Join us

स्लिव्जलेस ड्रेस घालायला आवडतात, पण...काखेतल्या काळपट डागांची लाज वाटते? त्यावर हे उत्तम उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 13:39 IST

काखेत काळेपणा आला की काय करावे हे आपल्याला माहित नसते. अशावेळी आपण सतत व्हॅक्सिंग करणे किंवा काही क्रिम लावणे असे उपाय करतो. पण यामुळे अडचण कमी न होता ती वाढते. त्यापेक्षा योग्य ती माहिती घेतलेली केव्हाही चांगली

ठळक मुद्देलठ्ठपणा, घट्ट कपडे घालणे ,सतत व्हॅक्सिंग करणे ही महत्त्वाची कारणेशरीरातील काही घटकांची पातळी कमी-जास्त झाल्यासही उद्भवू शकते समस्या

सणावार म्हटले की सजणेधजणे ओघानेच आले. मग नवनवीन कपडे घालताना आपण त्यावर काय हेअरस्टाइल करायची, दागिने कोणते घालायचे, पायात काय घालायचे, कोणती पर्स घ्यायची असे सगळे प्लॅनिंग करतो. दिवाळीच्या काही दिवस आधी आपण पार्लरमध्येही जाऊन येतो. पण दिवाळीत आपण स्लिव्हलेस घालणार असू आणि आपले अंडरआर्मस खूप काळे झाले असतील तर त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नुसते व्हॅक्सिंग करुन ही समस्या सुटणारी नसते. तर यामागची नेमकी कारणे आणि उपाय समजून घेणे गरजेचे आहे. कारण सणसमारंभात किंवा कोणाऱ्या घरी गेल्यावर काही कारणाने आपण हात वर केला आणि आपले अंडरआर्मस काळे पडल्याचे दिसले तर ते वाईट दिसते. काखेतील हा काळेपणा ऐनवेळेला काढणे कठीण असते. त्यामुळे थोडे आधीपासूनच याकडे लक्ष दिल्यास तुम्ही त्यावर योग्य तो उपाय करु शकता. 

काखेत काळे होण्याची कारणे 

१. लठ्ठपणा हे काख काळी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. तुम्ही लठ्ठ असल्यास तुमच्या स्तनांचा आकार मोठा असल्याने तो दंडाकडे सरकलेला असतो. तसेच दंडही जाड असल्याने त्याची त्वचा छातीच्या बाजुने दाबलेली असते. या दोन्ही भागांचे एकमेकांशी घर्षण होत राहते आणि काख काळी पडायला लागते. ही दिर्घकाळ होणारी प्रक्रिया असल्याने हा काळेपणा हळुहळू वाढत जातो. 

२. तुम्ही आता फारसे जाड नसाल आणि तुमची काखेच्या भागातील त्वचा काहीशी लूज पडलेली असेल तरी ही त्वचा घासली गेल्याने हा भाग काळा पडायला सुरुवात होते. 

३. घट्ट कपडे घातल्याने कपडे याठिकाणी घासले जाऊनही तुमची काख काळी पडू शकते. त्यामुळे कपडे घालताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. 

४. पाठ, छाती, हाताचा दंड या भागातील त्वचेला काही रॅश किंवा अॅलर्जी आली तरी त्याचा परिणाम म्हणून काखेत काळे होऊ शकते. 

( Image : Google)

५. शरीराच्या आतमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही काख काळी पडण्यास सुरुवात होऊ शकते. यामध्ये इन्शुलिनचे कमी-जास्त होणारे प्रमाण हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांतील त्वचा काळी तर पडतेच पण ती काहीशी जाडसरही होते. यामध्ये काखेचाही समावेश असू शकतो. त्यामुळे शरीरातील विविध घटकांची पातळी काखेतील त्वचा काळी पडण्यास कारणीभूत असू शकते. 

६. सतत व्हॅक्सिंग करणे तसेच वेगवेगळे हेअर रिमूव्हल क्रिम वापरणे यामुळेही त्वचा काळी पडू शकते. काखेची त्वचा ही अतिशय नाजूक असते, याठिकाणी हॉट व्हॅक्सचा चटका बसून किंवा व्हॅक्सिंग स्ट्रीपने त्वचा जाोरात ओढली गेल्याने त्वचा काळवंडते. हेअर रिमूव्हल क्रिममध्ये असणारे रासायनिक घटक त्वचेसाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे याठिकाणची त्वचा काळी पडते. 

हे काळे डाग घालविण्यासाठी उपाय काय? 

१. शक्यतो सुती किंवा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कापडाचे कपडे वापरावेत. तसेच जास्त घट्ट टॉप, कुर्ते, ब्लाऊज अजिबात घालू नयेत. 

२. काखेत काळं झालंय म्हणून घासू नका. तर एखाद्या सॉफ्ट साबणाने किंवा बॉडीवॉशने काख स्वच्छ धुवा. आंघोळीनंतर याठिकाणी मॉइश्चरायजर लावा. त्यामुळे कोरडी पडलेली त्वचा मऊ व्हायला आणि हा काळेपणा हळूहळू दूर होण्यास मदत होईल. 

३. ग्लायकोलिक अॅसिड हे काखेतील काळेपणा दूर करण्यास उत्तम उपाय ठरु शकते. हे अॅसिड असलेली क्रिम बाजारात उपलब्ध असतात. अॅसिडचे प्रमाण ६ ट्क्के असेल असेच क्रिम वापरावे. रात्री झोपताना हे क्रिम लावून झोपल्यास सकाळी ते धुवून टाकावे आणि त्यानंतर न विसरता मॉइश्चरायजर लावावे. अशाप्रकारचे कोणतेही क्रिम वापरताना शरीरावरील नाजूक त्वचा असणाऱ्या ठिकाणी त्याची टेस्ट करा. 

( Image : Google)

४. दही आणि हळद एकत्र करुन काळ्या पडलेल्या काखेत लावावे. १५ मिनिटे ठेऊन नंतर धुवून टाकल्यास हळूहळू काळेपणा दूर होण्यास मदत होते. 

५. मध, लिंबू आणि गुलाबपाणी एकत्र करुन त्याचा लेप काळ्या झालेल्या भागावर लावावा. १५ ते २० मिनिटांनी हा भाग गार पाण्याने धुवावा आणि त्याठिकाणी मॉइश्चरायजर लावावे. यामुळेही काळेपणा दूर होण्यास मदत होईल. 

६. पपईचा गर आणि दही एकत्र करुन काखेतील काळ्या भागावर लावावे. त्यानंतर १५ मिनिटांनी धुवावे. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. 

७. कोरफडीच्या गरात चिमूटभर हळद घालून हा गर काखेत लावा. साधारणपणे ३० मिनिटे हा लेप तसाच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा धुवून टाका. त्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिला