Can that action be stopped before the rape? | बलात्काराच्या घटनेशी पोहोचण्यापूर्वी ती कृती रोखता येईल का?
बलात्काराच्या घटनेशी पोहोचण्यापूर्वी ती कृती रोखता येईल का?

-मुक्ता गुंडी


बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथे मोलेन्ब्रीक जिल्ह्यात गेल्या वर्षी एक प्रदर्शन भरवण्यात आले. त्या प्रदर्शनाचे नाव होते'what were you wearing?' अर्थात ‘तू कोणते कपडे घातले होतेस ?’
बलात्कार झाला त्याप्रसंगी बायकांनी, मुलींनी जे कपडे घातले होते, त्या कपडय़ांचे हे प्रदर्शन. या प्रदर्शनात लहान मुलीच्या इवल्याशा फ्रॉकपासून तरुण स्रीच्या बंद कॉलरच्या टी-शर्ट आणि पॅण्टर्पयत विविध प्रकारचे कपडे ठेवलेले होते. आणि जणू ते ठणकावून सांगत होते, 'No clothes can prevent rape!
आपल्या देशात सात वर्षापूर्वी एक ‘निर्भया’ या प्रश्नांना सामोरी गेली. त्यानंतर गेल्या सात वर्षामध्ये कित्येक मुलींवर आणि स्रियांवर बलात्कार, वैवाहिक अत्याचार, लैंगिक अत्याचार झाले असतील. काही घटनांच्या बातम्या झाल्या, काही घटना विसरल्या गेल्या, काही घटना दाबल्या गेल्या, काही घटनांचे खापर स्रीच्याच माथी फोडले गेले, तर काही नाममात्न घटना कोर्टार्पयत पोहोचल्या. तेव्हापासून ‘आरोपींना फाशी द्या, ठेचून मारा, आमच्या ताब्यात द्या, कोर्टकेस तातडीने पुढे न्या’, अशा विविध मागण्या केल्या जात आहेत. या मागण्यांच्या मागे असलेले समाजमानस समजून घेता येते, त्यामागची उद्विग्नतासुद्धा समजते; परंतु प्रश्न हा आहे की समाजाची पुरुषकेंद्री आणि पितृसत्ताक मनोवृत्ती बदलायची तरी कशी? स्री-पुरुष समतेच्या प्रयत्नांमध्ये मुलांना, पुरुषांना आणि पितृसत्ताक विचारांना खतपाणी घालणा-या तमाम स्रियांनासुद्धा कसे सामावून घ्यायचे? स्री-पुरुष, नवरा-बायको, मुले-मुली एकमेकांशी लैंगिक प्रश्न, अनुभव, आरोग्य, नाते याविषयी सहजपणो बोलू शकतील, असे वातावरण कसे निर्माण करायचे? हे प्रश्न गहन आहेत. क्लिष्ट आहेत; पण तातडीने दखल घ्यावेत असे आहेत. एखाद्या रोगाने माणसे गेली किंवा वायू प्रदूषणाने एक विशिष्ट पातळी गाठली की ‘सामाजिक-आरोग्याची आणीबाणी’ जाहीर केली जाते. दर हजारी किती बलात्कार झाल्यावर आपण ‘सामाजिक आणीबाणी’ जाहीर करणार आहोत? आपला देश हैदराबादमध्ये नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यातून ‘‘सावरायच्या’’(?) आत आपल्याला नेमकी कोणती ठोस पावले उचलता येतील याविषयी चर्चा व्हायला हवी.

