Join us

एक चमचा मधाची जादू! 3 प्रकारे  चेहेऱ्याला लावा चमचाभर मध, पाहा बदल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 17:46 IST

मधाच्या उपयोगानं चेहेर्‍यावरील केवळ डागच जातात असं नाही तर इतर सौंदर्यविषयक समस्याही सहज सुटतात. चेहेर्‍यावरील समस्या घालवण्यासाठी मध हळद, मध लिंबू आणि मध आणि अंडं या तीन पध्दतीने मधाचा उपयोग करुन त्वचा निर्मळ करा.

ठळक मुद्देमध आणि हळद त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतातलिंबू साखर आणि मध यांचा एकत्रित वापर केल्यानं चेहेर्‍यावरील व्हाइट हेडस जातात.

चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येणं ही एक समस्या आणि त्या बर्‍या झाल्या की तिथे डाग पडणं ही आणखी एक समस्या. ती घालवण्यासाठी कितीही महागड्या क्रीम्स वापरा काहीच उपयोग होत नाही. अशा समस्येवर एक प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मध.मधाच्या उपयोगानं चेहेर्‍यावरील केवळ डागच जातात असं नाही तर इतर सौंदर्यविषयक समस्याही सहज सुटतात. अनेकजणींना चेहेर्‍यावर ब्लॅकहेडस आणि व्हाइट हेडसची समस्या असते. व्हाइट हेडस म्हणजे पांढरे डाग जे तेलकट त्वचेवर येतात. हा एक प्रकारचा मुरुमाचाच प्रकार आहे. त्वचेच्या रंध्रात घाण जमा झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. ती स्वच्छ करण्यासाठी मधाचा उपयोग होतो.चेहेर्‍यावरील समस्या घालवण्यासाठी मधाचा उपयोग करण्याच्या तीन पध्दती आहेत.

मध कसं वापराल?

छायाचित्र- गुगल  

1. मध आणि हळद हे दोन घटक म्हणजे त्वचेच्या समस्या बर्‍या करण्यासाठीचे उत्तम पर्याय आहेत. मध आणि हळद त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतात आणि मुरुम पुटकुळ्या आणणार्‍या जीवाणूंना रोखतात.चेहेर्‍याच्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मध घ्यावं. या दोन्ही गोष्टी नीट एकजीव कराव्यात. एक घट्ट पेस्ट तयार होते. ही पेस्ट चेहेर्‍यास लावावी. ती दहा पंधरा मिनिटं तशीच ठेवावी. नंतर कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा.

2. चेहेर्‍यावरच्या समस्यांसाठी लिंबू, साखर आणि मध या तीन गोष्टी एकत्र करुन वापरणं फायदेशीर ठरतं. यात सूक्ष्मजीव विरोधी घटक असतात. यांचा एकत्रित उपयोग केल्याने चेहेर्‍यावरील व्हाइट हेडस जातात. साखर ही त्वचेवर स्क्रबसारखं काम करते. आणि मधामुळे चेहेर्‍याला मॉश्चराइजर मिळतं.

छायाचित्र- गुगल  

या तीन गोष्टी एकत्रित वापरण्यासाठी एका भांड्यात एक चमचा साखर आणि एक च्मचा मध घ्यावं. त्यावर लिंबाचा रस घालावा. चेहेर्‍यावर जिथे व्हाइट हेडस असतील तिथे हा लेप हळुवार मसाज करत लावावा. दहा मिनिटं हा लेप तसाच चेहेर्‍यावर राहू द्यावा. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.

छायाचित्र- गुगल  

3. त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी अंडंही फायदेशीर असतं. अंड्यातील पांढरा भाग यासाठी उपयोगात येतो. अंड्यातील पांढरा भाग आणि मध एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेर्‍यावर लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवावी. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.