुळ याप्रमाणे थोडं इकडेतिकडे इतकंच. पण आडाखे असतातच. खरंतर नुसते आडाखे नाहीत तर हे त्यांच्यासाठी अगदी काळ्या दगडावरच्या रेघेसारखं ठाम वैश्विक सत्य असतं. 
हे आडाखे खरं ठरवणारी जेवढी उदाहरणं तेवढीच खोटी ठरवणारीही उदाहरणं असतातच. तरीही आवरण काहीच सांगत नाही हेही खरं नव्हे. आवरण आणि गाभा यांचं नातं इतकं वरवरचं, इतकं एकास एक प्रकारचं नसतं. 

 

माणसाची राहणी हा पूर्ण व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. एखाद दुस-या वैशिष्ट्याचा नाही. हे माणसाचं व्यक्तिमत्व जनुकीय मांडणीबरोबरच जन्मापासून असलेली परिस्थिती, घटना, बदल, स्वभाव, आजूबाजूचं वातावरण आणि माणसं या आणि अशा हजारो लहानमोठ्या गोष्टींचं बनलेलं असतं,बदलत असतं. या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब माणसाच्या कपडे-दागिने-चपला-त्वचा-केस या सर्व गोष्टींबद्दलच्या निर्णयामध्ये पडतं. यामुळेच एकाच वर्गात असलेली मुलं गणवेश नसेल तर वेगवेगळी दिसतात. एकाच ठिकाणी काम करणा-या स्त्रियांच्या राहणीमध्ये प्रत्येकीचा आपापला बाज असतो. एकाच घरात राहाणारी एक पिढी कपड्याचोपड्यांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. 

अंगावरचे कपडे, राहणी आणि त्यावरून बांधलेले आडाखे यांचा संबंध नाही असंही नाही आणि ही चोख वस्तुस्थितीही म्हणता येणार  नाही. हे आडाखे म्हणजे शक्यता असतात. माणूस पहिल्यांदा समोर आला की त्याला वा तिला जोखण्यासाठी गृहीत धरलेल्या शक्यता. मात्न इतिहासात डोकावून बघितलं तर या कपडे वाचण्याच्या आणि समजण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध गमतीजमती बघायला मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माणसाचं लिंग. राहणी आणि घातलेल्या कपड्यांवरून व्यक्ती स्त्री आहे वा पुरूष आहे हे कळतं. कोणाला मुलगा म्हणायचं आणि कोणाला मुलगी हे आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून माहिती आहे. पण नीट विचार केला तर लक्षात येईल की, ही लिंगनिश्चिती केवळ  राहणी, घातलेले कपडे यांच्यावरूनच आहे.  लिंगनिश्चिती आणि कपडे यांचा संबंध जोडला गेला आणि मग तो नियमही झाला. त्यामुळे इथे कपडे हे चक्क स्त्री  वा पुरूष असण्याचं चिन्ह वा प्रतीक म्हणून येतात. 

दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वय. जगातल्या बहुतेक संस्कृतींमध्ये मूल चालायला लागेतो, त्याच्या आठवणी सुरू होईतो बाळ मुलगी आहे की मुलगा हे स्पष्ट करणारे कपडे क्वचित वापरले जातात.  झबली, टोपडी, कुंच्या तसेच वाळे, मनगट्या वगैरे बाळलेणी ही दोघांनाही सारखीच घातली जातात. मानवजन्म आधी मग लिंगभाव हे अधोरेखित करणारी ही पद्धत आता मुलग्यांसाठी निळा रंग आणि मुलींसाठी गुलाबी रंग असल्या अमेरिकन पद्धतीनं पुसून काढली जातेय. प्रबोधनकाळा दरम्यान युरोपात मुलगे पाचसहा वर्षांचे झाले की त्यांना झगा वा झबलंसदृश कपडे जाऊन ब्रीचेस म्हणजे गुडघ्यापर्यंतच्या पॅन्टस घातल्या जात. अमीरउमरावांच्या घरांमध्ये मुलाला पहिल्या ब्रीचेस देण्याचा सोहळा केला जाई. त्याला  ‘ब्रीचिंग’ असं म्हणत. 

