सारा तेंडुलकर. भारतीयांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरची लेक. तिनं केलेली साधी सोशल मीडिया पोस्टही कायम व्हायरल होते. मात्र या आठवड्यात ती वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. तिनं ग्लोबल ई क्रिकेट प्रिमियर लिगमध्ये मुंबई फ्रँचाइजी विकत घेतली आहे. ही लिग म्हणजे ऑनलाइन क्रिकेट गेमिंग लिग आहे. गेल्या वर्षी ही लिग सुरु झाली आणि आता मे मध्ये दुसरा सिझन सुरु होतो आहे. फ्रँचाइजी क्रिकेट हा जगभरच आता अत्यंत नफा कमवून देणारा व्यवसाय झालेला असताना आणि त्याला लाेकप्रियता लाभत असताना आता या नव्या ई क्रिकेट लिगमध्ये सारा तेंडुलकरही आपल्या टिमसह दाखल होते आहे.
सचिनची लेक आणि क्रिकेटशी संबंधित काही करणार तर त्याची जगभर चर्चा होणे साहजिक आहे. मात्र साराने त्यासंदर्भात फार काही बोलणं टाळलंच आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून साराने मास्टर्स केलं आहे. क्लिनिकल ॲण्ड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन याविषयातली पदवी घेऊन भारतात परतल्यावर तिनं काही काळ मॉडेलिंगही करुन पाहिलं. त्यानंतर आता मात्र नुकतेच तिने सचिन तेंडुलकर फाऊण्डेशन या संस्थेत संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
आणि लहान मुलांसाठी काही भक्कम काम उभं करण्याचा, याच क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा विचार आहे हे तिच्या वडिलांनीच सोशल मीडियात प्रसिध्द करुन सांगितलं.अर्थात ते काम करत असताना आता इ क्रिकेट लिगमधली फ्रँचाइजीही तिने विकत घेतली आहे. भारतातल्या नव्या इन्फ्लूएन्सर फ्रेण्डली इको सिस्टिममध्ये सारा तेंडुलकर हे अर्थातच मोठं नाव आहे.हे सारं सुरु असताना साराचं नाव कुणाकुणाशी जोडलं जाण्याचा गॉसिपखेळ सुरु असतो. मात्र आपली डिसेंसी सांभाळत तिने आजवर कुठल्याच गोष्टींचा वाद प्रतिवाद केलेला नाही.
२०२५ हे वर्ष सुरु होताना तिनं सोशल मीडियात लिहिलं होतं, येणारं वर्ष हे समृद्ध, स्वत:ला शोधण्याचं आणि स्वत:तलं अपूर्णत्वही आनंदानं स्वीकारण्याचं, वाढण्याचं असेल!आडनावापलिकडे स्वत:ची वाट शोधत निघालेली ही हसरी तरुणी, तिच्या ग्लॅमरस जगण्याची चर्चा तर अटळ आहे.