chotti Bahu in Saheb Biwi aur gangster try to tell the story of a woman beyond an image! | साहेब बिवी और गॅंगस्टरमधील छोटी बहु एका प्रतिमेपलिकडील स्त्रीची गोष्ट  सांगू पाहाते!

साहेब बिवी और गॅंगस्टरमधील छोटी बहु एका प्रतिमेपलिकडील स्त्रीची गोष्ट  सांगू पाहाते!

- माधवी वागेश्वरी 

साहेब बिवी और गँगस्टर’ ही वर्ष 2011 ची फिल्म आहे. ‘रोमॅण्टिक थ्रिलर’ या प्रकारात मोडणारी ही फिल्म तीग्मांशु धुलिया यांनी दिग्दर्शित केली होती. जिम्मी शेरगिल, माही गिल आणि रणदीप हुडा यांच्या यात प्रमुख भूमिका   होत्या. 1962 साली आलेल्या ‘साहेब बिवी और गुलाम’ या सिनेमाच्या नावाशी असलेले साधर्म्य, साधरणपणे सिनेमाचे कथानक घडण्याच्या पार्श्वभूमीमध्ये देखील असलेलं साम्य (मीनाकुमारी आणि गुरु दत्त  यांच्या सिनेमात जमीनदार होते तर इथे उत्तर प्रदेशमधील संस्थानिक आहेत) आणि दोन्हीही सिनेमांतील आसमंत व्यापून टाकणारी ‘छोटी बहु’. 
मीनाकुमारी यांची ‘छोटी बहु’ आजही कासावीस करून सोडते. सिनेमाच्या शेवटी तिचा मृत्यू झाला होता. परंतु 2011 सालची, साधारणपणो 50वर्षांनी आलेली आधुनिक ‘छोटी बहु’ ‘न जाओ संया छुडाके बंया ..’ म्हणत   नव:याच्या पायाशी लोळण घेणारी अजिबात नाही किंबहुना त्यालाच   तोंडघाशी पाडायला लावणारी आहे. 
‘साहेब बिवी और गँगस्टर’ मधील ‘छोटी बहु’ अर्थात माधवीदेवी ( माही      गिल) , सुमन ( दीपल शॉ ), आणि महुआ ( श्रेया नारायण ) या महत्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत. 
उत्तर प्रदेशातील संस्थानिक असलेल्या आदित्य प्रताप सिंग यांची पत्नी असलेली माधवी देवी. संस्थानिकांची सत्ता जाऊन जवळपास 60 वर्षं होऊन गेली तरी त्यांचा मान कमी झालेला नाही. मानाची, आदराची आणी सत्तेची त्यांच्या गुणसूत्रंना  झालेली ‘बुरी आदत’ त्यांची सुटता सुटत नाही. सत्तेसाठी ‘साम’, ‘दाम’, ‘दंड’,’भेद’ याच्याही पुढे जात माणसांचे खून पाडणं सवयीचं झालं आहे. आदित्य प्रताप सिंग आणि माधवी देवी त्यांच्या जुन्या राजवाड्यात राहत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखाची आहे.  तरी देखील राजे लोक बाई ठेवतातच या परंपरेला धरून ठेवणारे आदित्य   प्रताप सिंग. आदित्य प्रताप सिंग रात्री माधवी देवीकडे जात नाहीत त्यांची रात्र महुआकडेच असते. 
दररोजच्या या होणा-या अपमानानं दुखावली गेलेली, लहान सहान गोष्टीवरून आक्रस्ताळेपणा करणारी माधवी देवी सतत दारू आणि सिगरेटच्या नशेत पडून राहाते. प्रेमापेक्षाही संभोगासाठी आतुर असलेली ती मादी आहे.  या माधवीदेवीचे डोके ठिकाणावर नाही, तिच्या मनावर परिणाम  झालेला आहे असं सुरुवातीला दिसतं परंतु तिच्या ‘बडे साहेब’ ने अर्थात आदित्य प्रताप सिंगनं ते मुद्दाम घडवून आणलेलं आहे हे लक्षात येऊ लागतं.  त्यामुळे तिचा नवीन ड्रायव्हर म्हणून रुजू झालेला एक तरूण मुलगा बबलू ( रणदीप हुडा ) याच्याकडे ती आकर्षित होते. 


