Close relation between Local And Mumbai women. | मुंबईतल्या महिलांची जीवाभावाची लोकल

मुंबईतल्या महिलांची जीवाभावाची लोकल

- मृण्मयी रानडे

वयाला 15 वर्षं पूर्ण होण्याआधी माझा ट्रेनचा नियमित प्रवास सुरू झाला तो अकरावीसाठी माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर. बोरिवली ते माटुंगा रोड असा पश्चिम रेल्वेवरचा प्रवास - एका फेरीची ४० मिनिटं, जाऊन येऊन किमान दीड तास. त्याआधी केवळ नातेवाईकांकडे जाताना किंवा अगदी दुर्मिळ म्हणजे चर्चगेट किंवा व्हीटीला गेलं आईबाबांबरोबर फिरायला तर. अकरावीत जो प्रवास सुरू झाला तो जवळपास गेली 35 वर्ष अव्याहत सुरू आहे.

माझं लोकलवरचं प्रेम माझ्या वडिलांकडून आलेलं. त्यांना ट्रेनच्या वेळा, कुठली गाडी कोणत्या फलाटावर आली, किती वाजता आली, किती मिनिटात पोचली, डब्यांची रचना कशी होती, यात प्रचंड रस. १९७०-८० च्या दशकातील ही गोष्ट. बाबा घरी आले की रोज ही चर्चा व्हायची. माझ्या आईलाही काही वर्षांनंतर बदलीमुळे लांब जायला लागलं, तिचाही प्रवास सुरू झाला. अकरावी-बारावी दुपारचं कॉलेज असायचं, पण सिनियर कॉलेजला गेल्यावर मात्र सकाळी ७.०५ चं लेक्चर असायचं. त्याच्यासाठी आम्ही बोरिवलीहून ६.२०ची लोकल पकडायचो, सात वाजता माटुंग्याला पोचायचो आणि वेळेत लेक्चरला बसायचो. कॉलेज स्टेशनच्या अगदी समोर होतं. कॉलेजच्या जवळच राहणाऱ्या मुली मात्र कधीच वेळेवर यायच्या नाहीत, असो. 

त्यानंतर मी नोकरीसाठी मात्र थेट चर्चगेटला जाऊ लागले, तसा दीर्घ प्रवास करायला मिळाला. तेव्हा हा सगळा प्रवास सेकंड क्लासचा असायचा कारण फर्स्टक्लास परवडला असता तरी गरज वाटत नव्हती फार त्याची, कारण बोरिवली आणि चर्चगेट या दोन्ही ठिकाणाहून ट्रेन सुरू होतात, त्यामुळे गर्दीत उभं राहावं लागायचा वगैरे प्रश्न नव्हता. कॉलेजच्या प्रवासामध्ये अर्थातच मैत्रिणींचा ग्रुप होता. एकाच गाडीला एका विशिष्ट डब्यातल्या ठराविक कोपऱ्यात आम्ही एकमेकींना शोधायचो. ट्रेनमधले फेरीवाले त्या वेळीही होते. त्यांच्याच कृपेने मॅचिंग कानातले, बांगड्या वगैरेंचा उत्तम संच जमवला होता. मुंबईच्या ट्रेनमधले विक्रेते ही खूप जुनी एक संस्था आहे असंच म्हणायला पाहिजे. ट्रेनमध्ये कानातले विकणारे, सफरचंद, संत्री विकणाऱ्या बाया असायच्या. खाण्यापिण्याचे पदार्थ घेण्यात तेव्हा इंटरेस्ट नसायचा फार पण नोकरीला लागल्यावर त्याचा अनुभव जास्त घेतला. विशिष्ट पदार्थ विकणाऱ्या बायका, त्यांच्या ठराविक ट्रेन, ठराविक ग्राहक, असं खूप वर्षांचं गणित किंवा समीकरण आहे. लेडीज स्पेशलमध्ये असणाऱ्या बाईकडच्या पुरणपोळ्या, किंवा अमुक एका बाईकडचे सामोसे, लोणची, बाकरवड्या, ढोकळा, वगैरे गणितं खूप वर्षानुवर्ष ठरलेली. एखाद्या दिवशी पैसे नसतील, किंवा सुट्टे नसतील तर उद्या ट्रेनला आहे ना, तेव्हा दे, हे संभाषण अगदी कॉमन. विकणारे पुरुषही असतातच, फक्त खाद्यपदार्थ विकणारे पुरुष बायकांच्या डब्यात फार नसतात, चणे दाणे विकणारे सोडून. ते मात्र पुरुष असतात. 

