The conflict of Refugees | रेफ्यूजींचा संघर्ष
रेफ्यूजींचा संघर्ष

-शुभांगी जगताप गबाले

इंग्लंडच्या अस्सल आर्किटेक्चरल सौंदर्याची एक अनुभूती तिथल्या गावा-शहरांतून येता-जाता दिसत राहणा-या चर्चच्या रेखीव पाषाणी इमारतींमधून घेता येते.  त्या त्या जागेचा अन् सोबतच त्या वास्तुरचनेचा, स्थापत्यशास्त्राचा हजारो वर्षं पुराना इतिहास उजागर करत ही चर्चेस भक्कमपणे उभी  असतात. याखेरीज धार्मिक उपासनेचं अस्तित्व ओलांडून कित्येक ठिकाणी त्यांचं अंतरंग काही निराळ्याच गोष्टींनी उजळून निघालेलं पाहता येतं. आपल्याकडची मंदिरं, मस्जिद आदी प्रार्थनास्थळं जशी निव्वळ उपासनेशीच जखडून असतात तसं चर्चबाबत म्हणता येत नाही. इथल्या बहुतेक गावातून ही गिरिजाघरं आतून कधी सुबक-सुंदर कॅफेज वा टी हाउसेसमध्ये रूपांतरित झालेली दिसतात, तर कधी त्यांना सुसज्ज ग्रंथालयांचं रूपडं मिळालेलं असतं.  काही जागांवर समाज संस्थांची रितसर कार्यालयं सक्रिय असतात. अनेक जागी आर्ट आणि क्राफ्टची देखणी दुकानंही थाटलेली दिसतात. नियमित मीट-अप्स, सोशल इव्हेंट्स, वर्कशॉप्स  आणि प्रदर्शनांसाठी चर्चचे हॉल उपलब्ध असतात. ख्रिस्ती प्रार्थनास्थळांच्या या जागा अशा जिवंत माणसांच्या  व्यवहारी उपयोगाकरता सहज खुल्या करून दिल्या जातात.
अठराव्या शतकातला वारसा जपत उभी असलेली स्वींडनमधली सेंट ल्युक चर्चची इमारत म्हणजेही हार्बर प्रोजेक्टचं ऐसपैस ऑफिसच आहे. रेफ्युजीमधल्या माणसाविषयी खास आत्मीयता बाळगून असलेली ही एनजीओ. कोसोव्हो युद्ध अन् त्यानं जन्माला घातलेले असंख्य निर्वासित या धर्तीवर आकाराला आलेली.

तर, बारीकसारीक व्यक्तिगत तपशील मागणारा, रेफ्युजी या शब्दाबाबत तुमची आस्था तपासणारा भलामोठा अर्ज, प्रत्यक्ष इंटरव्ह्यू, मग कसून बॅकग्राउण्ड तपास करणारी डीबीएस पडताळणी, व्हिसा-पासपोर्टची तपासणी ही सगळी रीतसर औपचारिकता पार करून मी हार्बर प्रोजेक्टच्या कामाशी जोडले गेले.

कायदेशीर बाबींची पूर्तता अन् कागदपत्रांची जुळवाजुळव यामध्ये निर्वासिताना सहाय्य करणं हे  हार्बरचं मुख्य काम असलं तरी इतरही असंख्य अडचणी सोडवत त्यांच्या इथल्या सुलभ, सुखकर वास्तव्याकरता  ही एनजीओ मनापासून धडपडते. अर्थातच, निर्वासित म्हणून स्वींडनला दाखल झालेल्या कुणाहीसाठी हार्बरच ऑफिस दुसरं घर बनून जातं. 

