A celebration of the tastes of Shravan | श्रावणातल्या चवींचा उत्सव

श्रावणातल्या चवींचा उत्सव

- ऋचा मोडक

श्रावण म्हटलं की पाऊस, हिरवळ, सण, व्रतवैकल्यं, रानभाज्या, उपवास, रांगोळी, वेगवेगळे सात्विक पदार्थ हे सगळं पटकन आठवतं. 
पावसाळ्याच्या सुरु वातीपासून लगेच 10-15दिवसातच वेगवेगळ्या रानभाज्या हिरव्यागार वेलीवर डोलू लागतात. कातकरी बायका गावोगावी, शहरात त्या विकायला आणतात.
घरातील मोठ्या बायका भाज्या आणताना आठवणीनं कोळू, कुर्डू, शेवळे, कवळा, टाकळा, मायाळू, घोळ, झरस, राजगिरा पालेभाजी, चवळई, लाल माठ,  लाल भोपळ्याच्या पाला,  शेवग्याचा पाला, अळू अशा विविध   पालेभाज्या आणतात. तोंडली, कारली, पडवळ, शिराळी, दुधी, लाल भोपळा, चिबूड, कन्टोली, घोसाळे, सातधारी  आणि  नउधारी भेंडी, खिरा काकडी (मेणी काकडी )अशा वेलभाज्यांची ही रेलचेल असते. 
माझी आई सुग्रण होती आणि शिक्षिकाही होती . ती हे सगळे पारंपारिक  पदार्थ सणावारी  करून त्याच्या मागची शास्त्रीय कारणं आम्हाला सांगायची. मला खूपच  खोड होती  हाच पदार्थ नैवैद्य म्हणून का? असे  प्रश्न  सतत  तिला विचारायची. पण  तिच्या शास्त्रीय  उत्तरांनी माझं समाधान व्हायचं. तिच्या हाताखाली स्वयंपाकघर माझं लाडकं झालं.पुढे  मी बी एसस्सी ( केमिस्ट्री) होऊन निसर्गोपचारही शिकले, तिथे आहार: आयुर्वेदिक आणि नैसर्गिक असे प्रकार  शिकले. त्याचा आधार  आणि आईच्या पदार्थांच्या   कृती  हेच  थोडस इथे सांगायचा प्रयत्न..
आजार पळवणा-या श्रावणी भाज्या
आषाढातल्या पावसानं दूषित झालेलं पाणी आणि  त्यातून होणारे जंतुघ्न पोटाच्या विकारांवर या भाज्या म्हणजे  रामबाण उपाय. सिझनमध्ये एकदा   तरी या भाज्या खाव्यात असा घराघरातून चालत आलेला पूर्वापार प्रघात आहे. आम्हाला  लहानापासून सक्ती  होती,  पुढे त्या चवीची  आवड लागली.
या पावसाळी हवेनं मन प्रसन्न झालेलं असलं तरी शरीर थंडावलेलं असतं. कफदोष वाढीस लागलेला असतो. पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं.  ते कमी करायला आणि  थंडावलेल्या जठराग्नीला विश्रंती देण्यासाठी चातुर्मास पाळतात. त्या आधी कांदे नवमी साजरी करतात. नंतर कांदा, लसुण, वांगी हे वातूळ व तीक्ष्ण पदार्थ वर्ज्य मानले जातात. तेलकट आणि पचनास जड पदार्थ बंद केले जातात. 
दीप अमावस्येचे गोड दिवे
दीप आमावस्येला घरातील सगळे दिवे दूध पाण्यानं उजळवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना गोड पुरणाचा, गोड दिव्यांचा, पुरणाच्या दिव्यांचा नैवेद्य   दाखवला जातो. 
गोड दिवे  कणिक, रवा, तुपाच्ं मोहन, चवीला मीठ, गूळ घालून कणिक    भिजवून त्यांना दिव्याच्या आकारात बनवून, वाफवून ते दिवे तुपाची वात लावून तेवले जातात, त्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर ते खरपूस दिवे प्रसाद म्हणून खाल्लेही जातात.आताच्या ट्रेण्डप्रमाणे मस्त स्मोकी फ्लेवरचे दिवे. असेच पुरणाचे दिवे केले जातात. चणाडाळ शिजवून त्यात गूळ घालून पुरण शिजवायचं. चांगलं कोरडं होई द्यायचं. ते कोमट झाल्यावर त्यांचे दिवे बनवायचे. त्यात साजुक तूप  आणि फुलवात लावून त्यांचा नैवेद्य  दाखवायचा आणि नंतर त्यातल्या वाती काढून स्मोकी पुरणाचे दिवे तूप   घालून जिभेवर ठेवायचे.. ब्रह्मानंदी टाळी वगैरे तसच काहिसं होतं.

सोमवारच्या नैवेद्याला अळूवडी अन चुरम्याचे लाडू
श्रावणातला प्रत्येक दिवस हा एक उत्सव असतो. श्रावणी सोमवारी  उपासाला वरी भगर खाल्ली जाते, साबुदाणा नाही, उपास संध्याकाळी सूर्यास्ताआधी सोडतात. त्यात गरमागरम गोडं वरण भात, तूप, लिंबू, अळूवडी, कंटवल्याची भाजी, चुरमा लाडू असा नैवेद्य असतो.
अळूवडी - वडीचा अळू, बेसन पीठ, गोडा मसाला, तिखट मीठ, हळद, चिंचकोळ, गूळ, थोडं तांदूळ पीठ कुरकुरीतपणासाठी असे मिक्स करु न त्यात थोडं तेल घालून भजीच्या पिठाप्रमाणो घट्ट भिजवावं. ते अळूच्या पानांना लावून त्यांचा रोल करु न हा उंडा वाफवून घ्यावा. उंडा गार झाल्यावर बारीक काप करु न तेलात खरपूस तळून किंवा तेलावर मोहरी, हिंग तडतडून त्यात हे काप परतवून नारळ घालून किंवा स्पेशल इफेक्ट हवा असेल तर खास पारंपरिक नारळाच्या दुधात शिजवलेली अळूवडी केली जाते. हे अळूवडीचे काप थोड्या तेलावर हलके टॉस करु न किंचित तिखट- मीठ , आवडीप्रमाणे थोडी चिंच गूळ घालून त्यात नारळाचं दुध घालावं.  आणि पाच मिनिटं झाकून वाफ येऊ द्यावी, छान दाटपणा येतो आणि अशी ही क्रि मी  नारळाच्या दुधात शिजवलेली अळूवडी  आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, कधी एकदा जेवायला बसतो, उपास सोडतो असं होऊन जातं
चुरमा लाडू- गव्हाचा रवा दुधात घट्ट  भिजवून झाकून ठेवावा. रवा फुलला की छान कुटून (आजकाल फूड प्रोसेसरच्या मदतीनं) मऊसर गोळा बनवावा. त्याचे छोटे छोटे मुटके बनवून ते साजुक तुपात खरपूस कुरकुरीत तळून घ्यावेत. नंतर गार झाल्यावर ते कुस्करून परत कुटून घ्यावेत, (इथे मिक्सर मदतीला असतो) नंतर ते चाळून त्यात गरम तुप, पिठी साखर,  वेलची पूड घालून लाडू वळावेत. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात ते.  तो गोडवा जिभेवर घोळवत श्रावणी सोमवारच्या उपवासाची सांगता होते.

(क्रमश:) 

 ( लेखिका पारंपरिक पदार्थ जतन करून त्यांना पुढच्या पिढीर्पयत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.)

modakruchab@gmail.com

 

 

Web Title: A celebration of the tastes of Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.