मुंबईत अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत ९ डब्यांची ट्रेन होती, त्याच्यात एकच डबा बायकांचा असायचा. माझी आई नोकरी करत होती त्या काळात कधीतरी दुसरा डबा महिलांना मिळाला आणि आई सांगते, तेव्हा इतका आनंद झाला होता की आता आपल्याला अजून एक मोठा डबा मिळाला, कदाचित बसायला नाही मिळणार पण थोडा आरामात प्रवास करता येईल. मग काही काळाने ह्या गाड्या बारा डब्यांच्या झाल्या, त्यात तीन बायकांचे डबे असतात दुसऱ्या वर्गाचे आणि तीन छोटे पहिल्या वर्गाचे. आता गेली काही वर्षे पंधरा डब्यांच्यासुद्धा काही लोकल आहेत. बायकांसाठी जागा त्यात खूप जास्त असते. 

 

पश्चिम रेल्वेने लेडीज स्पेशल ट्रेन सुरू केली, म्हणजे काय तर अख्खी नऊ डब्यांची गाडी फक्त बायकांसाठी. तेव्हा पुरुषांनी यावर खूप टीका केली, खूप म्हणजे खूप चेष्टा झाली पण अशी लेडीज स्पेशल असणं आणि ती रोज पूर्णपणे खचाखच भरलेली धावणं, यावरून हे सिद्ध होतं की किती बायकांना लांबवरचा प्रवास कामासाठी करावा लागतो. आणि आता तर ह्या लेडीज स्पेशल बारा डब्यांच्या आहेत. एका डब्यात कमीत कमी दोनशे बायका हा माझा अगदी साधा अंदाज, म्हणजे किमान अडीच हजार बायका एका वेळेला एका गाडीतून प्रवास करतात. लेडीज स्पेशल व्हीटीला किंवा चर्चगेटला पोहोचते तेव्हा स्टेशन बायकांनी फुलून जातं. 

लेडीज स्पेशल ही काळाची गरज होती आणि त्यांना कायमच तुफान गर्दी असते. 

लोकल मुंबईमधल्या बायकांसाठी आवश्यक तर आहेच, कारण कामाची जागा आणि राहायची जागा यातलं अंतर बाकी सगळ्या शहरांचा विचार केला तर मुंबईत ते सगळ्यात जास्त आहे. हे अंतर कमीत कमी वेळात, कमीत कमी पैशात, बर्‍यापैकी विश्वासार्ह वेळात आणि सुरक्षितपणे पार करण्याचा मुंबईतला एकमेव मार्ग ट्रेन हा आहे. मुंबईतली बस अगदी आत्ता आत्तापर्यंत नावाप्रमाणे बेस्ट होती, अजूनही तशी बरी आहे, पण तो पर्याय फार कमी लोकांना उपलब्ध आहे. कारण बस असली तरी ती धावणार मुंबईतल्या रस्त्यावरूनच. त्यामुळे मुंबईत ट्रेन हा सर्वच माणसांसाठी खूपच सोयीचा मार्ग आहे. विचार करा, तुम्ही विरारहून चर्चगेटला ऑफिसला जाताय, हे अंतर आहे ५२ किमी. खोपोली ते व्हीटी अंतर आहे ११५ किमी. इतकं अंतर रोज पार करणारे शेकडो लोक आहेत. तीन महिन्यांचा पास काढला तर या प्रवासाचा खर्च नगण्य म्हणावा इतका कमी येतो. पुणे मुंबई करणारेही आहेतच, पण ते लोकलने प्रवासात नाही करत. दक्षिण मुंबईतल्या अनेक श्रीमंत घरांमध्ये दिवसभर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या कित्येक बायका अशा ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या आहेत.

तुम्ही एका गाडीने रोज एका ठराविक वेळेला ठराविक लोकांसोबत प्रवास करणार असाल, जाताना दोन तास येताना दोन तास, तर त्या माणसांशी हळूहळू तुमचे बंध तयार होणार, हे साहजिकच ना! असे बंध निर्माण करणं ही माणसाचीच गरज असावी कारण मुंबईतल्या लोकलमध्ये बायकांचे जसे ग्रुप असतात तसेच पुरुषांचेही असतात, आणि तेही तितकेच घट्ट. बायका डोहाळजेवण साजरं करतात, तर पुरुष वाढदिवस! रोजचं खाणंसुद्धा शेअर करतात, सकाळी अनेक जण उपाशीपोटीच घराबाहेर पडलेले असतात म्हणून आणि संध्याकाळी घरी पोचायला आणि नंतर जेवायला खूप वेळ असतो म्हणून. 

