Join us

तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी जपानी बायका लावतात राइस क्रीम! हे जादुई क्रीम आहे काय? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 14:09 IST

जपानी महिलांचं ब्यूटी सिक्रेट ‘क्विक स्किन सिक्रेट’ म्हणून ओळखलं जातं. तांदळाचा वापर करुन त्या क्रीम आणि लेप तयार करतात आणि रोज वापरतात. या सिक्रेटचा उपयोग जपानी महिलाच करु शकतात असं नाही. तर जगभरातल्या सर्व महिलांना हे क्विक स्किन सिक्रेट  करुन पाहात येणं सहज शक्य आहे.

ठळक मुद्देजपानी महिलांच्या सौंदर्य उपचारात पांढरा तांदूळ खूप महत्त्वाचा असतो.तांदूळ शिजवून गुलाबजल टाकून वाटून तयार केलेली ही राइस क्रीम त्वचेची काळजी घेण्यासाठी त्या नियमित वापरतात.आपल्या त्वचेचं तारुण्य टिकून रहावं यासाठी जपानमधील महिला तांदळाचाच उपयोग करुन अँण्टि एजिंग फेसमास्क तयार करतात.

सध्या सौंदर्याच्या जगात जपानी महिलांबाबत खूप चर्चा होते आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची डागरहित त्वचा. त्यांचं त्यांच्या चेहेर्‍यावरुन न दिसणारं वय हे महिलांच्या कुतुहलाचा विषय झाले आहेत. जपानी महिलांनी कदाचित निर्दोष त्वचेची दैवी देणगी असावी असा समज अनेकींचा आहे. पण हे खरं नाही. म्हणजे जगभरातल्या महिलांना होणार्‍या त्वचेसंबंधीच्या समस्या जपानी महिलांनाही जाणवतात. मुरुम,पुटकुळ्या, फोड, ब्लॅकहेडस, व्हाइट हेडस, डाग यासारख्या सौंदर्य समस्या त्यांनाही असतात. पण या समस्यांना त्या डोकं वर काढण्यासाठी संधीच देत नाही. आणि तरीही अशा काही समस्या निर्माण झाल्या तरी त्या फार काळ त्यांच्या चेहेर्‍यावर रहात नाही. त्यांचं ब्यूटी रुटीन हे त्यामागचं गुपित आहे. हे गुपित ‘ जपानी महिलांचं क्विक स्किन सिक्रेट म्हणून ओळखलं जातं. अर्थात या सिक्रेटचा उपयोग जपानी महिलाच करु शकतात असं नाही. तर जगभरातल्या सर्व महिलांना हे क्विक स्किन सिक्रेट करुन पाहाता येणं सहज शक्य आहे.

छायाचित्र:- गुगल

राइस क्रीम

जपानी महिला त्वचा जपण्यासाठी घरच्या घरी एक उपाय करतात. त्या राइस क्रीम तयार करतात, त्याचा नियमित वापर करुन त्या आपली त्वचा जपतात आणि सुंदर ठेवतात . त्यांच्या सौंदर्य उपचारात पांढरा तांदुळ खूप महत्त्वाचा असतो. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी त्यांना या तांदळाचा उपयोग होतो. या तांदळापासून त्या त्यांचं फेव्हरिट राइस क्रीम तयार करतात. हे राइस क्रीम तयार करणं सोपं असून ते आपणही करु शकतो.यासाठी एका कढईत किंवा एखाद्या पातेल्यात दोन चमचे पांढरे तांदूळ घ्यावेत. त्यात एक कप पाणी घालावं. मंद आचेवर तांदूळ शिजू द्यावेत. जेव्हा भात पूर्ण शिजून एका घट्टसर पेस्टसारखी दिसायला लागली की गॅस बंद करावा. आता या शिजलेल्या मिश्रणात एक ते दोन चमचे गुलाबपाणी घालावं. हे मिर्शण एका चमच्यानं फेटून याची आणखी बारीक पेस्ट करुन घ्यावी. चमच्यानं फेटण्यापेक्षा ते मिक्सरमधे बारीक केले तर उत्तम पेस्ट होते.