या सगळ्यात आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी आदित्य प्रताप सिंग काय किंवा बबलू काय हे आणि सिनेमात येणारे सर्व पुरु ष माधवी देवी आणि महुआ आणि एकूणच सगळ्याच बायकांना कसे वापरून घेत राहतात हे दिसत राहतं. यात आदित्य प्रताप सिंगच्या नामधारी संस्थानाच्या मालकीण मात्र आहेत ‘राणीसाहेबा’. ज्यांच्याकडे त्याला दर महिन्याच्या खर्चासाठी जोडे ङिाजवावे लागतात. तेव्हा त्याचा तिळपापड होतो. कारण ही ‘राणीसाहेबा’ म्हणजे त्याची सख्खी आई नव्हे तर त्याच्या वडिलांची म्हणजेच महाराजांची ठेवलेली बाई होती. तिच्या नावावर सगळी संपत्ती करून ते मेले. 
जे सास-यानं केलं तेच आपल्याही नव-यानं करू नये आपली जागा ‘महुआ’ नं घेऊ नये यासाठी माधवीदेवी तडफडत राहाते. 
स्त्री असो किंवा पुरुष इथे कोणीही कोणाचं नाही. कोणीही एकमेकांवर शुद्ध मनानं प्रेम करत नाही. ‘वापरा आणि फेका’ ही केवळ एकच नीती. माधवीदेवी देखील त्याला अपवाद नाही. 
माधवीदेवी संस्थानाची ‘छोटी बहु’ असली तरी शहरी आधुनिक कपडे  घालते. सर्वांसमोर सिगरेट ओढते, दारूचे ग्लास रिचवत राहाते. तिला ना आपल्या नव-याविषयी प्रेम आहे ना त्या बबलूविषयी. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यासाठी आपल्या शारीरिक सौंदर्याचा उपयोग कसा करायचा हे तिला चांगलं ठाऊक आहे. ब्र देखील उच्चारता न येणारी एक मूक बधीर दासी तिच्यासाठी ठेवलेली आहे यातच सगळं काही येतं. 
राणी राजाची ही गोष्ट धोका आणि सत्तेचा हव्यास याने भरलेली आणि  भारलेली आहे. या राजा राणीच्या गोष्टीचं वेगळेपण हे आहे की केवळ राजा नाही तर इथे राणी देखील सत्तेच्या हव्यासापोटी आंधळी झालेली आहे. 
राजानं  अर्थात आदित्य प्रताप सिंगनं आपल्याला मारून टाकू नये म्हणून राणी त्याची ‘वफादार’ बनून राहते. वार करण्याची योग्य संधीची वाट बघत राहते. बबलूचा उपयोग करून ‘महुआ’ चा खून राजाच्याच हातून घडवून आणते. राणी आपल्यावर प्रेमच करते याच्या भ्रमात पूर्णपणो गुरफटून गेलेला बबलू तिचा ‘बडा साहेब’ बनण्याची स्वप्नं पाहू लागतो तेव्हा ‘तू फक्त माझ्या ‘बिस्तर’ मध्ये शोभतोस’ हे त्याला म्हणायला ती मागे पुढे पाहत नाही. 
सगळं काही जगण्या मरण्यापाशी येऊन ठेपतं तेंव्हा बाई काय काय करू  लागते. जगण्यासाठी आवश्यक असलेला आदर, प्रेम आणि माया जर दिली गेली नाही आणि पिढ्यानिपढ्या जर फक्त तुम्हाला वस्तू सारखं आणि केवळ गरज भागवण्यासाठीच वापरल गेलं तर तिचं काय होतं याचं दर्शन या राणीमध्ये घडतं. 


यातील राजे साहेबांची ठेवलेली बाई ‘महुआ’ आपले काम  इमानेइतबारे  करते त्याचा मोबदलाही घेते पंरतु त्याच्यापुढे जर गेली तर तिच्या वाटेला केवळ अपमान येतो. कदाचित राजे साहेब आपल्याकडे रोज येतात म्हणजे  तेही आपल्यावर प्रेम करत असतील या समजुतीत ती असते, ती त्याबद्दल ‘मी तुमची कोण आहे’ असं विचारल्यावर ‘तुम हमारी सिर्फआदत हो’ असं राजा फाडकन तिच्या तोंडावर म्हणतो. तिच्या विषयी गैरसमज करून घेऊन तिच्यावर शिकारी कुत्र सोडायला देखील कमी करत नाही. 
‘जुगनी दम साहेब दा भरदी पर प्यार यार नु करदी’ असं यातल्या राणीचं यथार्त वर्णन करणारं गाणं सिनेमात आहे. खरे तर यात बदल करून ‘ पर प्यार सिर्फ खुद सी करदी’ म्हणणं जास्त योग्य ठरेल. 
या राणीच्या दरबारात एकदा हजेरी लावली पाहिजे.

सगळं काही जगण्या मरण्यापाशी येऊन ठेपतं तेंव्हा बाई काय काय करू  लागते. जगण्यासाठी आवश्यक असलेला आदर, प्रेम 
आणि माया जर दिली गेली नाही आणि पिढ्यानिपढ्या जर फक्त वस्तू सारखं आणि केवळ गरज भागवण्यासाठीच वापरल गेलं तर 
तिचं काय होतं हे  ‘साहेब बिवी और गँगस्टर’ चित्रपटातील
‘छोटी बहु’कडे पाहून उमजतं

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या  अभ्यासक आहेत.)
madhavi.wageshwari@gmail.com  


 

Web Title: chotti Bahu in Saheb Biwi aur gangster try to tell the story of a woman beyond an image!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.