Join us  

हिवाळ्यातल्या त्वचेच्या समस्यांसाठी महागडी प्रॉडक्ट्सच कशाला, घरात टमाटा आहे ना! लावा ६ प्रकारचे टमाट्याचे लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 7:04 PM

हिवाळ्यात त्वचा उलते, कोरडी पडते. याकाळात त्वचेला हवं असलेलं पोषण मिळालं नाही की त्वचा खराब होण्याचा, एजिंगची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्वचा सुंदर करण्यासाठी स्वयंपाकघरातील टमाट्याचा उपयोग होतो.

ठळक मुद्देटमाट्यातील गुणधर्मांमुळे त्वचेचं संरक्षण होतं. टमाटा आणि मध यांचा एकत्रित उपयोग केल्यास  त्वचेत नैसर्गिक आर्द्रता निर्माण होते. त्वचा डाग पडून खराब झाली असल्यास टमाटा आणि हळदीचा लेप चांगला परिणामकारक ठरतो.

हिवाळ्यात त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. त्यावर उपाय करण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही जातो. कितीही महागाचे प्रोडक्टस वापरले तरी हवा तो परिणाम मिळतच नाही. पण हे सर्व करताना घरातल्या सोप्या उपायांकडे मात्र आपलं लक्षच जात नाही. त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी महागड्या प्रॉडक्ट्सची नाहीतर नैसर्गिक घटकांची गरज असते.

Image: Google

हिवाळ्यात त्वचेचं नैसर्गिक घटकांनी पोषण करुन त्वचा सुंदर करण्यासाठी  स्वयंपाकघरातील टमाट्याचा उपयोग होतो. टमाट्याचा विविध पध्दतीनं उपयोग करुन  त्वचेचं संरक्षण करता येतं. तसेच टमाट्यातील ॲण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ होते. तसेच चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन त्वचा टवटवीत होण्यासाठी टमाट्यातील ॲण्टिऑक्सिडण्टसचा उपयोग होतो. त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.  टमाटा विविध प्रकारे उपयोगात आणता येतो. 

Image: Google

टमाटा आणि हळद

टमाटा आणि हळदीच्या एकत्रित उपयोगानं त्वचेचा पोत सुधारतो. या लेपामुळे त्वचा ओलसर राहाते. जर त्वचेवर डाग पडून त्वचा खराब झाली असेल तर टमाटा आणि  हळदीच्या लेपाचा चांगला उपयोग होतो. यासाठी मध्यम आकाराचा पिकलेला टमाटा घ्यावा. त्यासाठी दोन छोटे चमचे हळद घ्यावी. टमाटा कापून त्यातील बिया काढून टाकाव्यात. बिया काढल्यानंतर टमाटा कुस्करुन किंवा मिक्सरमधून वाटून घ्यावा. टमाट्याचं मिश्रण एका वाटीत काढावं. त्यात हळद मिसळावी. सर्व मिश्रण नीट एकत्रित करावं.  आधी चेहरा स्वच्छ धुवावा. रुमालानं टिपून घ्यावा. त्यावर हा लेप लावावा. लेप वाळेपर्यंत चेहऱ्यावर ठेवावा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवावा.

Image: Google

टमाटा आणि मध

टमाटा आणि मध यांच्या मिश्रणानं त्वचेत ओलावा निर्माण होतो. मधामुळे त्वचा आर्द्र आणि ओलसर राहाण्यास मदत होते.  हळद आणि मध या दोन्ही घटकांमधे ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे चेहरा टवटवीत होतो. यासाठी टमाटा बारीक चिरुन वाटून घ्यावा. टमाट्याचं मिश्रण एका वाटीत काढून घ्यावं.  त्यात 2 ते 3 मोठे चमचे शुध्द मध घालावं. हे नीट मिसळून घ्यावं. लेप लावण्याआधी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. रुमालानं टिपून घ्यावा. चेहऱ्यावर लेप लावावा. तो 15-20 मिनिटं ठेवावा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवावा. चेहरा रुमालानं टिपल्यानंतर चेहऱ्यास माॅश्चरायझर लावावं.

Image: Google

टमाटा आणि दही

दह्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो कारण दह्यात विकर असतात. दह्यामुळे त्वचेच्या पेशींमधे आर्द्रता निर्माण होते. याचा उपयोग  त्वचा मऊ आणि लवचिक होण्यासाठी होतो.  दह्यातील ॲण्टिऑक्सिडण्टसचा उपयोग त्वचा टवटवीत होण्यासाठी होतो. टमाटा आणि दह्याच्या उपयोगानं उन्हामुळे खराब होणारी त्वचा बरी होण्यास मदत होते. यासाठी पिकलेला टमाटा वाटून घ्यावा.  वाटलेल्या टमाट्यात 3 छोटे चमचे दही घालावं. चेहरा आधी धुवून घ्यावा.  वाटलेला टमाटा आणि दही चांगलं मिसळून घ्यावं. हा लेप चेहऱ्यास लावावा.  10 ते 15 मिनिटं तो चेहऱ्यावर ठेवून चेहरा थंड पाण्यानं धुवावा.

Image: Google

टमाटा आणि इसेन्शिअल ऑइल

इसेन्शिअल ऑइल्समध्ये त्वचा टवटवीत करणारे गुणधर्म असतात.  या तेलामुळे त्वचेचं पोषण् होतं आणि त्वचा मऊ होते. यासाठी एक पिकलेला टमाटा घेऊन तो वाटावा. वाटलेला टमाटा एका वाटीत घेऊन त्यात इसेन्शिअल ऑइलचे काही थेंब घालावेत.  वाटलेल्या टमाट्यात हे तेल नीट मिसळून  हे मिश्रण चेहऱ्याला लावावं. लेप वाळला की चेहरा गार पाण्यानं धुवावा.

Image: Google

टमाटा आणि ब्राउन शुगर

चेहरा स्क्रब करण्यासाठी टमाटा आणि ब्राउन शुगरचा उपयोग होतो. यासाठी पिकलेला टमाटा दोन भागात चिरुन घ्यावा. एका डिशमधे ब्राउन शुगर पसरुन घ्यावी. टमाट्याचा एक भाग घेऊन तो ब्राउन शुगरमधे ठेवावा. टमाट्याला ब्राउन शुगर चिटकते. हाच टमाटा मग चेहऱ्याला हलक्या हातानं चोळावा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते. त्वचा स्वच्छ होते आणि टमाट्यातील गुणधर्मांमुळे त्वचेचं पोषणही होतं.

Image: Google

काळी वर्तुळं आणि टमाट्याचं साल

डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं घालवण्यासाठी टमाट्याचा उपयोग होतो. यासाठी पिकलेल्या टमाट्याची सालं काढावीत. ती डोळ्याखाली ठेवावी. पंधरा मिनिटं डोळे बंद करुन शांत बसावं. नंतर टमाट्याची सालं काढून घेऊन चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

 

      

टॅग्स :ब्यूटी टिप्सभाज्या