ठळक मुद्देचंदनाचा उत्तम वापर, त्वचेसाठी सुखद ठरू शकतो.

सखी  ऑनलाइन  टीम 

चंदन म्हणजे सौंदर्याची खात्री. पावडर, साबण निवडताना  त्यावर चंदन  असं लिहिलेलं असलं की आपण बिनधास्तपणे ते विकत घेतो. सौंदर्योपचारात  चंदनाचं  महत्त्व पूर्वीच्या काळात होतं तसंच ते आजही आहे. पूर्वी चंदन म्हटलं की चंदनाचं खोड असंच डोळ्यासमोर यायचं. पण आत चंदनाच्या खोडासोबतच  चंदनाची पावडर, तेल अशा  स्वरूपात ते बाजारात मिळतं. पण आताशा चंदन चटकन उपलब्ध होणं तसं अवघडच आहे. जे सहज हल्ली मिळतं ते अस्सल असेलच याची खात्री आजच्या काळात तरी नाही.
 चंदन हे वेदनाशमक,आरामदायी, अ‍ॅण्टिसेप्टिक, बुरशीनाशक आणि थंडावा देणारं असतं. आणि म्हणूनच चंदनाचा उपयोग सौंदर्य उपचार आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. चंदनाचा अर्क वापरून आंघोळीचे साबण, अत्तरं, डिओड्रण्ट्स बनवले जातात. चंदनामुळे चेहर्‍यावरचे डाग जायला, त्वचाविकार बरे व्हायला मदत होते. चंदनाच्या नियमित उपयोगामुळे त्वचा मऊ-मुलायम तर होतचे पण चेहर्‍यावरच्या वयाच्या खुणा लपवण्यासाठीही चंदनाचा उपयोग होतो.
घरच्याघरी चंदनाची पावडर, पेस्ट आणि तेल वापरून  वेगवेगळे पॅक तयार करता येतात.  पण आपण वापरत असलेली चंदनाची पावडर, पेस्ट किंवा तेल हे शुध्द आहे याची  खात्री करुन घ्यायला हवी.  सौंदर्योपचारात  केवळ चंदन न वापरता त्यासोबत मुलतानी माती, टमाटे, गाजर, काकडी यांचाही उपयोग करुन सुंदर-सुगंधी पॅक तयार करता येतात. तर घरच्या घरी हे करुन पहा. 

चेहेर्‍यावरचे मुरूम आणि डाग घालवण्यासाठी


* चंदन हे अ‍ॅण्टिसेप्टीक असल्यानं ते एकाचवेळी मुरूम आणि उष्णतेमुळे येणारे फोड यावर उपचार करू  शकतं. यासाठी चंदनाचं खोड पाण्यासोबत उगळावं. एक चमचाभर चंदनाच्या पेस्टमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा कडूलिंबाच्या पानांची पेस्ट आणि थोडय़ा गुलाब पाकळ्या चुरून टाकाव्या. हा लेप चेहेर्‍यावर जिथे जिथे मुरूम किंवा फोड आहेत तिथे लावावा. दिवसातून दोनदा हा लेप लावल्यास फरक पडतो. जोर्पयत          चेह-यावरचे मुरूम किंवा फोड जात नाहीत तोर्पयत हा उपचार सुरू ठेवावा. 

* चेहेर्‍यावरील डागांसाठी चंदनाचा उपचार करताना  चंदन उगाळून बनवलेली एक चमचा पेस्ट, एक चमचा गाजराचा रस आणि एक चमचा काकडीचा रस घ्यावा. हे सर्व घटक चांगले एकजीव करावे. हा लेप चेहेर्‍याला आणि मानेला लावावा. लेप वाळला की आधी काकडीच्या रसानं आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवावा. 

चंदन स्नान


लग्न ठरल्यावर छान दिसण्यासाठी मुली पार्लरमध्ये जावून नाना प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेण्टस करवून घेतात खरंतर महागडे उपचार बाजूला ठेवून चंदनाचा उपयोग केल्यास प्रभावी आणि टिकाऊ परिणाम मिळतात. त्यातला एक उपाय घरच्या घरी आंघोळीच्या वेळेस करता येतो. यासाठी दोन  चमचे  चंदन उगाळून बनवलेली पेस्ट, एक चमचा हळद,  एक कप बेसन पीठ, एक कप ओट्स पावडर, दोन चमचे मध, दोन  चमचे तेल किंवा दूध घ्यावं.  हे सर्व साहित्य एकत्र करावं. आंघोळीच्या वेळेस या पेस्टनं संपूर्ण शरीराला मसाज करावा. बादलीभर पाण्यात चंदनाच्या तेलाचे चार थेंब टाकावे. आणि त्या पाण्यानं आंघोळ करावी.  यामुळे  संपूर्ण शरीर मऊ आणि तजेलदार होतं. 

चंदन तेलाचा मसाज


चंदनाच्या  तेलात दुसरं एखादं तेल टाकून त्यानं मसाज  करता येतो. दररोज आंघोळ  करताना गरम पाण्यात चंदनाच्या तेलाचे काही थेंब टाकावे. त्या पाण्यानं आंघोळ  केल्यास शरीर आणि मन अगदी ताजंतवानं होतं.  चंदनाचं तेल  इतर तेलांबरोबर एकत्र करून वापरल्यास ते कोरडय़ा त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं.  ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील असेल किंवा ज्यांना दम्याचा विकार आहे त्यांनी मात्र चंदनाचं तेल वापरू नये. 


 

Web Title: Chandansa Badan ! Try this remedy at home, and get soft skin like sandalwood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.