छायाचित्र:- गुगल

आता ही पेस्ट एका चाळणीनं एका भांड्यात गाळून घ्यावी. ही पेस्ट घट्ट असल्यानं गाळायला थोडा वेळ लागतो. गाळलेल्या मिश्रणात दोन चमचे दूध घालावं आणि ते चांगलं मिसळावं. दूध मिश्रणात चांगलं मिसळलं गेलं की मग त्यात एक चमचा ऑलिव्ह तेल घालावं. ऑलिव्ह तेल चांगलं मिसळलं गेलं की एक चमचा खोबर्‍याचं तेल घालावं. आणि मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिसळून घ्यावं. पेस्टमधे ही सर्व सामग्री एक एक करुनच घालावी. ती एकदम टाकू नये. अशा पध्दतीनं ही राइस क्रीम तयार होते. ती नंतर एका हवाबंद बाटलीत भरुन ठेवावी.

छायाचित्र:- गुगल

राइस क्रीम कसं लावावं?

तांदूळ शिजवून गुलाबजल टाकून वाटून तयार केलेली ही राइस क्रीम त्वचा उजळण्यासाठी, त्वचेवर तेज आणण्यासाठी खूप परिणामकारक असते असं जपानमधील सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. ही राइस क्रीम रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहेर्‍यास लावावी. आधी चेहेरा क्लीन्जर किंवा गुलाबजल यांच्या सहाय्यानं स्वच्छ धुवावा. त्वचा जर अधिक कोरडी असेल तर आधी चेहेर्‍यावर बदाम किंवा खोबर्‍याच्या तेलानं मसाज करावा. मसाज झाला की थोडं राइस क्रीम हातावर घेऊन ते चेहेर्‍याला हलका मसाज करत लावावं. ते रात्रभर राहू द्यावं. क्रीम नियमित लावल्यास त्वचा उजळते , चमकदार होते शिवाय आपल्या त्वचेवर सुरकुत्याही पडत नाही. चेहेर्‍यावरील वय दाखवणार्‍या रेषा, डाग असतील तर ते ही या राइस क्रीमने सहज जातात.

छायाचित्र:- गुगल

जपानी महिलांचं अँण्टि एजिंग फेस मास्क

आपल्या त्वचेचं तारुण्य टिकून रहावं यासाठी जपानमधील महिला तांदळाचाच उपयोग करुन अँण्टि एजिंग फेस मास्क तयार करतात. यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ, 3-4 द्राक्षं आणि एक ते दोन थेंब विटामिन इ ऑइल हे साहित्य घेतात.  हा फेस मास्क तयार करण्यासाठी आधी द्राक्षाचं साल काढून घेतात आणि द्राक्ष मिक्सरमधे वाटून घेतात. वाटलेल्या द्राक्षाच्या पेस्टमधे तांदळाचं पीठ घालतात आणि ते चांगलं एकजीव करतात. त्यानंतर त्यात विटामिन इ ऑइलचे थेंब टाकून तेही त्यात चांगलं एकत्र करतात.अँण्टि एजिंग फेस मास्क चेहेर्‍यावर लावताना आधी चेहेरा क्लींजरने स्वच्छ करावा. स्क्रबच्या सहाय्यानं चेहेरा एक्सफोलिएट करुन घेतल्यास उत्तम. त्यानंतर तयार केलेला लेप पूर्ण चेहेर्‍याला लावावा. पंधरा मिनिटं हा लेप सुकू द्यावा. पंधरा मिनिटाच्या आतच जर लेप सुकला तर पुन्हा चेहेर्‍याला लेप लावावा. पूर्ण पंधरा मिनिटं झाली की चेहेरा धुवावा आणि चेहेर्‍यास फेस क्रीम लावावं.या जपानी पध्दतीच्या अँण्टि एजिंग फेस मास्कमुळे चेहेर्‍यावरील सुरकुत्या, मुरुम-पुटकुळ्या, डाग निघून जातात. चेहेरा चमकदार होतो. द्राक्षात असलेल्या अँण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून रक्षण होतं. त्वचेखालील कोलॅजनची निर्मिती वाढते. त्यामुळे त्वचा निरोगी रहाते आणि चमकदार होते. यातील विटामिन इ ऑइल चेहेर्‍याची त्वचा ओलसर राखण्यास मदत करतं आणि चेहेर्‍यावरील काळे डाग घालवतं.