Join us

केसगळती रोखण्यासाठी कोणतं तेल अधिक फायदेशीर आणि कशी करावी मालिश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:25 IST

Hair Fall Remedies : अनेकांना हे माहीत नसतं की, केसांसाठी अधिक फायदेशीर तेल कोणतं असतं आणि केसांची मालिश कशी करावी. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Hair Fall Remedies : केसगळती ही वेगवेगळ्या कारणांनी होते. महिला असो वा पुरूष सगळेच आजकाल केसगळतीच्या समस्येने हैराण आहेत. खासकरून हिवाळ्यात केसगळतीच्या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. मग लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण फायदा मिळतोच असं नाही. केसगळती रोखण्यासाठी तेल खूप फायदेशीर ठरतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, केसांसाठी अधिक फायदेशीर तेल कोणतं असतं आणि केसांची मालिश कशी करावी. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मोहरीचं तेल केसांसाठी फायदेशीर

मोहरीच्या तेलाचा वापर लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी करतात. हे तेल त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. या तेलाच्या मदतीने केसगळतीची समस्या दूर होते. सोबतच केसांची वाढही होते. 

कशी करावी मालिश?

काही लोक सांगतात की, मोहरीच्या तेलाने रोज केसांची मालिश करावी. पण असं नाहीये. आठवड्यातून दोन दिवसही मोहरीच्या तेलाने मालिश केली तरी तुम्हाला फायदा मिळू शकतो. मोहरीच्या तेलाचा वापर करण्याआधी तेलात दोन ते तीन लसणाच्या कळ्या टाकून गरम करावे.

तेल थंड झालं की, त्यात थोडा लिंबाचा रस टाका. हे केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. लांब केसांना बोटांच्या मदतीने हळूहळू तेल लावा. मालिश करताना नखे वाढलेली नसावीत नाही तर डोक्याच्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. 

खोबऱ्याचं तेल

रोज जास्तीत जास्त लोक केसांना खोबऱ्याचं तेल लावतात. या तेलाने केसांना आणि डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. खोबऱ्याच्या कोमट तेलाने केसांची मालिश केल्यानं काही दिवसांतच केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. सामान्य तेलापेक्षा कोमट तेलानं मालिश करणं केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं.

कोमट तेल केसांना लावल्यानं ते थेट केसांच्या मुळापर्यंत जातं. यामुळे केसांच्या मुळांजवळील स्कॅल्पवर मॉइश्चर(डोक्याची त्वचा) टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस आणि स्कॅल्पचे आरोग्य चांगलं राहतं. कोमट तेलानं मालिश केल्यानं डोक्यातील ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते. कोमट तेलानं मालिश केल्यानं केसगळती कमी होते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स