‘मुझे शेफ कोट पहन के इतनी खुशी होती है..!’ दुबईतल्या आपल्या रेस्टॉरण्टमध्ये एका चॅननला मुलाखत देत आशाताई सांगत होत्या. त्या अतिशय सुगरण, स्वयंपाककलेवर त्यांचं गायनाइतकंच प्रेम होतं. त्यांच्या भगिनी मीना खाडिकर यांनीही एकदा सांगितलं होतं की कोल्हापुरी असो बंगाली, स्वयंपाक करावा तर तो आशा भोसलेंनीच! खाणं खिलवणं त्यांना फार प्रिय होतं. (Asha Bhosle lifestyle and simple food) गाण्याइतकंच प्रेम त्यांनी खाण्यावर केलं! मात्र मराठी घरातं होणारा वरणभात-तोंडी लावायला लोणचं त्यांना भारी प्रिय होतं. (Asha Bhosle legacy in music and food)
आशाताईंनी तब्बल आठ दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात काम करत वीसहून अधिक भाषांमध्ये १२,००० पेक्षा जास्त गाणी गायली. त्यांच्या आवाजात एक विलक्षण चैतन्य होतं. कधी खट्याळ, कधी भावूक, कधी रोमँटिक तर कधी अगदी बेधडक. आशाताईंचं आयुष्य फक्त स्टुडिओपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांचं दुसरं विश्व होतं ते त्यांच स्वयंपाकघर... संगीताचा रियाज आणि स्वयंपाकघरातील मसाल्यांचा सुगंध या दोन्ही गोष्टी त्यांनी आयुष्यभर प्रेमानं मनापासून जपल्या. गाणं पोट भरत असेल, तर जेवण मन तृप्त करतं असं त्या म्हणत. ( Asha Bhosle's signature recipe)
त्यांची स्वयंपाकाची आवड केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता त्यांनी तिला जागतिक पातळीवर नेलं. ‘Asha’s’ या नावाने त्यांनी जगभरात १४ पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स सुरू केली. दुबईपासून मँचेस्टरपर्यंत पसरलेल्या या रेस्टॉरंट्समधील प्रत्येक रेसिपी त्यांनी स्वतः तपासून, स्वतःच्या चवीने तयार केली होती. यामधून त्यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीला एक वेगळी ओळख दिली.
त्यांच्या मते, स्वयंपाक करणे हा सुद्धा एक प्रकारचा रियाजच आहे. जसा गाण्यात सुरांचा समतोल लागतो, तसाच स्वयंपाकात मसाल्यांचा. एक जरी सूर चुकला की गाणं बिघडतं आणि एक जरी मसाला चुकला की पदार्थाची चव! त्यांच्या हातची फिश करी आणि कढई चिकन अनेक कलाकारांना आवडायची.आशाताईंचे पुण्याशी एक भावनिक नाते होते. पुण्यात आल्यावर त्या गावरान नॉन-व्हेज थाळी आवडीने खात.
जगाला पंचपक्वान्न खाऊ घालणाऱ्या आशाताईंना स्वतःला मात्र 'वरण-भात' आणि 'लोणचं' सर्वात जास्त प्रिय होतं. त्या स्वतःच्या हाताने लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं घालायच्या. "श्रीमंतीत कितीही पदार्थ आले, तरी मनाला तृप्ती साध्या जेवणानेच मिळते," असंही त्या म्हणत.
गाणं आणि खाणं यासह रसरसून जगणाऱ्या कलाकाराची ही एक ओळख, त्यांचं गाणं तर अमर आहेच.. कायम साऱ्यांसोबत आहे.