काय नाही करत बायका ट्रेनमध्ये? मेकअप, अगदी आयलायनर सुद्धा धावत्या गाडीत लावणाऱ्या बायका पाहिल्या आहेत मी. दागिने, घड्याळ वगैरे पर्समध्ये टाकायचं घरातनं निघताना आणि ट्रेनमध्ये घालायचं हे तर फार नेहमी घडणारं. अनेक जणी सकाळचा नाश्ताही डब्यात आणतात आणि ट्रेनमध्ये बसायला मिळालं तर बसून किंवा उभ्याने करतात. विणकाम, क्रोशे हे तर असतंच. अनेक जणी भाजी निवडतात, मैत्रिणी त्यात हातभार लावतात. कोणी बसल्या क्षणी झोपी जातात, कोणी फोनवर गप्पा मारतात. कोणी काही छोट्यामोठ्या वस्तू विकतात, साड्या, ड्रेस, दागिने, अशा. हल्ली मोबाइलमुळे अनेक जणी त्यात रंगलेल्या असतात ते सोडा. 

मुंबईकरांची ट्रेनची एक विशिष्ट भाषा आहे, ती रोज प्रवास केल्याशिवाय कळायची नाही. आणि रोज प्रवास करायचा असेल तर कळून घ्यायची गरजही नाही म्हणा. पण मिडल, डोर, क्लेम (बसलेली बाई कुठे उतरणार ते विचारून तिच्या जागी आपलं नाव नोंदवणे), फोर्थ सीट, वगैरे वगैरे. आणि अर्थात १०.०३, ७.१३, ९.२१ वगैरे ज्याची बाहेरचे लोक खूप टिंगल उडवतात. पण आमची ट्रेन खरंच येते १०.०३ला, म्हणून तिच्यावर आमचा इतका जीव.  

मला काही महिन्यांपूर्वी नवीन नोकरी लागली. ऑफिस घरापासून ४ किमी अंतरावर आहे. त्यामुळे गर्दी, उशिरा धावणाऱ्या ट्रेन, त्यात अडकल्यानंतरच्या नकोशा आठवणी यांमुळे हायसं वाटलं असलं तरी रोजचा ट्रेनचा प्रवास हुकणार याची खूप जास्त खंत मनात आहे. आता गेल्या ७-८ महिन्यांत तर स्टेशनचे जिनेही नाही चढलेय. मागच्या आठवड्यात अनेक दिवसांनी स्टेशन परिसरात जाणं झालं तेव्हा समोर एक ट्रेन उभी होती, जुन्या सवयीप्रमाणे धावत धापा टाकत जिना चढून उतरून ती पकडावी असा मोह झालाचा मला. नुसती ट्रेनची उद्घोषणा ऐकून अंगावर काटा आला होता, आता बोला. 

मागच्या आठवड्यात सर्व महिलांना एका विशिष्ट वेळेत लोकलने प्रवास करण्याची सरकारने  मुभा दिल्यानंतर कित्येकींनी सुटकेचा निःश्वास टाकल्याचं मला घरबसल्या ऐकू आलं, कारण त्यांची रोजीरोटी त्यामुळे अनेक महिन्यांनी पुन्हा सुरू होणार होती.

ट्रेन ही मुंबईची जीवनरेखा आहे, मुंबई तिच्या बळावर धावत असते अहोरात्र. दारात मर्सिडीझ असलेलीही रोजचा प्रवास ट्रेनच्या गर्दीतून करत असते कारण तिथे तिला तिचा स्वतंत्र वेळ मिळतो, जिवाभावाच्या सख्या मिळतात, आणि कोणी नको असेल तर चक्क एकांतही मिळतो. घरातल्या आणि ऑफिसातल्या त्रासदायक क्षणांना मागे सारून नवी उमेद या ट्रेनमध्येच मिळते. 

(लेखिका मुक्त पत्र कार आहे.)

mrinmayee22@gmail.com
 

Web Title: Close relation between Local And Mumbai women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.