Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर केस हवे तर लावा नाइट हेअर पॅक, केसांची काळजी घेण्याचे 4 नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 17:00 IST

केसांच्या काळजीसाठी नाइट हेअर केअर रुटीन महत्वाचे; केस जपण्यासाठी रात्री 4 नियम पाळा

ठळक मुद्देरात्री केसांना आर्द्रता मिळणं आवश्यक असतं. तरच केसांची चमक वाढते. केस अस्वच्छ असतील तर ते तसेच ठेवून झोपणं चुकीचं आहे. झोपताना केस मोकळे सोडू नये किंवा घट्ट बांधून ठेवू नये. 

त्वचा जपण्यासाठी, सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी रात्री झोपण्याआधी काही नियम पाळणं महत्वाचं असतं. यालाच नाइट स्किन केअर रुटीन असं म्हटलं जातं. त्वचेप्रमाणे केसांसाठीही नाइट हेअर केअर रुटीन पाळणंही आवश्यक असतं. दिवसभर त्वचेप्रमाणे केसांवरही रासायनिक घटक युक्त प्रोडक्टसचा वापर झालेला असतो. रात्री झोपण्यापूर्वी केसांवर हेअर स्प्रे, जेल आदी स्वरुपात वापरलेले रासायनिक घटक केसांवरुन काढून टाकणं गरजेचं असतं. केसांवर जर हेअर स्प्रे आणि जेल लावलेले असेल आणि ते रात्रीही केसांवर राहिले तर त्यामुळे केस खराब होतात. केसांची वाढ खुंटते. हे टाळण्यासाठी नाइट हेअर केअर रुटीनचे 4 नियम पाळायला हवेत. 

Image: Google

नाइट हेअर केअर रुटीन

1. ज्याप्रमाणे त्वचा ओलसर आणि निरोगी राखण्यासाठी माॅश्चरायझर लावणं महत्वाचं असतं त्याचप्रमणे केसांना चमक येण्यासाठी  टाळूला पोषण मिळणं आवश्यक असतं. यासाठी रात्री केसांना तेल लावावं. खोबऱ्याचं तेल गरम करुन किंवा थोडं ऑलिव्ह तेल केसांना लावल्यानं केस मुलायम राहातात. तेलामुळे केसांचं नुकसान टाळण्यासाठी टाळूवर संरक्षणात्मक कवच तयार होतं. तेलकटपणा टाळण्यासाठी नाॅन ग्रीसी ऑइल वापरलं तरी चालतं. या उपायानं केस मजबूत होतात आणि केसांना चमक येते. 

2. केस जर अस्वच्छ असतील तर रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ धुवायला हवेत.अस्वच्छ केस जर रात्रभर तसेच ठेवले तर यामुळे टाळूच्या त्वचेचं नुकसान होतं. केस अस्वच्छ असतील तर झोपण्यापूर्वीच केस धुवायला हवेत. केस धुतल्यानंतर व्यवस्थित वाळवून घ्यावेत. सकाळी केस धुवून, घाईने वाळवून पोनी किंवा वेणी घातल्यास केस खराब होण्याचा धोका असतो. रात्री केस धुवून वाळवल्यास केसांच्या मुळाशी नैसर्गिक तेल निर्मितीला चालना मिळते. 

Image: Google

3. केस अस्वच्छ असतील तर रात्री धुणं जेवढं गरजेचं तितकंच झोपण्याआधी केस वाळणंही गरजेचं असतं. झोपण्यापूर्वी दोन तास आधी केस धुतल्यास केस वाळण्यास पुरेसा वेळ मिळतो. झोपताना केस ओले असू नये. यामुळे सर्दी, कफाचा धोका असतो तसेच केस तुटण्याचाही असतो. 

Image: Google

4. झोपताना केस मोकळे सोडावेत हा समज चुकीचा असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. झोपताना केस मोकळे सोडल्यास केसात गुंता होण्याचं प्रमाण वाढतं. केस तुटतात. केस मोकळे सोडून झोपणं जितकं चुकीचं तितकंच केस घट्ट बांधून झोपणं, झोपताना केसांचा अंबाडा घालणं किंवा घट्ट वेणी घालणं चुकीचं. केस घट्ट बांधल्यस केस जास्त वेळ ताणलेले राहातात. टाळूशी निर्माण होणारं नैसर्गिक तेल केसांवर पसरण्यास अडथळे निर्माण होतात. म्हणून झोपताना केस हळूवार विंचरुन केसांची ढीली पोनी बांधावी किंवा केसांची ढीली वेणी घालावी. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स