Join us

पावसाळ्यात बुटांचा खूपच कुबट, घाण वास येतो? ५ उपाय, बुटांची दुर्गंधी होईल गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 18:09 IST

Remedies To Remove Odour From Shoes: पावसाळ्यात हा त्रास अनेकदा जाणवतो. असे घाण वास असणारे बूट असतील तर चौरचौघांतही खूपच लाजिरवाणं होतं.. म्हणूनच बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी उपाय.

ठळक मुद्देबुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी, कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून बघा. कारण अशा अस्वच्छ बुटांमुळे पायांच्या त्वचेलाही इन्फेक्शन हाेऊ शकतं. 

पावसाळ्यात बूट (shoes) वारंवार ओले होतात. हवा दमट असल्याने आणि सारखा पाऊस भुरभुरत असल्याने मग ते अनेकदा चांगले वाळत नाहीत आणि मग त्यांचा खूपच दुर्गंध (odour from shoes) सुटतो. शाळेत जाणाऱ्या मुलांना तर दररोज शाळेचे बूट घालण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत तर ही समस्या जास्त जाणवते. अनेक जणांकडे चपला- बूट घरातच ठेवावे लागतात. बहुतांश फ्लॅट सिस्टिममध्ये तर तिच पद्धत आहे. अशावेळी मग असे घाण बूट घरात असले तर घरातही कुबट घाणेरडा वास येऊ लागतो. त्यामुळेच बुटांची दुर्गंधी घालविण्यासाठी, कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय (Remedies To Remove Odour From Shoes) करून बघा. कारण अशा अस्वच्छ बुटांमुळे पायांच्या त्वचेलाही इन्फेक्शन हाेऊ शकतं. 

 

बुटांमधला दुर्गंध घालविण्यासाठी उपाय१. बूट धुवून घ्याजर शक्य असेल आणि २- ३ दिवस बूट घातला नाही तरी चालणार असेल, तर हा उपाय करता येईल. ओलसर बुटांमधून जास्त दुर्गंध येतो. त्यामुळे ओलसर बूट एकदा साबण किंवा वॉशिंग पावडर लावून चांगले धुवून घ्या. आणि उन्हामध्ये २ ते ३ दिवस ते चांगले वाळू द्या. यामुळे बुटांमधली दुर्गंधी चटकन कमी होते.

 

२. मोकळी हवाबाहेरून आल्या आल्या बुट कपाटात किंवा शू रॅकमध्ये बंद करून ठेवण्याची सवय अनेक जणांना असते. असे बंद कपाटात ठेवलेले बूट मग थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे कमीतकमी १० तासांनंतर बाहेर निघतात. त्यामुळे त्यांचा दुर्गंध आणखी वाढतो. कारण आपण बूट घालून बाहेरून जेव्हा येतो तेव्हा पायांना घाम आलेला असतो. घामामुळे बुटही ओलसर झालेले असतात. म्हणून बुटांचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत किमान २ तास तरी ते मोकळ्या हवेत ठेवा.

 

३. पावडरचा उपयोगबुटांमध्ये तुम्ही तुमचं नेहमीचं टाल्कम पावडर थोडं टाकून ठेवा. यामुळे बुटांमधला ओलसरपणा आणि दुर्गंध दोन्हीही शोषून घेतल्या जाईल तसेच पावडरचा सुवास बुटांना लागेल. आजकाल मेडिकेटेड फूट पावडर देखील मिळतात. या पावडर बुटांमध्ये टाकून ठेवल्याने त्यांच्यात फंगसची होणारी वाढ रोखली जाते आणि त्यामुळे आपोआपच घाण वास येणं कमी होतं.

 

४. बेकींग सोडाबुटांमधला दुर्गंध कमी करण्यासाठी बेकींग सोड्याचाही चांगला वापर करता येतो. यासाठी बेकींग सोडा बुटांमध्ये टाकून ठेवा. एखादा तास तसाच राहू द्या. त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने बुटांमधला बेकींग सोडा चांगला पुसून घ्या. यानंतर साधारण अर्ध्या- एक तासाने बूट घाला.

 

५. सॉक्सची निवडतुम्ही कोणते सॉक्स घालता यावरही तुमच्या बुटांची दुर्गंधी अवलंबून असते. जाडसर सॉक्स घालत असाल तर तळपायांना जास्त घाम येतो आणि दुर्गंधी वाढते. त्यामुळे sweat-wicking सॉक्स घालण्यास प्राधान्य द्या. यामुळे घाम कमी येतो. तसेच कॉपरचा बेस किंवा रबराचा बेस असणारे सॉक्सही बाजारात मिळतात. हे सॉक्स घातल्यानेही घाम कमी येतो. कॉटन किंवा होजियरीचे सॉक्स घालत असाल तर ते दर २ दिवसांनंतर धुतलेच पाहिजेत याची काळजी घ्या.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी