Can you tell a story There is great power in a small Story .. what is it? | तुम्हाला गोष्ट सांगता येते का?  एका छोट्या गोष्टीत असते मोठी ताकद.. ती कोणती?

तुम्हाला गोष्ट सांगता येते का?  एका छोट्या गोष्टीत असते मोठी ताकद.. ती कोणती?


- सुषमा दातार 


पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं महत्त्व सांगितलं आणि ‘गोष्ट सांगणे ’ हा विषय पुन्हा चर्चेत आला. पण अशा चर्चेविनाही घराघरात मुलांना गोष्टी सांगितल्या, वाचून दाखवल्या जातातच. पण वास्तव असंही आहे की अनेक मुलं या  साध्या बाबीपासूनही वंचित राहातात. मग आता नव्यानं काय सांगायचं या विषयी असा प्रश्न पडेल. पण ‘गोष्ट सांगणे’ या विषयी खूप काही बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं आहे.
    या गोष्टींची सुरुवात कुठून करायची? 
- जन्माला आल्यापासूनच ही सुरुवात होते. खरं तर व्हायला हवी. बाळाला  स्तनपान करताना किंवा वरचं दूध पाजताना अनेकजण गाणी म्हणतात.  त्यातही कथा दडलेल्या असतात. माझे काका एक गाणं म्हणायचे ते मीही माझ्या मुलांसाठी आणि नातीसाठी म्हणायची. तान्ह्या बाळाला हे स्पर्शाबरोबर फक्त स्वर आणि गेयतेमुळे ऐकावंसं वाटत असेल, त्यातलं कथाकथन कळत नसेलच; पण मला त्यामुळे जुन्यातून नवं गाणं - गोष्ट तयार केल्याचा आनंद मिळाला होता हे नक्की. तेव्हा गोष्टी सांगण्यातला मुख्य मुद्दा हा प्रौढ आणि मूल यांच्यातल्या स्पर्श आणि भाषिक संवादाचा आहे. दोघांनाही एकमेकांबरोबर शांत, सुरक्षित आणि छान वाटण्याचा आहे. बाळाच्या वयाप्रमाणे आशय आणि कथनपद्धतीत बदल घडवत जायचं फक्त.
ज्यांच्याकडे भाषिक कौशल्यं असेल त्यांनी बाळाच्या विशिष्ट अशा कौटुंबिक, नैसर्गिक, मानवनिर्मित परिसरानुरूप विशेष गोष्टी कल्पनारंजनाच्या स्वरूपात स्वत:च्या कथांमध्ये आणाव्यात. मग हळू हळू मुलांना न दिसणा-या, न अनुभवता येणा-या  काल्पनिक किंवा ख-या विषयांशी, घटनांशी म्हणजे वास्तवाशी जोडत जावं. छान रोचक, रंजक कथा तयार होतात. बोलता येऊ लागलेलं मूल हळू हळू त्यात आपापल्या कल्पना घेऊन सामीलही होऊ लागतं. मला स्वत:ला पौराणिक किंवा मुद्दाम लिहिलेल्या संस्कार-कथांपेक्षा प्राणी, पक्षी, फुलं, पानं, फळं, लहान मुलं या पात्रंचा वापर करून, सतत नावीन्य देणा-या कथा तयार करत जायला आवडतं. त्या पुन्हा पुन्हा सांगताना छोटे छोटे बदल करत जाणंही मजेचं असतं. स्वत:तलं मूल जागं असलं तर जमतंही ते. गोष्ट सांगणे म्हणजे प्रौढ जगातले अनेक ताण कमी करण्याचा मार्गही वाटतो मला. सगळ्यांनाच हे आपापलं करायला जमेल असं नाही पण वाचलेल्या गोष्टींतून नव्या गोष्टी किंवा त्याच गोष्टींना नवे रोचक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न तर नक्की करून बघावा. आपल्यातलीच सृजनक्षमता नव्यानं कळू लागते आपल्याला. असा प्रयत्न फार महत्त्वाचा आणि आनंददायी असतो सांगणा -यांसाठी आणि ऐकणा-यांसाठीही. यातून फक्त त्या दोघांमध्ये स्पेशल संवाद-धागे विणले जातात. मी आणि माझी नात यांच्यात असे धागे आहेत. 
हे सगळं करायला निवांतपणा असलेले प्रौढ मुलांच्या आसपास असले तर गोष्टींशी, पुस्तकांशी मैत्री सहज आणि पटकन होण्याची शक्यता असते. परंतु तसं नसलं तरी दिवसात थोडा तरी निवांत वेळ गोष्टी सांगण्या, वाचण्यासाठी काढणं मुलांच्या आणि प्रौढांच्याही मन:शांतीसाठी चांगलं ठरतं. झोपायच्या आधी, जेवायला घालताना, आंघोळ घालताना असा वेळ काढणं काही फार अवघड नसतं. विशेषत: जेवायला घालताना फोन, टॅब किंवा टीव्ही समोर बसवणं टाळण्यासाठी ते आवश्यकही आहे. त्या गॅजेट्सची बाळवयातच सवय लागलेली मुलं संख्येनं वाढताहेत ते व्यक्ती आणि समाजस्वास्थ्यासाठी बरं नाही. म्हणून गोष्टी सांगायची, वाचायची कला आता मूल होऊ द्यायचं ठरवल्याबरोबर जीवनावश्यकच समजावी. तशी तयारीही सुरू करावी. मग ‘मला नाही बुवा/बाई सुचत गोष्टी सांगायला’ असं म्हणायची वेळ येणार नाही. आपण प्रौढांनी हे कौशल्य वाढवण्यासाठी इंटरनेटची मदत जरूर घ्यायला हवी. कथाकथन, कथावाचनाचे खूप नमुने इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहेत.

