Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅटू काढण्यापूर्वी हे वाचा.. टॅटू काढा, पण इरेज करायची वेळ आली तर काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 16:04 IST

टॅटू काढण्यामुळे होणारे आजार, जखमा आणि त्रास यांचाही विचार  टॅटू काढण्यापूर्वी करायला हवा.

वैद्य राजश्री कुलकर्णी (M.D. आयुर्वेद) तरुणाई म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची क्रेझ असते ! तरतऱ्हेचे फॅशनेबल कपडे,शूज, हेअरस्टाईल ,बॅग्स, गॉगल्स,बेल्ट्स एक ना अनेक गोष्टी ! त्यात आता भर पडलीय नेलआर्ट ,हेअर कलर आणि टॅटूईंग ची ! तरुण वयात आपण सुंदर, आकर्षक दिसावं ,दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे पट्कन वेधलं जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं! मग त्यातूनच विविध फॅशन्सचा उदय होतो ! कपडे किंवा इतर काही ॲक्सेसरीज यांचा डायरेक्ट तब्येतीशी संबंध नसतो पण त्वचेशी निगडित सौंदर्य प्रसाधनं, लिपस्टिक, मस्करा, इतर मेकअप साहित्य,नेलपेंट्स ,हेअर कलर हे मात्र जपून काळजीपूर्वक वापरले पाहिजेत कारण कधी कधी त्यांची ऍलर्जी किंवा इतर दुष्परिणाम जाणवू शकतात. खरं तर हाय हिल्सच्या चप्पल घालणं हादेखील एक त्रासदायक फॅक्टर असू शकतो याचा आपण विचार देखील करत नाही. या गोष्टींपैकीच एक अतिशय पॉप्युलर गोष्ट म्हणजे टॅटू काढणे ! अंगावर जिथं आपल्याला आवडेल तिथं थोडक्यात म्हणजे गोंदवून घेणं ! कॉलेजमध्ये जाणाऱ्या ,नुकत्याच जॉबला लागलेल्या अशा तरुण वयाच्या मुलामुलींना याचं जणू वेड लागलंय असं म्हणायला हरकत नाही.कित्येक तरुण मुलं आज मोठमोठ्या शहरात टॅटू आर्टिस्ट म्हणून करियर करण्याचं स्वप्न बघतात नव्हे तर तसं विशेष प्रशिक्षण घेतात इतकी ही क्रेझ वाढत चाललीय.अगदी छोट्या दोन तीन ठिपक्यांपासून तर अगदी हात पाय भरून जातील इतपत डिझाईन काढून घेतल्या जातात. ज्याची त्याची आवड,ऐपत अशा अनेक गोष्टी यात समाविष्ट आहेत. बरेचदा मित्र मैत्रिणी यांनी काढला म्हणून, पहिला क्रश,पहिलं अफेयर अशा अनेक गोष्टींच्या नादात हे टॅटू गोंदवले जातात !

खरं तर टॅटू ही कला आपल्यासाठी काही नवीन नाही कारण पूर्वापार आपल्याकडे गोंदवून घेतलं जात असे. हे एक प्रकारचं आभूषण समजलं जाई.कपाळ,छाती,मनगट,दंड,हात, बोटं अशा ठिकाणी गोंदवले जाई.विशेष म्हणजे याचं आरोग्य दृष्ट्या महत्व किंवा परिणाम यांचीही पूर्वीपासून माहिती व जाणीव दोन्ही तेव्हापासून होती.घेलवा नावाचं एक तेल गोंदवण्यासाठी वापरलं जाई जे नंतर त्वचेवर हिरवा रंग देत असे. सुई किंवा साळिंदराचा काटा वापरला जाई. रंग गडद यावा म्हणून वर कोळशाची पूड लावली जाई आणि याचा काही त्रास होऊ नये, म्हणून राख लावली जाई.आता जे टॅटूज काढले जातात त्यासाठी वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रसायनं, केमिकल्स वापरून शाई बनवली जाते व तिचा वापर होतो .यात काळा, लाल,पिवळा, निळा,हिरवा अशा सगळ्या रंगांचा वापर केला जातो. लाल रंगाच्या शाई मध्ये Titanium oxide हे केमिकल असतं ,असे प्रत्येक रंगात वेगवेगळे केमिकल्स असतात. आपली त्वचा ही खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते. काही जणांची तर जरा जास्तच कोमल असते,  अशा व्यक्तींना त्वचेवर एलर्जीक रॅश येणं, त्वचा लाल होणं, खाज येणं, पुरळ किंवा अगदी मोठे फोड,boils येणं इतपत रिऍक्शन येऊ शकते.त्वचेच्या एकूण सात स्तरांपैकी साधारण तीन स्तरापर्यंत टॅटू, त्याची शाई पोचते आणि तेवढा खोल त्याचा प्रभावअसतो. तीन स्टेप्स मध्ये हे टॅटू डिझाईन पूर्ण केलं जातं. आधी जी डिझाईन आवडली असेल ती ड्रॉ केली जाते. म्हणजे समजा, एक गुलाबाचं फूल काढायचं आहे तर आधी त्याचं चित्र काढलं जातं, मग त्यात रंग भरणं, शेडिंग वगैरे केलं जातं आणि शेवटी फिनिशिंग टच दिला जातो.हल्ली तर ही कला इतकी विकसित झाली आहे की यात 3D इफेक्ट्स सुद्धा देता येतात.शिलाई मशीनमध्ये ज्या पद्धतीने सुईचा वापर केला जातो तशाच एक किंवा अनेक सुया यात वापरल्या जातात.प्रत्येक वेळी सुई टोचली,एक प्रीक झाला की एक थेंब शाई त्वचेत प्रवेशित होते. जेव्हा हे टॅटूज कायमस्वरूपी म्हणजे पर्मनंट परिणामासाठी काढले जातात तेव्हा ही शाई एकदा त्वचेत गेली,पसरली की काही केल्या काढता येत नाही.ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नाही. प्रत्येक सुई टोचली की किंचित रक्तस्त्राव होतो आणि पुष्कळ वेदनाही होते.