सकाळी दहाला हार्बरच ऑफिस सुरू होतं. दुपारच्या दोनपर्यंत मग दरवाजा उघडझाप होत राहतो. एकेकटे, घोळक्यानं, कुटुंबासहीत स्त्री पुरुष येत-जात राहातात. शंका, प्रश्न, ताण, अज्ञान, भीती, अनिश्चितता.. सगळं सोबत घेऊन. अन् असलीच तर कागदपत्रं दार उघडून आत आले की ते व्हिजिटर्स होऊन जातात. रेफ्युजी हा शब्द उच्चारलाच जात नाही त्यांच्याकरता. मागेही नाही, पुढेही नाही. 
हा शब्द त्यांना प्रस्थापित जगापासून वेगळं करतो, ‘अदर’ ठरवतो म्हणून कदाचित. या शब्दाभोवती कितीतरी राजकीय, सामाजिक संदर्भ घोंघावतात. संदिग्ध आणि गहिरे.   मुळात रेफ्यूजी ही काही व्यक्तीची ओळख असू शकत नाही. ती त्यांची तात्पुरती स्थिती केवळ. धर्म-संस्कृतीच्या राजकारणी डावपेचात त्यांच्या वाट्याला आलेली. एक स्टेटस. चिवट निग्रही हद्दी सर करून परक्या प्रांतात आल्यावर ते कायदेशीरपणे  मिळण्याकरता केवढीतरी वणवण. ते नकोसंही अन् हवंसही. हक्काचं असूनही ते सिद्ध करणं भयंकर अवघड. ते तसं सिद्ध होऊ नये म्हणून निबर, संवेदनाशून्य नियमांनी गच्च आवळलेली चौफेर सुसज्ज यंत्नणा. हार्बरच्या  दारातून  आत येताच ड्रॉप इन सेंटर सुरू होतं. रेफ्यूजी शब्दाशी जोडलेलं कुणीही केव्हाही विनासूचना बिनदिक्कत इथं येऊ शकतं. काहीही काम घेऊन वा नुसतं विसावण्याकरताही. म्हणून ते ड्रॉप इन. चहा-कॉफी, फळं, बिस्किटं आणि इतरही बरेच पदार्थ इथे पोहोचलेल्या प्रत्येकाला मिळतील अशी चोख व्यवस्था.  याखेरीज नेमानं चालणारा इंग्लिश क्लास, स्त्रियांसाठी शिवणक्लास, विणकामाचा क्लास, आर्ट क्लास, मेडिटेशन सेशन, नोकरीसाठीचं मार्गदर्शन, किचनमध्ये रांधले जाणारे नाना देशाचे पदार्थ असं बरंच काही एकेका रूममध्ये सुरू असतं. ज्याला जिथे रमावंसं वाटतं तो तिथं हजेरी लावतो. काहीजण कागदपत्रांवर काम करत, त्याबाबत चर्चा करत ड्रॉप इनमध्ये बसून असतात. उरलेले निवांत खातपीत गप्पांमध्ये मश्गुल राहतात. 

 

खरं तर रेफ्यूजी हा शब्द निर्वासित या अर्थानं सरधोपट वापरतो आपण. पण ती मुळात एक कायदेशीर टर्म आहे. केवळ बॉर्डर लांघून आत आलं की निर्वासित रेफ्यूजी होत नाहीत. कायद्यान्वये ते स्टेटस मिळणं, मिळवणं हाच त्यांचा मुख्य झगडा असतो. जोवर ते मिळत नाही तोवर ते केवळ असायलम सीकर्स असतात. मागचं जगणं पुसून जिंदगीचा नवा डाव रचण्यासाठी रेफ्यूजी स्टेटसच्या प्रतीक्षेत अगणित आव्हानं पार करत राहणारे..  हा काळ कितीही लांबत जाऊ शकतो. महिनोन्महिने. सालोसाल. 

मुळात स्वींडन हे यूकेमधलं एक महत्त्वाचं डिस्पर्जल सेंटर आहे. बॉर्डर क्रॉॅस करून इंग्लंडला पोहोचणारे (विनापरवाना) जे कुणी इमिग्रेशन विभागाच्या कसून चालणा-या चौकशा, तपासणीला तोंड देऊन, अतिशय दमवणारा इंटरव्ह्यू रितसर पार करतात त्यांना असायलम क्लेमची म्हणजे या देशात निर्वासित म्हणून कायदेशीरपणे राहाण्याची परवानगी मागणारा अर्ज करण्याची अनुमती दिली जाते. हा क्लेम केल्यानंतर ते ठरतात असायलम सीकर्स. 

