Join us  

करिश्मा कपूरची ६२ हजारांची कांचीपुरम साडी! साडीचा श्रीमंती थाट पाहून वाटेल आपल्याकडे हवीच एक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 1:27 PM

करिश्मा कपूरचा फेस्टिव्ह लूक नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिवाळीची खरेदी सुरु करण्यापुर्वी तिच्या या कांचीपुरम साडीवर एक नजर टाकायला अजिबात विसरू नका. तसेच कांचीपुरम, कांजीवरम साडी नेमकी असते तरी कशी, हे देखील जाणून घ्या. 

ठळक मुद्देसाड्यांच्या विश्वात पैठणीला जसा मान आहे, तसाच मान कांजीवरम साड्यांना असतो. साड्यांची राणी म्हणून कांजीवरम साडी ओळखली जाते.

दिवाळी जवळ आली की घरातल्या महिलांना खूप- खूप कामे असतात. घर आवरणे, फराळाची तयारी इथपासून ते शॉपिंग, गिफ्ट्स, घराची सजावट- रांगोळी असे सगळेच महिलांना सांभाळावे लागते. यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचे प्लॅनिंगही या काळात प्रत्येक जणींच्या डोक्यात सुरु असते. ते म्हणजे दिवाळीच्या प्रत्येक दिवसात कोणकोणते कपडे आणि दागदागिने घालावेत याचे. दिवाळीचा एक दिवस तरी साडीला मान दिलाच जातो आणि कंम्प्लिट ट्रॅडिशनल मेकअप करण्याकडे महिलांचा कल असतो. मग जर दिवाळीला साडी घेण्याचा विचार करत असाल तर लोलो म्हणजेच आपल्या करिश्मा कपूरच्या कांचीपुरम साडीचा श्रीमंती थाट एकदा बघून घ्याच.

 

आजकाल चित्रपटांमधून दिसणारा करिश्माचा वावर जवळपास बंदच झाला असला, तरी सोशल मिडियावर मात्र ती प्रचंड ॲक्टीव्ह आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्याशी कनेक्ट होण्याचा नेहमीच प्रयत्न करते. सध्या दिवाळी तोंडावर आली असल्याने करिश्मादेखील प्रचंड एक्साईटेड आहे. करिश्माने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिश्मा अतिशय सुंदर दिसत असून तिचा फेस्टीव्ह लूक पाहून खरोखरंच दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत आहे, हे नक्की.

 

कपूर खानदानाच्या जातिवंत सौंदर्याचा वारसा करिश्माकडे आहेच, पण त्या सौंदर्याला चार चाँद लावण्याचे काम केले आहे अतिशय आकर्षक अशा कांचीपुरम साडीने. करिश्माची ही साडी कंकाटला या ब्रॅण्डने डिझाईन केली असून साडीचा रंग ब्राईट पिवळा असून काठ गुलाबी रंगाचे आहेत. साडी तर अतिशय सुरेख आहेच, पण ती तेवढ्याच सुंदर पद्धतीने करिश्माने कॅरी केली आहे. या दिवाळीला जर तुम्ही ट्रॅडिशनल लूक करायचा विचार करत असाल, तर करिश्माचा लूक फॉलो करायला काहीच हरकत नाही.

 

करिश्माचा आकर्षक फेस्टिव्ह लूकगुलाबी काठ असणाऱ्या कांचीपुरम साडीवर करिश्माने गुलाबी रंगाचे ब्लाऊज घातले आहे. हे ब्लॉज कोपऱ्यापर्यंत लांब बाह्याचे असून मागच्याबाजूने त्याला नॉट आहेत. कुठलीही स्त्री अगदी सहजपणे कॅरी करू शकेल, एवढा साधा परंतू तेवढाच आकर्षक लूक करिश्माने केला आहे. केसांचा तिने अंबाडा घातला असून काळ्या रंगाची मोठी गोल टिकली तिला आकर्षक फेस्टिव्ह लूक देणारी ठरली आहे. कानात लांब झुमके घातलेली करिश्मा या साडीत खरोखरंच खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळेच करिश्माच्या या पोस्टवर तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या असून धकधक गर्ल माधुरी दिक्षित नेने हिने देखील  “Lovely” अशी कमेंट टाकून करिश्माची तारिफ केली आहे. 

 

कांजीवरम की कांचीपुरमअमूक एकीने कांजीवरम साडी घेतली किंवा नुकतीच एखाद्या मैत्रीणीने कांचीपुरम साडी घेतली, असे आपण नेहमीच ऐकतो. आता कांजीवरम आणि कांचीपुरम साडी म्हणजे काय? मग करिश्मा नेसली आहे ती साडी कांजीवरम आहे की कांचीपुरम? मग दुकानात गेल्यावर आपण कांजीवरम साडी मागायची की कांचीपुरम? असे प्रश्नही आपल्या मनात डोकावले असतीलच. म्हणूनच तर सगळ्यात आधी या दोन्ही साड्यांबाबत मनात असलेला एक मोठा गैरसमज दूर करा. कांजीवरम आणि कांचीपुरम ही एकाच साडीची दोन वेगवेगळी नावे आहेत. कांजीवरम आणि कांचीपुरम असं काहीही तुम्ही या साड्यांना म्हणू शकता. 

 

कांचीपुरम साडीचा इतिहास साड्यांच्या विश्वात पैठणीला जसा मान आहे, तसाच मान कांजीवरम साड्यांना असतो. साड्यांची राणी म्हणून कांजीवरम साडी ओळखली जाते. या मऊ, मखमली साडीचा जन्म तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम या छोट्याशा गावात झाला. असं म्हणतात की राजा कृष्ण देवराय यांच्या काळात आंध्र प्रदेशातून काही कारागिर कांचीपुरम येथे आले आणि त्यांनी तेथे या साडीचे विणकाम सुरु केले. गावाच्या नावावरूनच या साडीला कांचीपुरम साडी असे म्हणतात. ब्रिटिश लोक या साडीला कोंजीवरम म्हणायचे. म्हणूनच मुळच्या कांचीपुरम या शब्दाचा अपभ्रंश होत गेला आणि आता या साडीला बरेच जण कांजीवरम साडी असंच म्हणू लागले आहेत. दक्षिण भारतात तर या साडीला अतिशय मान असून कोणतेही शुभकार्य या साडीनेच पुर्णत्वाला जाते असे येथील महिलांचे म्हणणे असते. त्यामुळे लग्नकार्यात तर तेथे ९५ टक्के महिला आपल्याला कांचीपुरम साडीतच दिसून येतात. त्यामुळेच दक्षिण भारतात या साडीला ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखले जाते. ४०० वर्षांचा मोठा इतिहास असणाऱ्या या साडीला भारत सरकारने जीआय मानांकन देऊन सन्मानित केले आहे. 

 

कांचीपुरम साडीची खासियतअतिशय नाजूक आणि सुबक रेशमी काम हे या साडीचे वैशिष्ट्य आहे. या साडीची आणखी एक मुख्य खासियत म्हणजे ही साडी कधीही एकसलग विणण्यात येत नाही. साडी वेगळी विणली जाते आणि साडीचा पदर वेगळा विणला जातो. जेव्हा हे दाेन्ही भाग वेगवेगळे विणून पुर्ण होतात, तेव्हा मग ते एकत्र आणून जोडले जातात. पण हे दोन भाग इतक्या सफाईने एकत्र केलेले असतात, की तुम्ही अतिशय बारकाईने पाहिले तरी त्यांच्यात जोड दिसून येणार नाही.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकरिश्मा कपूरसेलिब्रिटीदिवाळी 2021मेकअप टिप्स