दुष्परिणाम किंवा भीती..

स्वस्तातील टॅटू निश्चितच सुरक्षित नसतात कारण तिथे वापरली जाणारी साधने,सुया,शाई यांची कोणतीही खात्रीदेता येत नाही. स्वच्छता, निर्जंतुक उपकरणांचा वापर याविषयी अनास्था असते त्यामुळे त्वचेचा जंतुसंसर्ग,इन्फेक्शन होण्याची शक्यता खूपच जास्त असते.जर एकच सुई निर्जंतुक न करता एकापेक्षा अधिक व्यक्तींना वापरली जात असेल तर रक्तद्वारे पसरणारे HIV एड्स किंवा कावीळ यासारखे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतात जे खूपच भयावह आहे.काही व्यक्तींना ही शाई आणि एकूणच प्रक्रिया सहन होत नाही आणि जिथे टॅटू काढला असेल त्याच्या आजूबाजूची त्वचा खूप खाजते आणि काही दिवसांनी एकदम जाड होऊन तिथे केलॉइड म्हणजे मृत पेशींचा एक कडक गोळा तयार होतो जो कधी कधी आकाराने खूप वाढतो आणि त्वचा टॅटूने सुंदर दिसण्या ऐवजी कुरूप दिसू लागते.आजपर्यंत असं सिद्ध झालं आहे की काहीतरी फॅन्सी करायच्या नादात किंवा मित्रमंडळीच्या आग्रहाला बळी पडून जे लोकं टॅटू काढून घेतात त्यापैकी 60 % लोकांना नंतर पश्चात्ताप होतो आणि मग तो टॅटू काढून टाकण्यासाठी विविध प्रयत्न करायला सुरुवात होते. लेझर वगैरे उपचार करून हे काढणं खूप खर्चिक असल्याने मग काही ऐकीव उपाय केले जातात जे अजून तापदायक असतात.उदा. गूळ आणि चुना एकत्र करून लावणे , इतर काही बाजारू उत्पादने वापरणे यामुळे त्वचेला उष्णतेचा त्रास होणे,पुरळ येणे,जखम किंवा मोठा व्रण तयार होणे,खड्डा पडणे असे असंख्य त्रास उद्भवू शकतात.ब्रेकअप वगैरे झाले असेल तर आधी गोंदलेली नावे, आठवणी बुजवून टाकण्यासाठी कव्हर अप टॅटू काढला जातो, त्याचाही वेगळा त्रास होतो कारण टॅटूची व्याप्ती,खर्च आणि रिस्क सगळंच वाढतं! लेझरने काढण्याचा प्रयत्न केला तरी 100 % टॅटू निघत नाही ,किमान20 ते 30 % भाग,रंग,आकृती तशीच राहते.

काय काळजी घ्याल?

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला खरंच टॅटू काढायचा आहे का ,तो कायम आपल्या त्वचेवर राहणार आहे ते आपल्याला चालणार आणि आवडणार आहे ना याचा पूर्ण विचार करुन मगच टॅटू काढायचा विचार पक्का करावा.टॅटू किती लहान / मोठा हवा आहे तसेच तो शरीराच्या दिसणाऱ्या भागावर हवा आहे की झाकलेल्या याचाही विचार करावा.चांगल्या विश्वासू,रेप्युटेड ठिकाणीच टॅटू काढून घ्यावा.तिथली स्वच्छता, निर्जंतुकीकरण ,साहित्याची शुद्धता ( purity) याची संकोच न करता पूर्ण चौकशी करावी. एकदम फार मोठा टॅटू सुरुवातीलाच काढू नये, टेस्ट किंवा ट्रायल म्हणून आधी एखादी छोटीशी डिझाईन काढून बघावी, काही त्रास झाला नाही तर दुसऱ्या डिझाईनचा विचार करता येईल.टॅटू काढल्यानंतर त्वचेची काळजी घ्या, ती स्वच्छ ठेवा.त्वचा कोरडी होऊ देऊ नका ,काही मॉइश्चरायझर वापरा.लगेच ऊन लागू देऊ नकाकाही दिवस पोहणं टाळा कारण इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.शक्यतो सिंथेटिक कपड्यांचा स्पर्श त्या ठिकाणी होऊ देऊ नकाकमीतकमी दोन आठवडे काळजी घ्या.जर खाज,आग किंवा पुरळ अशी काही लक्षणं जाणवली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे स्वतःची पूर्ण मानसिक तयारी झाल्याशिवाय कोणाच्याही आग्रहाला बळी पडून टॅटू नक्कीच काढून घेऊ नका कारण तो तुम्ही तुमच्या आनंदासाठी काढत आहात, नंतर पश्चात्ताप करण्यासाठी नव्हे हे लक्षात घ्या !Happy tattooing !