Clutters by children in house and irritability of parents | मुलांचा पसारा आणि पालकांची चिडचिड

मुलांचा पसारा आणि पालकांची चिडचिड

- रंजना बाजी

नवीन बाळ घरात येतं तेव्हा मोठ्या जल्लोषानं त्याचं स्वागत होतं. ते पाळण्यात असेपर्यंत छान असतं. मग हळूहळू ते घरात वावरायला लागतं. सगळीकडच्या वेगवेगळ्या वस्तू हाताळायला लागतं, घेतलेल्या वस्तू त्याला पाहिजे त्या पद्धतीनं, त्याला पाहिजे तिथे ठेवायला लागतं; आणि त्या वेळी मुलानं केलेला ‘पसारा’ हा मुद्दा पुढे येतो.

आपण बऱ्याचदा पैसे खर्च करून, वेगवेगळ्या, सुंदर, महागाच्या वस्तू आणून घर सजवलेलं असतं. आपल्या आवडीनुसार त्यांच्या जागा ठरवलेल्या असतात. मूल त्यात स्वत:ची लुडबूड सुरू करतं . मग याचं काय करायचं , मुलाला ‘शिस्त’ कशी लावायची, घरी कुणी आलं तर ‘पसारा’ बघून काय म्हणेल असे बरेच प्रश्न उभे राहतात.

आपण केवळ वयानं मोठे असल्यामुळे आपल्याला सगळं माहीत आहे, त्यामुळे मुलानं आपण सांगू तसं वागलं पाहिजे हा एक 'पॉवर फॅक्टर'ही त्यात अध्यहृत असतो.

मग मुलांना कुठला अवकाश आपण देऊ करतोय ? मुलांना कोणते संदेश आपल्या अशा वागण्यातून जात आहेत?

मुलाला एखादी गोष्ट करू नको असं म्हणण्याआधी ते ती गोष्ट का करतं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे.

आपल्या साक्षर असण्याचा तोटा असा की, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात आणि हल्ली नेटवरती शोधतो. प्रत्येक मूल वेगळं असतं. पुस्तकात वाचलेली गोष्ट आपल्या मुलाला लागू पडेलच असं नाही. त्यामुळे मूल समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या समोर वावरत असणाऱ्या आपल्या मुलाचं सतत सखोल निरीक्षण करणं. आपल्या भोवतालच्या जगाबद्दल मुलाला प्रचंड कुतूहल असतं. ते जग समजावून घ्यायची निसर्गानं दिलेली साधनं म्हणजे ज्ञानेंद्रियं. चव, स्पर्श, श्रुती, नजर आणि गंध याद्वारे मूल जगाची ओळख करून घेत असतं. मुलांना इथे प्रत्यक्ष अनुभव हवा असतो. त्याबद्दलची माहिती नव्हे.

मुलांमधे असलेला खेळकरपणा आणि कुतूहल यातून मग आपण ज्याला पसारा म्हणतो त्या गोष्टी घडायला सुरुवात होते. झोपल्या जागी हाताला लागेल ते तोंडात घालणं, फेकणं इथून सुरुवात होते. मुलाला लक्षात येतं की, वस्तू खाली टाकली की वेगवेगळे आवाज येतात, सोफ्यावर उड्या मारल्या की आपण आपोआप वर खाली होतो, पिठात हात घातला की मऊ मऊ लागतं, एखादं भांडं जोरात खाली टाकलं की ते गोल गोल फिरतं. अशा असंख्य अनुभवायच्या गोष्टी आजूबाजूला जणू मुलाला साद घालत असतात.

मूल मोठं होईल तसतशी त्याची व्याप्ती वाढत जाते.

मुलाला भोवती घडत असलेल्या प्रक्रियांबद्दल खूपच कुतूहल असतं. या प्रक्रिया ते बघतं आणि त्या स्वत: करून बघायचा प्रयत्न करतं.

घरात स्वयंपाक चालू असतो. त्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात. ढवळणं, लाटणं, पदार्थ एकमेकात मिसळणं, चिरणं, बारीक करणं, पाणी घालणं, तेल घालणं, पातेली गॅसवर ठेवणं, उतरवणं, स्वच्छता करणं, इ. यासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तू वापरल्या जात असतात. मूल हे लक्ष देऊन बघत असतं. त्याला स्वत: या गोष्टी करून बघायच्या असतात. उदाहरणार्थ, मूल भाजी करण्याची पूर्ण प्रक्रिया बघेल. मग कधी चिरणं, कधी फोडणी घालणं, कधी ढवळणं अशा तुकड्यांनी तो अनुभव पुन्हा स्वत:च्या पद्धतीनं मांडून बघेल. त्यासाठी योग्य अशा वस्तू ते निवडतं. चिरणं करून बघायचं असेल तर भाजी सारखी दिसणारी वस्तू, सुरी किंवा विळीसारखी दिसणारी वस्तू घेऊन ते चिरण्याचा अनुभव घेईल. अशा प्रकारे अनुभवाच्या मांडणीतून मूल प्रक्रिया समजून घेतं. मग ते चादरीचं घर बनवेल, खुर्चीची गाडी आणि दोन वाट्यांचा मिक्सर ! याला आपण मुलांचं खेळणं म्हणतो आणि मुलांच्या प्रक्रियेला पसारा ! खरं म्हणजे ही मुलांची आकलनाची अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक पद्धत ( नॅचरल लर्निंग) आहे. या प्रक्रियेत लागणाऱ्या गोष्टी मूल स्वत: बनवून घेतं किंवा तशी दिसणारी गोष्ट शोधून वापरतं. या गोष्टीचा या खेळण्यापुरताच उपयोग असतो. आपण मुलाच्या या ‘सहज’ आकलन प्रक्रिया गंभीरपणे समजून घेतल्या पाहिजेत. मूल अशा पद्धतीनं वस्तू मांडून काही करत असेल तर त्याला पसारा समजून तो आवरणं हीच आपली पहिली सहज प्रतिक्रिया असते .

मूल आपल्या मधे मधे येतं, आपल्या गोष्टींना हात लावतं म्हणून आपण त्यांना डुप्लिकेट गोष्टी म्हणजे तयार खेळणी आणून देतो, जशी भातुकली. मुलांना खरं जग अनुभवायचं असतं, पण आपण त्यांना लुटुपुटूच्या जगात पाठवतो. मूल स्वत: अनुभवाच्या संदर्भानुसार गोष्टी (जशी खुर्चीची गाडी) बनवून घेत असतंच; पण आपण हा संदर्भ नसलेली तयार खेळणी मधे आणून त्यांची ती शृंखला तोडतो आणि सर्जनशीलताही ! दुसरं म्हणजे त्यांना तयार खेळण्यांच्या अमानुष बाजाराचा ग्राहक बनवतो.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची रचना. ही बहुतेक मोठ्यांचा वावर लक्षात घेऊनच केलेली असते. स्वयंपाकघरातले ओटे आणि बंद कपाटं, डायनिंग टेबल, बेड सगळं मोठ्यांच्या सोयीनुसार !

मग मुलांना प्रक्रिया दिसणार कशा ? मूल बघणार काय ? काय समजून घेणार ? मग मुलाचं घर कुठे आहे?

उलट मोठ्यांच्या या वागण्यातून जाणारे 'ॲथॉरिटी' चे संदेश मुलांना 'ॲथॉरिटी' शिकवतात. कारण मोठ्यांच्या प्रत्येक कृतीचं मूल निरीक्षण करून अनुकरण करत असतं. खरंतर मुलांना पाहिजे असलेल्या गोष्टी साध्या आहेत, प्रेम, स्वातंत्र्य, विश्वास आणि सुरक्षितता. या गोष्टी मुलांना मिळाल्या तर त्यांचं जगणं आणि शिकणं बहरतं. मूल आणि पसारा या निरीक्षण पद्धतीनं समजून घेतला तर मग तो कसा, कधी, कोणी आवरायचा, ते आवरणं अनुकरणातून मूल कसं शिकेल, मुलांना इजा होऊ शकेल अशा किंवा महागाच्या वस्तू त्यांच्या दृष्टीआड ठेवता येतील का, हे लक्षात येत जाईल .

महत्त्वाचं म्हणजे आपण मोठ्यांनीसुद्धा आपण करत असलेल्या कामाच्या ‘पसाऱ्या’त मुलांना सोबत घेऊन मुलाचा ‘पसारा’ करण्याचा आनंद एकत्र अनुभवला पाहिजे. घर सगळ्यांचं हवं हेच खरं !

( लेखिका एक्झिस्टेंशियल नॉलेज फाउंडेशन या संस्थेत मुलांचं सहज शिक्षण या विषयात संशोधन करतात.)

dranjana12@gmail.com

Web Title: Clutters by children in house and irritability of parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.