बलात्काराच्या मानसिकतेचे विश्लेषण केले तर आपल्या असे लक्षात येईल की त्याला कित्येक छटा आहेत. अत्यंत संकुचित आणि कठोर अशा पौरुषत्वाच्या संकल्पना, हिंसा, स्रीच्या शरीराकडे हक्क म्हणून बघण्याची वृत्ती, अपरिपक्व लैंगिक समज, पौगंडावस्थेतील मुलांच्या भावनिक आणि लैंगिक गरजाकडे केले जाणारे दुर्लक्ष, लैंगिक आरोग्याबाबत संभाषणाचा तसेच मार्गदर्शनाचा अभाव, या त्यातील काही मुख्य छटा. कमीअधिक प्रमाणात यातले कित्येक प्रश्न अनेक देशांमध्ये अजूनही भेडसावत आहेत. भारताप्रमाणोच बाहेरील देशांमध्ये लैंगिक अत्याचार, बलात्कार रोखण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्या देशांची सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती भलेही वेगळी असेल; परंतु या देशांमध्ये केले गेलेले प्रयत्न आपल्याला आशेचा किरण दाखवणारे ठरू शकतात का? हे प्रयत्न अर्थातच वैयक्तिक पातळीवर, कुटुंबात, शैक्षणिक संस्थामध्ये, गावांमध्ये, शहरामध्ये आणि देशपातळीवर ‘लैंगिक अत्याचार प्रतिबंध’ प्रणाली निर्माण करण्याकरता अशा विविध स्तरांवर करायला हवेत, तरच त्यांची व्याप्ती काहीएक परिणाम साधू शकेल. परंतु यातल्या काही गोष्टी अशा नक्कीच आहेत, ज्या तुम्ही-मी अगदी आजही करू शकतो ! 
काही उदाहरणो बघूया.
1. लॉस अंजेलिसमधील एका शाळेतील लिझ क्लेनरॉक ही तरु ण शिक्षिका. तिनं लहान मुला-मुलींना ‘कन्सेंट’ अर्थात ‘अनुमती’चा अर्थ सोप्या शब्दात शिकवायचा ठरवला. तिनं एक छान तक्ता तयार केला. दुस-या व्यक्तीसोबत आपल्याला एखादी प्रेमाची/ लैंगिक कृती करावीशी वाटली (जसे की, मिठी मारणे , हात घट्ट धरणे , पापी घेणे , चुंबन घेणे  इत्यादी) तर त्या व्यक्तीची त्यास अनुमती आहे की नाही, हे कसे ओळखायचे? तिने सोपी आकृती काढली- 1. ती व्यक्ती तुमच्याकडे पाहात नाही, घाबरलेली दिसते, ताणात दिसते व ‘‘हो’’ म्हणते याचा अर्थ तिची पूर्ण अनुमती नाही. मग ती कृती करू नका ! 2. ती व्यक्ती सहज हसून आत्मविश्वासाने तुमच्याकडे बघत म्हणते, ‘जरूर, मला आवडेल’. म्हणजे तिची अनुमती आहे. कृती करू शकता. 3. ती व्यक्ती तुम्हाला मिठी मारते; पण मधेच थांबून लांब जाते? - म्हणजे  अनुमती नाही. तुम्ही ती कृती पूर्ण करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. आपल्या इच्छा नम्रपणो बोलून दाखवणो. समोरच्या व्यक्तीची अनुमती घेणे , तिचे केवळ शब्द नव्हे तर देहबोली वाचणे , इतरांच्या भावनांचा आदर करणे , स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवणे . या किती महत्त्वाच्या गोष्टी आपण मुलामुलींना लहान वयात समजावून सांगू शकतो. ज्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या लैंगिक नातेसंबंधावर होऊ शकतो !
2. पौगंडावस्थेतील मुलामुलींशी, तरुण-तरुणींशी अनेक प्रकारे या अवघड विषयांवर संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील ‘प्रयास’ संस्थेतर्फे ‘सेफ जर्नीज’ नावाची एक वेब-मालिका तयार करण्यात आली आहे. आपली लैंगिकता, आपले शरीर. आपण जसे आहोत तसे मान्य कसे करायचे; निरोध न वापरल्याने काय होऊ शकते, इच्छा नसताना गरोदर राहिल्यास काय करायचे, प्रेमभंग झाल्यावर नैराश्य आल्यास काय करता येऊ शकते, अशा अतिशय महत्त्वाच्या विषयांवर 10-15 मिनिटांचे व्हिडीओ प्रयासतर्फे फेसबुकवर, यू-टय़ूबवर शेअर केले जातात. सोशल मीडियाचा वापर, तरुण कलाकारांचा सहभाग यामुळे ही मालिका देखणी झाली आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना, शाळांतर्फे ही मालिका आणि त्यानुसार चर्चा घडवून आणली तर मुला-मुलींना सहजतेने बोलावेसे वाटू शकेल.
