आपण सगळेच आपल्या त्वचेची काळजी घेतोच. शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते, असे असले तरीही अनेकदा शरीराच्या काही भागांकडे दुर्लक्ष होतं, त्यातला एक भाग म्हणजे अंडरआर्म्स. काख काळी पडणे, तेथील केसांमुळे घामाची दुर्गंधी येणे किंवा त्वचेला खाज येणे यासारख्या समस्या अनेकींना सतावतात. या समस्या कमी करण्यासाठी आपण विकतचे अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स अगदी सर्रास वापरतो. परंतु बाजारात अनेक रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्स उपलब्ध असली, तरी ती त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.
यासाठीच, काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी आणि केस नैसर्गिकरित्या काढण्यासाठी घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरतात. हे उपाय सुरक्षित आणि स्वस्त असून त्वचेला कोणतीही हानी न करता त्वचेचे सौंदर्य वाढवतात. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करून आपण काखेतील काळेपणा आणि केसांचे वॅक्सिंग करु शकतो. हा सोपा घरगुती उपाय केवळ सुरक्षितच नाहीत तर त्वचेला पोषणही देतो. काखेतील काळेपणा आणि केसांचे वॅक्सिंग करण्यासाठी नेमका कोणता आहे हा घरगुती उपाय ते पाहूयात.
साहित्य :-
१. बर्फाचे खडे - १० ते १२
२. ब्राऊन शुगर - १/२ कप
३. आंबेहळद - १/२ कप
४. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...
भेंडीचे पाणी केसांसाठी वरदान! कोरडेपणा- फ्रिझीनेस आणि केसगळतीवर सोप्यात सोपा असरदार उपाय...
कृती :-
सर्वात आधी एका भांड्यात बर्फाचे खडे, ब्राऊन शुगर, आंबेहळद, लिंबाचा रस असे सगळे मिश्रण एकत्रित करावे. त्यानंतर, गॅसवर ठेवून मध्यम आचेवर हे सगळे मिश्रण गरम करून घ्यावे. हळूहळू हे मिश्रण जसजसे गरम होत जाईल तसे ते थोडे चिकट आणि लवचिक होईल. अशाप्रकारे मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
याचा वापर कसा करावा ?
आता तयार मिश्रण थोडे थंड झाल्यावर आपल्या त्वचेला सोसवेल इतके असावे. हे मिश्रण ब्रशच्या मदतीने काखेतील केसांवर लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर हेअर वॅक्सिंगसाठी वापरली जाणारी वॅक्स पट्टी लावून थोडे हलक्या हाताने चोळावे. मग ही हेअर वॅक्सिंग पट्टी हलकेच खेचून काढावी. आपण पाहू शकता की काखेतील केस निघून अजिबात न दुखता किंवा वेदना न होता वॅक्सिंग झालेले असेल. अशाप्रकारे आपण या घरगुती वॅक्सचा वापर करून अंडरआर्म्स आणि काखेतील काळेपणा अगदी सहज दूर करु शकता.