Corona and 'she' | कोरोना आणि ‘ती’

कोरोना आणि ‘ती’

- हिमानी नीलेश


छायाचित्रामधला एखाद्या बॉम्बशोध पथकासारखा ‘ती’चा पोशाख बघून मी हादरले होते. एवढय़ाशा विषाणूनं घातलेलं थैमान तिनं अंगावर घेतलं होतं. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या रु ग्णांवर ती उपचार करत होती. ती होतीच तशी! या लेखात मी तिचा उल्लेख ती म्हणूनच करेन, कारण प्रसिद्धीपासून चार हात लांब राहाणंच ती पसंत करते. 
परीक्षेत आम्ही जेव्हा अनेक प्रश्न ऑप्शनला टाकत असू (ऑप्शनला टाकणं म्हणजे त्या मुद्दय़ांचा अभ्यासच न करणं) तेव्हा, ‘हृदय आणि फुप्फुस मी ऑप्शनला टाकलंय’ असं म्हणण्याची मुभा तिला नव्हती. तिनं ते स्वीकारलं होतं; नव्हे गुणवत्तेच्या जोरावर जिद्दीनं मिळवलं होतं. भारतात, शहरात डॉक्टरकी न करता खेडोपाडय़ात जाऊन गोरगरिबांवर उपचार करण्याचं व्रत तिनं घेतलं होतं. लग्न करून ती ऑस्ट्रेलियात आली. तिच्या नव-याला एका खाणीच्या प्रकल्पावर नोकरी मिळाली होती. इथे येऊन तिनं उच्चशिक्षण घेतलं. त्यानंतर साडेचार वर्षानी आम्ही अँडलेडला आलो. तेव्हा मुद्दाम आडवाट करून तिला त्या ओसाड गावी भेटायला गेलो. घरात नावालासुद्धा फर्निचर नव्हतं. मिनिमलिझमचं फॅड येण्याअगोदर ती दोघं  साधी राहणी, उच्चविचारसरणी तंतोतंत आचरत होती. आमचं आपुलकीनं आदरातिथ्य केल्यावर आमच्या भरपेट गप्पा झाल्या. आता काही वर्षे  बदली झाल्यानं ती गावाकडून शहरात राहणार होती. ती दोघं अमाप पैसा कमावीत आणि त्यातलं अगदी गरजेपुरतं ठेवून, कुठे कुठे निनावी दान करीत. कुठल्याही संकटप्रसंगी हे दांपत्य कमालीचं सक्रिय असे. अगदी अलीकडेच महाराष्ट्रात पूर आला; पाठवली  लाखोंची मदत!, ऑस्ट्रेलियात वणवे पेटले, दिली भरगोस देणगी! असं त्यांचं चालूच असतं. म्हणूनच कोरोनाच्या बातम्या कानावर येऊ लागल्या तेव्हा मी काळजीनं तिला मेसेज पाठविला. कोरोनामुळे इकडे वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. शहर बंदी होईल की काय असं वाटून टोळधाडीप्रमाणो लोक खरेदी करीत सुटले होते. बाजारपेठातील फडताळांचे खणच्या खण रिकामे होत होते.काही वस्तू बाजारपेठेतून बघता बघता दिसेनाशा झाल्या
 त्यावरून कुठेतरी हातापायीपण झाली होती. हे सर्व नेमकं काय होतं? सावधगिरी? आगतिकता, की अज्ञाताची भीती? 
याचबरोबर सरकारी यंत्रणा कार्यरत झाल्या होत्या. जमावबंदी झाली, ऑस्ट्रेलियाच्या बंदरावर जहाजांना मनाई करण्यात आली, शाळा-कॉलेजात सभा, सहली रद्द झाल्या. अजूनतरी दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाबाधित  रुग्णांची संख्या हातावरच्या बोटांपेक्षाही कमीच होती. सार्वजनिक वाचनालयं, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी मोफत हॅण्ड सॅनेटायझर दिसू लागले, लोक ते आवर्जून वापरत होते, कुठे काय उपलब्ध आहे याची माहिती व्हॉट्सअँपवरून फिरू लागली. माझ्या इतर काही डॉक्टर मैत्रिणींनी आपापल्या परीनं सतर्कता निर्माण केली. काहींनी व्हिडीओ केले, काहींनी याचिकेवर सही घेण्याचं काम केलं, काही  महत्वाच्या दुकानांनी दिवसाचे काही तास फक्त वृद्ध, अपंग नि आजारी व्यक्तींसाठी खुले केले, काहींनी त्यांचासाठी खरेदी करून घरपोच पोचविण्याची तयारी दाखिवली  लोक एकमेकांना सजगपणो मदत करू लागले. अनेक सुजाण सामान्य नागरिकांनी अफवा पसरू न देता या विषाणूशी दोन हात करण्यास कंबर कसली. 
हे सगळं चालू असताना मी तिला फोन लावला तरी संपर्क होईना. मी तिच्या मेसेजची वाट बघत होते आणि तिनं मला तो फोटो पाठवला. मला थेट बाबा आमटे नि प्रकाश आमटय़ांचीच आठवण झाली. भरपूर पांढरी नि निळी आवरणं घातलेल्या त्या पोशाखातून मला दिसत होते तिचे हसरे, शांत नि आश्वासक डोळे ! निष्काम कर्मयोग्यासारखी ही साध्वी अहोरात्र यमदूतांशी झटत होती. तीच काय; विविध देशात, जगात प्रत्येक सुजाण नागरिक, कोरोनावर लस शोधणारे शास्त्रज्ञ, प्रशासन यंत्रणा,कैक नर्सेस नि डॉक्टर्स शूर योद्धाप्रमाणो झटत आहेत. परवा वणवे पेटले होते,  काल पुरानं जेरीस आणलं होतं, आज कोरोनान हैदोस घातला आहे. लाटा येतात, उंचावतात नि विरतात! शेवटी किना-या वर आपण कुठल्या पाऊलखुणा उमटवीत जातो तेच महत्त्वाचं नाही का?
आता कुठे कुठे रुग्ण तूर्तास बरे झाल्याच्या बातम्याही तूर्तास येऊ लागल्या आहेत. आज सकाळीच बाहेर स्वच्छ ऊन पडलं होत, मार्चमध्ये अंगणातले लाल     गुलाब फुलले होते, मधमाश्या मध पीत होत्या, पंचरंगी लोर्किट पक्षी पाणी उडवत अंघोळ करीत होते.   मानवीय जीवनात उलथापालथ झाली असली तरी निसर्गाचं नित्यचक्र सुरूच होतं, आणि माझ्या काळजीच्या भल्या मोठय़ा मेसेजवर तिचं उत्तर उमललं होतं. 
‘दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी 
अकस्मात आकारले काळमोडी 
पुढे सर्व जाईल, काही नं राहे 
मना संत आनंत शोधूनी पाहे !!’

 

(अँडलेडच्या प्लेफोर्ड लायब्ररीत कार्यरत असलेल्या लेखिका दीर्घकाळ ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत.)

himaninilesh123@gmail.com

 

 

Web Title: Corona and 'she'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.