Bhannat Shala Web radio project to teach boys the point of view about women | भन्नाट शाळा : मुलांसाठीचा एक ‘बोलका’ प्रयत्न

भन्नाट शाळा : मुलांसाठीचा एक ‘बोलका’ प्रयत्न

- डॉ. वेदवती जोगी

 

स्थळ दिल्ली. स्थळ हैदराबाद. स्थळ कथुआ. स्थळ कोपर्डी. स्थळ उन्नाव.

‘तिचे’ वय ८. ‘तिचे’ वय १५. ‘तिचे’ वय २० ...

अशा किती मुली किळसवाण्या वासनेची शिकार झाल्या, स्वतःला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटावी, अशा या घटना.

आणि त्यातला तो. पुरुषाचा ‘स्त्री’विषयक दृष्टिकोन. स्त्रीही एक माणूस आहे, तिलाही वेदना, ‘मन’ नावाच्या गोष्टी असतात, याची जाणीवच नसणं. ती जाणीव कशी येईल, तर त्यासाठी ‘कॅच देम यंग’ला पर्याय नाही. स्त्रीविषयक कल्पना आणि जाणिवा सुधारून सामाजिक बदल घडविण्यासाठी साधारणपणे १२ ते १८/१९ वयाच्या संस्कारक्षम वयाच्या मुलांनाच हाताशी धरायला हवं, असं आम्हाला वाटलं.

माध्यमतज्ज्ञ म्हणून मला २०११ ते २०१३ केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ अभ्यासवृत्ती मिळाली होती. सुधारगृहातील विधीसंघर्षग्रस्त मुलं (म्हणजेच बालगुन्हेगार) हा अभ्यासाचा विषय होता. माझ्या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच लक्षात आलं की, थोडंसं जरी आपसात भांडण झालं, तरी मुलं मारामारीवर उतरत आणि एकमेकांना आई-बहिणीवरून अतिशय गलिच्छ शिव्या देत, यावर उपाय सुचत नव्हता, पण रागावून काहीही उपयोग होत नव्हता. माझ्या डॉक्टर मुलीनं एक उपाय सुचविला. आम्ही एक पीपीटी तयार केली. मुलाचा जन्म, त्यासाठी नऊ महिने आईला काय काय त्रास सोसावा लागतो, तो आईचाही पुनर्जन्म कसा ठरतो वगैरे सांगणारी. मुले डोळे विस्फारून ते सर्व पाहत होती. पीपीटी संपल्यानंतर प्रथम कोणीच काही बोलेना. तेव्हा मीच म्हटलं की, स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमच्या आईनं तुमच्यासारखी मुलं जन्माला घातली, जी आईवरूनच घाण शिव्या देतात. त्यानंतर, एकेक पोर त्याच्या आईबद्दल गहिवरून बोलू लागलं, काही जण रडलीही. तेव्हा वाटलं या मुलांना व्यक्त होण्यासाठी एखादं माध्यम उपलब्ध करून द्यायला हवं. रेडिओ हे वापरायला सर्वात सोपं माध्यम, शिवाय या मुलांचं नाव व चेहरा जगासमोर येऊ न देण्याची अटही यात पूर्ण होते.

ही कल्पना अँबी क्रिएशन्सचे बिपिनचंद्र चौगुले यांच्या साहाय्यानं साकार करता आली. महाराष्ट्रातील ५३ बालसुधारगृहांसाठी भन्नाट शाळा हा वेब रेडिओ प्रकल्प आम्ही सुरू केला. त्यासाठी उद्योजक डॉ.सायरस पूनावाला यांचं अर्थसाहाय्य मिळालं. हे कार्यक्रम तयार करताना मुलांना कार्यक्रम निर्मिती प्रक्रियेतही सामील करून घेतलं. या किंवा अन्य कुठल्याच मुलाची पावलं गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी कोणकोणते विषय हाताळावे लागतील, याचा अंदाज आम्हाला आला. त्यांच्या घरची परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण त्याचे मुलांवर होणारे दुष्परिणाम नक्की कमी करू शकतो. मुलगा असो की मुलगी, आयुष्यातील काही धोक्यांपासून त्यांना सावध करू शकतो, त्यांना पुढचं शिक्षण, व्यवसायविषयक मार्गदर्शन करून योग्य मार्गावर ठेवू शकतो, असं आम्हाला वाटलं. म्हणूनच आता ही भन्नाट शाळा आम्ही सर्वच मुलांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रभरातील १२ ते १९ वयांतील मुला-मुलींना जोडणारा ‘भन्नाट शाळा’ हा एक विनाशुल्क साप्ताहिक वेब रेडिओ चॅनल आहे. स्त्रीविषयक मूळ कल्पना आणि जाणिवांना सुधारणं हा त्याचा मुख्य हेतू आहे, पण त्यासोबतच आरोग्य, जबाबदार लैंगिक वर्तन, शास्त्रीय दृष्टिकोन, मूल्ये व नीतिमत्ता, शिक्षणाचं महत्त्व हे विषयही आहेत. पुणे महानगरपालिका, नाशिकचा इस्पॅलिअर शैक्षणिक रेडिओ, राज्यातील अनेक कम्युनिटी रेडिओ भन्नाट शाळा प्रसारित करणार आहेत. १ जानेवारीपासून त्याचं वेबकास्ट सुरू झालं असून, दर आठवड्याला अंदाजे ३० मिनिटांचा एक अंक असं त्याच्ं स्वरूप आहे. समज वाढवणं यासाठीचा हा एक छोटा प्रयत्न आहे.

( लेखिका भन्नाट शाळाच्या संचालक आहेत.)

bhannatshala@gmail.com

Web Title: Bhannat Shala Web radio project to teach boys the point of view about women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.