Join us  

मेकअपचं साहित्य, कॉस्मेटिक्स यांनाही एक्सपायरी डेट असते हे माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 3:39 PM

Beauty Tips : लॉकडाऊनमुळे मेकअपच्या सामानाला आराम दिलाय? आवडते ब्युटी प्रोडक्टस खराब होऊ नये म्हणून वापरा 'या' टिप्स

-मनाली बागुल

 

'घरूनच काम करतेय ना, मग मेकअप कशाला.' ऐरवी ही शेड लावू की ती, याचा बराचवेळ विचार करणारे आपण आता लॉकडाऊनमुळे मेकअपच्या साहित्याला विसरून गेलोय. जणू काही आपण घरात आणि लिपस्टीक, काजळ त्यांच्या पाऊचमध्ये लॉकडाऊन झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून बाहेर येणं जाणं कमी झाल्यामुळे सगळ्यांनीच सणासुदीला सोडलं तर फार कमी प्रमाणात मेकअपचा वापर केला. पण तुम्हाला माहीत आहे का, जास्त दिवस न वापरता कॉस्मेटिक तसेच ठेवले तर त्यांच्या दर्जावर परिणाम होतो. मुख्य म्हणजे या प्रॉडक्ट्सनाही एक्सपायरी डेट असू शकते.  आता तुम्ही म्हणाल, घराबाहेर पडायचं नसेल तर घरच्याघरी मेकअपचं साहित्य वापरायचं का? तर तसं नाही, जरी तुम्ही रोज या गोष्टींचा वापर केला नाही तरी तुम्ही त्या नीट सांभाळून तर नक्कीच ठेवू शकता.

तुमची आवडती लिपस्टीक, फाऊंडेशन, मस्कारा, काजळ या वस्तू जास्तीत जास्त दिवस चांगल्या कशा ठेवता येतील, आणि त्याचा तुमच्या त्वचेला त्रास न होता, उलट त्वचेला लाभ होईल यााबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होतं काय की,  अनेकदा आपण मेकअपचं साहित्य व्यवस्थित ठेवलं जात नाही त्यामुळे या गोष्टी एक एक करून खराब व्हायला सुरूवात होते. खराब प्रॉडक्ट्स वापरल्यानं अनेकदा त्वचेवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

मग काय करता येईल..

१) सगळ्यात आधी मेकअपचं साहित्य वेगळं करा. त्यानुसार तुम्हाला पाऊच किंवा पेटी बनवता येईल. रोज लागणाऱ्या साहित्यामध्ये , लिपस्टीक, काजळ, लायनर असे साहित्य असू शकते. या सामानाला फार जागा लागणार नाही. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला काय काय रोज लागतं ते वेगळं ठेवून द्या.

२) अनेकदा आपल्याला खूप ऑपशन्स असतात त्यावेळी नेमकं काय वापरायचं हेच कळत नाही. अशावेळी जे प्रॉडक्ट लवकर जुने होणार आहेत. ते आधी वापरायला घ्या. तुमच्या रोजच्या मेकअप किटमध्ये ते प्रॉडक्ट असू द्या. जेणेकरून तुम्ही याचा रोज वापर कराल आणि नुकसानही होणार नाही.

३) जर तुम्ही कॉलेज, ऑफिस किंवा बाहेर पडताना मेकअपच्या दोन-तीन वस्तू कॅरी करत असाल तर मिनीएचर प्रोडक्टची म्हणजेच लहान आकाराच्या प्रॉडक्ट्सची निवड करा आणि असे प्रॉडक्ट्स बाजूला काढून ठेवा. कमीत कमी जागेत तुम्ही आरामात या वस्तू कुठेही नेऊ शकता.

४) लिपस्टीक, काजळ उघडताना किंवा बंद करताना व्यवस्थित काळजी घ्या. अनेकदा लिपस्टीकचा अर्धा भाग वर असतानाच झाकण लावलं जातं त्यामुळे प्रॉडक्ट तर खराब तर होतातच. पण अशा वस्तू तुम्ही जास्तवेळ वापरूसुद्धा शकत नाही.

५) आयलायनर, फाऊंडेशन, नेलपेंट अशा वस्तू वापर झाल्यानंतर व्यवस्थित आणि स्वच्छ जागेवर घट्ट झाकण लावून ठेवा. काहीवेळा झाकणं सैल असल्यामुळे प्रॉडक्ट्सच्या आत हवा जाते. परिणामी कमी वेळातच ते खराब होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत.

खूप दिवसांनी मेकअपचं साहित्य वापरल्यास त्वचेवर कसा परिणाम होतो?.

त्वचा हा आपल्या शरीराचा सगळ्यात नाजूक भाग आहे. त्यामुळे मॉईश्चराइजर, लिपस्टीक असो किंवा अन्य उत्पादनं बरेच दिवस तसेच ठेवल्यानंतर त्वचेवर अप्लाय करताना त्याचे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाही ना, असा विचार सगळ्यांच्याच मनात येतो. याबाबत त्वचा आणि सौंदर्यं उत्पादन तज्ज्ञ डॉ. केतकी गोगटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, '' सौंदर्यं प्रसाधनं अनेक दिवस वापरात नसताना पुन्हा वापरल्यास फारसा दुष्परिणाम दिसून येत नाही. कारण अलिकडे प्रत्येक कंपन्यांमधून ॲनिमल टेस्टिंगसारख्या वेगवेगळ्या चाचणी प्रकिया पूर्ण करूनच उत्पादन विक्रीस काढली जातात. मात्र तरीही शक्यतो ब्रॅण्डेड आणि एक्सपायरी डेट पाहूनच उत्पादनांचा वापर केला जावा. अगदीच दोन- तीन वर्ष जुनं एखादं ब्यूटी प्रॉडक्ट्स तुम्ही वापरत असाल तर सौम्य एलर्जीप्रमाणे साईड इफेक्ट्सचा धोका उद्भवू शकतो.''

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिलामेकअप टिप्स