प्रत्येक निर्वासिताला असं होस्ट देशातल्या यंत्रणेसमोर त्यानं त्याचा देश का सोडला हे खात्रीशीर पटवून द्यावं लागतं. हे पटवू न शकणा-या बहुतेकांना मात्र  ताब्यात घेऊन विनापरवाना हद्द ओलांडल्याच्या आरोपाखाली डिटेन्शन सेंटरला पाठवलं जातं. निर्वासितांच्या आयुष्यातला हा सर्वात घातकी नि काळोखा कोपरा. 

डिटेन्शनचा फेरा मागे न लागता ज्यांना रितसर असायलम क्लेमची संधी मिळते त्यांची होम ऑफिसकडून रेफ्यूजी होस्टेलवर तात्पुरती सोय केली जाते. नंतर काहीच दिवसात त्यांना जवळपासच्या डिस्पर्जल सेंटरपैकी कुठच्याही एका गावा-शहरात पाठवलं जातं. तिथल्या एखाद्या शेअरिंग हाऊसमध्ये मग ते राहू लागतात. स्वींडन त्यापैकी एक म्हणून इथे निर्वासित सतत येत जात राहातात.

दिनरात घरातल्या पुरुषी छळाचा सामना करत असतानाच तालिबानी शिस्तीचीही बळी ठरलेली अफगाणची नाहिद सर्वस्व गुंडाळून पहिल्यांदा लंडनच्या हेथ्रो विमानतळावर पोहोचली तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरच्या प्रत्येक प्रश्नावर फक्त धाय मोकलून रडत होती. भीतीनं थरथरत होती. काही तासात पहिला इंटरव्ह्यू पार पडला अन् तिला जरासं शांत वाटलं. पण पुढची अनिश्चितता आतून पोखरत होतीच. ‘इतकी अवघड परीक्षा मी कधी दिली नव्हती याआधी.’  म्हणत ती सांगते, ‘त्यावेळी भीतीनं, टेन्शननं मला माझ्याच घराचा पत्ता आठवेना. माझ्याच गावच्या रस्त्यांची नाव सांगता येईना. प्रश्नांचा भडिमार नुसता. अखेर तीनेक तास कसून चौकशी झाल्यानंतर मला क्रॉयडॉनच्या रेफ्यूजी होस्टेलवर पाठवलं गेलं. तिथे माझ्यासारख्या अनेक मुली-बायका पाहून जिवात जीव आला. इराण, इरिट्रिया, कुवेत, कांगो, इथिओपिया अशा देशांतून अनेकजणी कसकसल्या अत्याचारातून सुटका करून घ्यायला आल्या होत्या. अफगाणी कुणीच नव्हतं. तोडक्यामोडक्या इंग्लिशमधून आम्ही बोलायचो. आपापल्या कहाण्या सुनावायचो. कुणीतरी सोबत आहे या विचारानंच बरं वाटायचं.’ तिनेक आठवड्यांनी तिथून स्वींडनला पोहोचलेली नाहिद तिच्या रेफ्यूजीपणाचा प्रवास असा सांगत असते. 
मी मात्र   विचार करत राहाते, ज्या सलामतीच्या आशेनं नाहिदसारख्या अनेकजणी अशा परक्या दुनियेची वाट धरतात ती तरी त्यांच्यासाठी खरोखर सुरक्षित असते का. त्यांच्यातल्या बाईपणासाठी?

(लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून, निर्वासितांसाठी काम करणा-या संस्थेशी संलग्न आहेत)

shubhangip.2087@gmail.com

Web Title: The conflict of Refugees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.