जसजसे फोन, इंटरनेट यांचे जाळे वाढते आहे, तसा पोर्नोग्राफी, सेक्सटिंग, फोनसेक्स यापासून निर्माण होणारा धोकाही वाढत जाणार आहे. सुरेश बडा मठ या संशोधकाने भारतातील लैंगिक गुन्ह्यांवर संशोधन केले आहे. यावरील लेखात त्यांनी म्हटले आहे की, भारतातील 12 टक्के वेबसाइट या पोर्नोग्राफीशी संबंधित आहेत. ते बघणारे भारतीय दर्शक (युवांची संख्या अधिक!) सेकंदाला सुमारे तीन ते चार हजार डॉलर्स पोर्नोग्राफीवर खर्च करतात, असा अंदाज आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे - ‘पोर्नोग्राफी जर सिद्धांत असेल, तर बलात्कार ही त्यावर आधारित कृती आहे.’ याचे कारण पोर्नोग्राफी आणि बलात्कार यातील मानसिकता एकाच समान धाग्याने बांधलेली आहे. आपल्या मुलाला पोर्नोग्राफी म्हणजे काय हे माहीत आहे का, पोर्नोग्राफी आणि खरी - नैसर्गिक लैंगिक कृती यामधील फरक काय? कोणती गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसते? निरोध वापरायचा कसा, याविषयीचा ‘पॉङिाटिव्ह अडोलसंट सेक्शुअल हेल्थ’ नावाचा प्रकल्प ऑस्ट्रेलियामध्ये राबवला गेला. यामध्ये मुलांच्या अंतरंगात काय सुरू आहे, त्यांचा स्वत:शी, स्वत:च्या शरीराशी संवाद कसा होतो हे जाणून घेण्यासाठी पालकांनासुद्धा या प्रकल्पात सामावून घेण्यात आले. या प्रकल्पाचा सुयोग्य परिणाम सहभागी मुलांच्या लैंगिक दृष्टिकोनात दिसून येत आहे. भारतात तर केवळ पोर्नोग्राफीच नव्हे तर हल्लीच्या ‘रिएलिटी शो’मध्ये घडवून आणल्या जाणा:या कित्येक घटनांमध्ये लहान मुलांच्या वयाचा आणि मानसिकतेचा विचारच केलेला नसतो. स्री परीक्षकाने लिपस्टिकभरल्या ओठांचा गालावर दिलेला पापा जेव्हा लहान मुलाला कॅमे-यासमोर मिरवायला लावला जातो, जेव्हा तरुण गायक स्री परीक्षकाचे (अनुमती न घेता) चुंबन घेतो.  तमाम प्रेक्षक यावर जेव्हा हसून टाळ्या वाजवतात आणि घराघरात जेव्हा घडलेली घटना योग्य की अयोग्य यावर चर्चासुद्धा होत नाही तेव्हाच आपण या आणीबाणीशी करत असलेलं अर्ध युद्ध जणू हरलेले असतो !
3. आयसीआरडब्ल्यू आणि ‘प्रदान’ संस्थाच्या राजस्थानात राबवल्या गेलेल्या ‘पंख’ नावाच्या संयुक्त प्रकल्पात पौगंडावस्थेतील मुला-मुलीशी बालविवाह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य याविषयावर आधारित काही महिन्यांचा प्रकल्प राबवण्यात आला. या विषयावर संवाद साधू शकतील अशा ‘पीअर एज्युकेटर’ना खास प्रशिक्षण देण्यात आले. आश्चर्य म्हणजे या प्रकल्पाचा अनेक अंगांनी फायदा झाल्याचे दिसून आले, मात्न अविवाहित मुलींमध्ये लैंगिक जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मात्न या प्रकल्पाने सकारात्मक फरक पडल्याचे दिसून आले नाही. ज्या राज्यात, समाजात, संस्कृतीत लैंगिक भावनांचा संकोच करणो इतके मुरलेले आहे, तिथे ‘पंख’सारखे प्रकल्प तोकडे पडत आहेत, यातून आपल्याला शिकण्यासारखे बरेच आहे. या संकुचित मनोवृत्तीतून कसे बाहेर पडता येईल? खेळांचा वापर करून, विनोदाचा शिडकावा करून, मुलांशी समावेशक नाटय़कृतीतून पुरुषत्व, हिंसा, लिंगभाव याविषयी संवाद साधता येईल का? अमेरिकेत असा प्रयोग करणारे तरुण मुलांचे ‘सेक्स स्कॉड’ आहे. स्वत:च्या अनुभवांवर बेतलेल्या नाटय़कृतींनी विनोदी प्रसंग निर्माण करत ते नववीतल्या मुलांशी संवाद साधतात, आणि लैंगिक सुखाविषयी अत्यंत हळुवारपणो भाष्य करतात. या सुखात दुस:याचा आदर करणो कसे महत्त्वाचे आहे, हे सांगतात. विनोदी प्रसंग पाहून मुलाना आपोआप हलके वाटू लागते. लैंगिक शिक्षण गंभीरपणो घ्यावे हे खरे; परंतु ते गंभीरपणोच न करता हलक्याफुलक्या वातावरणात होऊ शकते की! अशा लहान लहान पाय-या चढत लहानपणापासून जर मुलाला आणि मुलीला समता, समानता, संवाद आणि संवेदनशीलता शिकवता आली तर पुरुषसत्ताक मनोवृत्ती मोडण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल.