जगभरात लहान मुलं वयात आल्यानंतर कपड्यांची पद्धत, प्रकार बदलला जातो. त्याचे विविध जागी आणि विविध काळात तपशील वेगवेगळे आहेत पण हे होते नक्की. आपल्याकडे पूर्वी मुलींची साडी नेसण्याची सुरूवात व्हायची. मुलीला पदर येणं म्हणजे मुलगी मोठी होणं हा वाक्प्रचारही याच बदलाशी निगडित आहे. लहान मुलगी ते षोडशा या रूपांतरामध्ये वयाबरोबर स्कर्टची लांबी वाढत जाणे हे ही युरोपियन आणि अमेरिकन इतिहासात दिसून येते. अगदी हल्लीहल्लीपर्यंत आपल्याकडेही वयात येताना हाफपॅण्ट ते फुलपॅण्ट असा मुलांचा प्रवास होत होता. मुलींचा स्कर्ट ते पंजाबी ड्रेस असा प्रवास होत होता. 

यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे समाजातलं स्थान दर्शवणं. समाजातल्या उतरंडीवरचं स्थान हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. व्यवसाय, व्यावसायिक स्थान,  घराणं, जात, वैवाहिक स्थिती, आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टी माणसाचं समाजातलं स्थान ठरवतात. जगभर वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात  या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे कपड्यांमधून दाखवल्या गेलेल्या आहेत.  अमुक जातीच्या पगड्या आणि स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धत, एखाद्या पदाची वस्त्नं वा गणवेश, स्त्रियांच्या गळ्यातलं मंगळसूत्र , स्त्रियांचं लाल आलवण, ब्राह्मणांचं जानवं, भिकबाळीचा मान, किनखापाची वस्त्रं , सम्राज्ञीच्याच पायात असणारं सोन्याचं पैंजण ही काही भारतीय उदाहरणं.  

प्राचीन रोमन काळात टोगा या वस्त्राचा मान असलेले महत्वाचे पुरूष, ठराविक प्रकारचं रेशीम वापरण्याची परवानगी असलेले चौदाव्या शतकातले इंग्लंडमधले अमीरउमराव, या संदर्भातले चौदाव्या शतकातले इंग्लंडमधले नियम,  ठराविक प्रकारची नक्षी असलेले कपडे वापरायची परवानगी असलेले आफ्रिकेतील एका जमातीचे राजे इत्यादी काही देशोदेशीची उदाहरणं.

लिंग, वय, सामाजिक स्थान याला धरून येणारे राहणीचे नियम, बदलाचे सोहळे, फरक हे सगळं बदलत बदलत आता इतिहासजमा झालेलं आहे. जीवशास्त्रीय लिंगाचं चिन्ह म्हणून येणारे कपडे हे प्रकरण कालबाह्य होण्याकडे मुंगीच्या गतीनं वाटचाल सुरू झालेली आहे. 

समाजातले त्या त्या लिंगाच्या व्यक्तींचं काम किंवा सामाजिक अस्तित्त्व यात होत गेलेले बदल याला कारणीभूत आहेत. लहान मुलं आणि तरूण मंडळी यांच्या कपड्यांच्यातले फरक आता तितके स्पष्टपणे दिसत नाहीत.  लहान मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून गणलं जाणं आणि लहान मुलांचं बाल्य गायब होणं या दोन्ही गोष्टींची ही नांदी आहे. ठराविक व्यावसायिक गणवेश सोडले तर सामाजिक स्थानाप्रमाणे कपडे घालण्याचे कायदे निघून गेलेले आहेत. हे समानतेकडे एक पाऊल म्हणून बघता येऊ शकते. 

माणसानं कापड, रंग यांच्या साहाय्यानं शरीर झाकायला आणि सजवायला सुरू केलं तेव्हापासून कातडीवरचं आवरण हे त्या माणसाबद्दल बरंच काही सांगणारी दृश्यभाषा आहे. आणि ती वाचायला शिकणं ही मजेची गोष्ट आहे. 

(लेखिका वेशभूषाकार असून, या विषयात ‘जॉजिर्या’ विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलेले आहे.)
(ही लेखमाला दर महिन्याच्या शेवटच्या 
मंगळवारी प्रसिद्ध होईल)

sakhi@lokmat.com

Web Title: costume makes wordless dialogue! It is intresting to understand this communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.