लांब, घनदाट आणि चमकदार, काळेभोर केस असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. पण अनेकदा, जेव्हा आपले केस लांब वाढू लागतात, तेव्हा एक समस्या वारंवार डोक वर काढते, ती म्हणजे केसांना फाटे फुटणे... केसांच्या टोकांना फाटे फुटणे ही आजकालची अत्यंत कॉमन पण त्रासदायक समस्या आहे. केसांच्या टोकांना फाटे फुटल्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि विस्कटलेले दिसू लागतात, ज्यामुळे केसांची संपूर्ण रचना आणि सौंदर्य बिघडते. केस कितीही चांगले असले तरी, फाटलेल्या टोकांमुळे त्यांना चांगली 'फिनिशिंग' मिळत नाही आणि अनेकदा आपल्याला इच्छा नसतानाही केस कापावे लागतात(repair split ends at home).
एकदा का केसांच्या टोकांना फाटे फुटू लागले की, केसांची लांबी वाढत नाही, केस कोरडे, निस्तेज आणि जाडसर दिसतात, तसेच हेअरस्टाईलही व्यवस्थित करता येत नाही. ही समस्या छोटी वाटली तरी त्यावर वेळेत उपाय न केल्यास संपूर्ण केसांचे सौंदर्य आणि आरोग्य बिघडते. खरंतरं, केसांना फाटे फुटण्यामागे आपल्याच काही रोजच्या बारीक - सारीक सवयी कारणीभूत ठरतात. केसांना फाटे फुटण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि ही समस्या कायमची दूर करण्यासाठी नेमके (how to get rid of split ends naturally) कोणते घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात.
केसांना फाटे फुटतात कारण...
१. जास्त हेअर स्ट्रेटनिंग किंवा केसांवर वारंवार हिटिंग टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे.
२. केसांना तेल कमी लावणे किंवा अजिबात न लावणे.
३. उन्हामुळे होणारे केसांचे नुकसान.
४. केस सतत प्रदूषण आणि धूळ - माती यांच्या संपर्कात असणे.
५. खराब किंवा निकृष्ट दर्जाचे हेअर प्रॉडक्ट्स वापरणे.
६. वर्षानुवर्षे केस न कापणे किंवा ट्रिमिंग न करणे.
७. ओल्या केसांना घासून - पुसून कोरडे करणे किंवा विंचरणे.
या सर्व कारणांमुळे केसांना फाटे फुटू लागतात. त्याचबरोबर, या कारणांमुळे केस निर्जीव, रुक्ष, निस्तेज, कमजोर आणि केसांचे नैर्सगिक सौंदर्य व आरोग्य बिघडवतात.
कांद्याची सालं फेकू नका, आहेत फायदेशीर! करा नॅचरल हेअर कलर - पांढरे केसही होतील काळेभोर...
केसांच्या टोकांना फाटे फुटू नये म्हणून वेळीच टाळा या चुका...
१. केस दररोज धुवू नका :- केस दररोज धुण्याची चूक करु नका. जर तुम्ही दररोज केस धूत असाल तर नकळतपणे तुम्ही केसांना नुकसान पोहोचवत आहात. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. अशावेळी दोन ते तीन दिवसांतून एकदा केस स्वच्छ धुवा.
२. हेअरब्रश किंवा कंगव्याची योग्य निवड :- केस विंचरण्यासाठी कायम योग्य हेअरब्रश किंवा कंगव्याची निवड करावी. नेहमी मोठ्या दातांचा कंगवा किंवा फणीचा वापर करावा. केसांचा गुंता सोडवून मग कंगव्याचा वापर करावा. केसांवर कंगवा खसाखसा घासू नका.
३. शाम्पू केसांवर रगडून लावू नका :- डोक्याच्या त्वचेवर शाम्पू लावून घासल्यानंतर, तसेच तुम्ही केस धुतल्यास, तो शाम्पू केसांवर देखील लागेल त्यामुळे, तुम्हाला केसांना वेगळा आणि जास्त शाम्पू लावण्याची गरज नाही.
४. फक्त केसांच्या टोकांनाच कंडीशनर लावावे :- कंडीशनर हे फक्त केसांच्या खालच्या टोकांनाच लावावे. कंडीशनर स्काल्पवर चुकूनही लावू नये यामुळे प्रचंड प्रमाणात केसगळती होऊ शकते.
५. हीट ड्रायरने केस वाळवणे टाळा :- विशेषतः केसांच्या शेवटच्या टोकांना हीट ड्रायरने चुकूनही वाळवू नका. ब्लो ड्रायर सारख्या मशीनचा वापर करून केसांना उष्णता देऊन कोरडे करणे टाळा.
६. स्ट्रेटनिंग करण्याची पद्धत बदला :- जर तुम्ही स्ट्रेटनिंग आयर्नचा वापर करत असाल, तर केसांच्या टोकांना जास्त उष्णता देऊ नका.
७. केसांना ट्रीम करत राहा :- केसांना मजबूत ठेवण्यासाठी आणि केसांना फाटे फुटण्यापासून वाचवण्यासाठी, त्यांना नियमितपणे ट्रीम करणे आवश्यक आहे. तुम्ही दर दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने केस ट्रिम करू शकता.
