त्वचा म्हणायला सामान्य. पण चेहेरा बघावा तेव्हा तेलकटच. हे असं का? याला कारण म्हणजे चेहेर्याच्या टी झोनचा तेलकटपणा. टी झोनवर सतत घाम येऊन तो तेलकट दिसू लागतो. आणि इथल्या सततच्या तेलकटपणामुळे संपूर्ण चेहेरा तेलकट दिसतो. मुरुम, पुटकुळ्या, ब्लॅक हेडस, व्हाइट हेडस अशा समस्यांनी चेहेरा खराब होतो. त्यामुळे चेहेर्याच्या टी झोनची काळजी घेणं सर्वात आवश्यक बाब आहे.
टी झोन म्हणजे?
छायाचित्र- गुगल
त्वचा जर तेलकट असेल तर मुरुम पुटकुळ्यांची समस्या हमखास उद्भवते. तसेच चेहेर्याचा टी झोनही प्रमाणापेक्षा जास्त तेलकट होतो. पण काहींच्या बाबतीत चेहेर्याचा इतर भाग तेलकट नसतो, फक्त टी झोनवरच सतत तेल जमा होतं, त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण चेहेर्यावर होतो. चेहेर्याचा टी झोन म्हणजे कपाळ, नाक, वरच्य्या ओठाचा भाग आणि हुनवटी. या चार भागांचा मिळून टी झोन असतो आणि तो चेहेर्याचा महत्त्वाचा भाग असतो. हा भाग जर सतत तेलकट राहात असेल तर ब्लॅकहेडस आणि व्हाइट हेडस सारख्या समस्य्या निर्माण होतात. तसेच येथील तेलकटपणामुळे मेकअप कसा करायचा असाही प्रश्न पडतो. कारण या टी झोनवरील तेलकटपणावर आपल्याकडे काही उत्तरच नसतं. टी झोनवरील तेलकटपणामुळे जर सौंदर्य समस्या निर्माण होत असतील तर आधी त्याकडे लक्ष द्यायला हवं. टी झोनवर तेल जमा होणार नाही यासाठी उपाय करणंही आवश्यक् आहे. अर्थात हे उपाय आपले आपण घरच्याघरी करु शकतो.
छायाचित्र- गुगल
टी झोनची काळजी घेताना
1. टी झोनची काळजी घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपल्याला या टी झोनवरचा अतिरिक्त तेलकटपणा कमी करायचा आहे. चेहेर्याचा बाकी भाग तेलकट नसेल तर आपलं लक्ष केवळ टी झोनच्या तेलकटपणावरच केंद्रित व्हायला हवं. जर चेहेर्याचा इतर भाग तेलकट नसेल आणि संपूर्ण चेहेर्यावर तेलकटपणा घालवण्याचे उपाय केले तर चेहेर्याच्या इतर भागाची त्वचा खराब होते आणि नवीनच प्रश्न निर्माण होतो.
2. चेहेर्यावरच्या ब्लॅकहेडसाठी आपण जे करतो तेच टी झोनचा तेलकटपणा घालवण्यासाठी करणं अपेक्षित आहे. यात एक्सफोलिएशन करणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. एक्सफोलिएशन शिवाय टी झोनवरचा तेलकटपणा जाणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा टी झोनचं एक्सफोलिएशन करण्याची सवय लावून घेणं महत्त्वाचं आहे.
छायाचित्र- गुगल
3. रात्री झोपताना चेहेरा धुण्याचा नियम अवश्य लक्षात ठेवावा आणि पाळावा. टी झोन तेलकट असेल, चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या असतील तर रात्री झोपण्याआधी क्लीन्जरनं चेहेरा स्वच्छ करुन धुणं गरजेचं आहे.
4. चेहेर्याचा टी झोन तेलकट असेल तर आपण जी सौंदर्य उत्पादनं वापरतो त्याबाबतीतही काळजी घेणं आवश्यक आहे. तेलकट टी झोन असणार्यांनी जेल बेस्ड मॉश्चरायझर आणि वॉटर बेस्ड क्लीन्जर वापरावं.
या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी केल्या तरी तेलकट टी झोनची समस्या लवकर दूर होईल.