-------------------------------------------------------------

खाते है जो खाना, 
तो सीख लो पकाना

आपल्याला मुलांचा आणि पुरुषाचा लैंगिक संवादात सहभाग वाढवावा लागणार आहे; परंतु ते तितके सोपे नाही. या विषयावर नाशिकमधील एका शिक्षिकेची मी मुलाखत घेत होते तेव्हा त्या म्हणाल्या, ‘आम्ही विद्यार्थ्याशी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली की आमच्या शाळेतले ‘पुरुष’ शिक्षक खोलीला बाहेरून कडी लावून निघून जातात..!’ 
या एका कृतीतून, शिक्षकांच्या देहबोलीतून विद्याथ्र्याना काय संदेश मिळत असेल? शहरातल्या, खेडय़ापाडय़ातल्या पुरुष शिक्षकांना या प्रक्रियेत सामावून घेणो, ही लैंगिक शिक्षणातली महत्त्वाची पायरी असणार आहे, याकरता शासनातर्फे प्रयत्न व्हायला हवेत. भविष्यकाळासाठी तयार होणारे पुरुष संवेदनशील असतील, पौरुषत्वाच्या चौकटीत बांधले गेले नसतील याची काळजी घरोघर पालकांनीही घ्यायची आहे. मुलाला ‘मुलगा’ म्हणून खास वागणूक न देता, त्याच्यावर माणूस म्हणून कसे संस्कार करायचे हे शिकण्यासाठी ज्येष्ठ स्रीवादी कार्यकत्र्या कमला भासिन यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली ही कविता.
ती सगळ्यांनी मनापासून 
जगावी अशी आहे.
सुनो मेरे भैया, 
यूँही मत चीखो, 
काम काज सीखो, 
खाते है जो खाना, 
तो सीख लो पकाना
अगर फाडते कपडे,
तो सीखो उन्हे सीना
भरना सीखो पानी, 
अगर तुम्हें है पीना
अपना का

म करे जो खुद, 
बस उसका ही जीना, 
ता ता थइय्या, 
सुनो मेरे भैया!
बलात्काराच्या घटना ही सामाजिक आणीबाणी आहे. काही क्वचित घडणा-या घटना नव्हेत !  

(लेखिका  सार्वजनिक आरोग्य विषयाच्या अभ्यासक आहेत. )

gundiatre@gmail.com 

 

 

Web Title: Can that action be stopped before the rape?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.