Join us  

तिच्या नखाची सर नाही! - सुंदर, निमुळत्या, स्वच्छ नखांसाठी काय कराल? नखं सांगतात पर्सनॅलिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 5:03 PM

सुंदर दिसण्यासाठी नखं चांगली हवीतच पण उत्तम आरोग्यासाठी ती स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचे आहे. तेव्हा या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी काय करावे, जाणून घेऊया...

ठळक मुद्देनखे स्वच्छ नसतील तर मात्र आरोग्य बिघडू शकते. काही सोपे उपाय वापरुन तुमची नखे तुम्ही घरच्या घरी स्वच्छ आणि सुंदर ठेऊ शकतानखं स्वस्थ, चमकदार आणि लांब ठेवण्यासाठी तुमचं खाणं — पिणं अगदी योग्य असणं गरजेचं आहे

नखं हा अनेक स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आपली नखं चमकदार, शेपमध्ये दिसावीत यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. अनेक जणी आपली नखं वाढवतात पण त्यांची योग्य ती काळजी घेणे त्यांना जमत नाही. आपण हाताने खातो, स्वयंपाक करतो. मात्र ही नखे स्वच्छ नसतील तर मात्र आरोग्य बिघडू शकते. नखं आकर्षक आणि स्वच्छ राहावीत यासाठी त्यांची पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते. नखं चांगली असतील तर नकळतच तुमचा हात सुंदर दिसतो. सध्या खास नखांची स्वच्छता आणि डेकोरेशन करणारे पार्लर निघाले आहेत. पण अशाप्रकारे पार्लरमध्ये जाणे आपल्याला परवडेलच असे नाही. त्यामुळे काही सोपे उपाय वापरुन तुमची नखे तुम्ही घरच्या घरी स्वच्छ आणि सुंदर ठेऊ शकता. बरेचसे संसर्ग हे नखांच्या अस्वच्छतेमुळे होतात. मात्र तुम्ही नखे स्वच्छ ठेवलीत तर यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. तसेच नखं तुमच्या पर्सनॅलिटीची ओळख करुन देतात.  

( Image : Google)

नखं कापताना...

१. नियमित नखे कापा जेणेकरून नखांना काही लागून ती तुटणार नाही. २. नखे कापताना नखांच्या त्वचेला इजा होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर त्याठिकाणी जिभाळी लागण्याची शक्यता असते. ३. शक्यतो आंघोळ झाल्यानंतर नखे कापा. पाण्यामुळे  नखं मऊ होतात आणि कापतांना त्रास होत नाही. नखे कापून झाल्यानंतर नखांच्या कडा किंवा कोपरे नेलकटरच्या मागील बाजूस असणाऱ्या दातऱ्यांनी एकसारखे करावेत. नाहीतर ही कापलेली टोकदार नखे लागण्याची शक्यता असते. ४. नखं कापून झाल्यावर त्यांना मॉइश्चरायझर लावावे. त्यामुळे नखांची लवचिकता टिकून राहते. मॉइश्चराइझ करण्यासाठी नारळाचे तेल किंवा व्हिनेगरचाही वापर करु शकता. ५. नखं केवळ नेलकटरच्या मदतीनेच कापावीत. घाईघाईत ब्लेड किंवा कात्रीचा वापर केल्याने इजा होऊ शकते. तेसच यामुळे नखांचा आकारही बिघडतो. 

( Image : Google)

नखे आकर्षक दिसावीत म्हणून... 

१. वेगवेगळ्या रंगाचे नेलपॉलिश लावले की आपली नखे आकर्षक दिसतील असे आपल्याला वाटते. पण तसे न करताही नखे आकर्षक दिसू शकतात. 

२. नेलपॉलिशबरोबरच हल्ली बाजारात नखे सजवायच्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात. यामध्ये खोटी रंगीबेरंगी नखे, नेलपॉलिशवर लावायचे ग्लिटर यांचा समावेश होतो. पण सतत या गोष्टींचा वापर केला तर नखे खराब होण्याची शक्यता असते. 

३.सतत नेलपॉलिश लावल्याने नखांना ऑक्सिजन मिळत नाही आणि कालांतराने ती निर्जीव दिसतात किंवा पिवळी पडतात. त्यामुळे पहिले नेलपॉलिश काढल्यावर काही काळ नखे तशीच ठेवा. नखांना श्वास घेण्यासाठी वेळ ठेवा. 

४. आपण वापरत असलेले नेलपॉलिश चांगल्या कंपनीचे, चांगल्या प्रतीचे असेल याची काळजी घ्या. नेलपॉलिश चांगले नसेल तर त्याचा नखांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यातील रंग आणि केमिकल नखांसाठी घातक ठरु शकतात.

५. नेलपॉलिश काढण्यासाठी सौम्य नेल पॉलिश रीमूव्हर वापर करा, नखाने किंवा इतर कोणत्या साधनाने खरडून नेलपॉलिश काढू नका. एसीटोन-मुक्त नेल पॉलिश रीमूव्हर सौम्य असतात आणि आपले नखे कोरडे होण्यापासून वाचवतात. त्यामुळे रिमूव्हर घेताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.       

६. नखे हायड्रेटेड राहण्यासाठी तेलाचा वापर करा. झोपण्याच्या आधी तेल गरम करून ५ मिनिटासाठी नखांची मालिश करा.

७. नखे कोमट पाण्यात किंवा गुलाब पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळेही त्यातील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते.

८. रात्री झोपण्या आधी नारळाच्या तेलाने आपल्या हाताची व नखांची मालिश करा. यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नखे चमकदार होतील.

९. नखे १० मिनिटांसाठी लिंबाच्या किंवा संत्र्याच्या रसात बुडवून ठेवा. त्यानंतर ती गरम पाण्याने धुवा. त्यामुळे नखे वाढण्यास तर मदत होईलच पण ती चमकदारही होतील.

( Image : Google)

आहारात करा 'हे' बदल 

१. नखं स्वस्थ, चमकदार आणि लांब ठेवण्यासाठी तुमचं खाणं — पिणं अगदी योग्य असणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीरामध्ये विटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हीटॅमिन बी आपली नखे देखील बळकट करू शकते, झिंक पांढरे डाग दूर करण्यास मदत करू शकते 

२.व्हिटॅमिन ए आणि सी नखे अधिक हायड्रेटेड आणि चमकदार बनविण्यात मदत करतात.

३.विटामिन ए शरीरातील हाडं, दात आणि नखांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी द्राक्ष, दूध, गाजर, पालक, सफरचंद, अंड अथवा मासे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता.

४.नखांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन बी९ देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्यासाठी तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी९ ची मात्रा वाढवणे गरजेचे आहे. भाज्या, अंडी, बीट आणि आंबट फळांसारख्या पदार्थांतून बी ९ मिळते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स