आजी आजोबांच्या गोष्टी आणि संस्कार यांचं नातं एक आदर्श म्हणून आपल्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. गोष्टींतून संस्कार होतात हे नाकारता येत नाहीच; पण गोष्टींवर संस्कारांची जबाबदारी आता टाकता येत नाही. मुलं आता घरापेक्षा बाहेरच्या समाजाशी लवकर आणि अधिक जोडलेली असतात. त्यामुळे आपली आणि समाजाची वर्तणूक ही सुसंस्कार करणारी असणं अधिक महत्त्वाचं. गोष्टींतील आशय त्याला पूरक ठरेल असं फार तर म्हणता येईल.
    गोष्टींमधल्या जादुई, कल्पनारम्य जगातून हळू हळू बाहेर येत वास्तवाशी, बदलत्या काळाशी सांधा जोडणा-या भावनिक कथा, सहिष्णुता अधोरेखित         करणा-या  कथा. धाडस कथा, विज्ञानकथा, विज्ञान काल्पनिका अशा  विविध विधांच्या कथांशी मुलांची ओळख करून देणं हे प्रौढांचं काम. सगळीच मुलं वाचनप्रेमी होणार नाहीत. होतही नाहीत. परंतु गोष्टीरूपानं अनुभव सांगणं, ऐकणं, ऐकून घेणं हा नातेसंबंध राखण्याचा एक राजमार्ग आहे एवढं तरी त्यांना कळेल. गोष्ट सांगणं, ऐकणं म्हणून महत्त्वाचं. पूर्वीही, आताही आणि यापुढेही! 

---------------------------------------------------


स्पर्श, भाषा अन् संवादाचा प्रयोग
गोष्टींच्या पुस्तकांची तोंडओळखही आधी चित्र-गोष्टींच्या पुस्तकांतून करून देता येते. मूल मान धरू लागलं, पालथं पडायला लागलं की पुढय़ात जाड कागदाची (किंवा धुता येणारी कापडाचीही, प्लॅस्टिकचीही मिळतात आता) चित्रमय पुस्तकं ठेवायला सुरुवात करता येते. मुलं चित्रं बघू लागतात आणि पान उलटणं दाखवल्यावर तेही करायचा प्रयत्न करू लागतात. बसता येऊ लागल्यावर हातातही धरू लागतात. बाळाला आपल्या मांडीत बसवून पुढे एका हातात पुस्तक धरून वाचून दाखवणं हा स्पर्शाचा आणि भाषिक संवादाचा प्रयोग असतो. गोष्टीत मजेदार काही आलं तर आपल्या एका हातानं बाळाच्या मांडीवर टाळी देणं, थोडं भीतीचं काही आलं तर त्याच हातानं त्याला थोडंसं अधिक जवळ घेणं असे स्पर्शाचे प्रकारही कळत जातात बाळाला. वाचताना आवाजात केलेले चढउतार, या स्पर्शासोबतच गोष्टीच्या आशयाशी बाळाला जोडतात. आपलीही गोष्ट सांगण्यातली गुंतवणूक नीट सुसंगत राहाते. ते कथावाचन मग टाकणं टाकल्या सारखं होत नाही. 

-----------------------------------------------------------

कौशल्यांची पायाभरणी
गोष्टी सांगणं, वाचणं यातून भाषेचा विकास चांगला होतो हे आता नव्यानं सांगायची गरज नाही. परंतु भाषिक कौशल्यातला एक महत्त्वाचा दुर्लक्षित भाग आहे तो म्हणजे आपल्या भावना शब्दात बांधून दुस-याला सांगता येणं. दुस-यां नी सांगितलेलं ऐकून, समजून घेता येणं. हे कौशल्य मोठय़ांचं बघूनही मुलं शिकत असतात. तसंच गोष्टींतूनही छान शिकता येतं. अधिकाधिक व्यक्तिकेंद्री, ऐहिक सुखकेंद्री होणा-या समाजात हे कौशल्य वाढवणं भावनिक बुद्धय़ांक वाढवण्यासाठी फार आवश्यक आहे.

(लेखिका संवाद, कौशल्य, पालकत्व या विषयाच्या प्रशिक्षक आहेत.)

sushamadatar@gmail.com

 

 

                          

Web Title: Can you tell a story There is great power in a small Story .. what is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.