लग्नाचा सिझन असो किंवा उन्हाळा किंवा विशेष सण समारंभ, केसांना नैसर्गिक चमक आणि रंग देण्यासाठी आपल्यापैकी बहुतेकजणी मेहेंदीलाच पसंती देतो. केसांना नैसर्गिकरित्या सुंदर रंग देण्यासाठी मेहेंदी हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. रासायनिक डायमुळे केसांचे नुकसान होण्याची भीती असते यासाठी केसांना मेहेंदीच लावणं उत्तम... परंतु अनेकदा केसांना मेहेंदी लावूनही किंवा तासंतास केसांवर मेहेंदी ठेवून देखील केसांना हवा तसा गडद रंगच येत नाही किंवा केस कोरडे पडतात....याचे मुख्य कारण म्हणजे मेहेंदी भिजवण्याची चुकीची पद्धत...(correct way to apply henna on hair).
खरं तर, मेहेंदी योग्य प्रकारे तयार करून लावली आणि त्यात काही नैसर्गिक पदार्थ मिसळून त्यांचा योग्य प्रमाणात वापर केला, तर केसांना सुंदर, नैसर्गिक आणि टिकाऊ लालसर रंग अगदी (how to get dark color with henna) सहज देणं शक्य होत. केसांना केवळ वरवरचा रंग न देता तो दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि केसांना मुळापासून मजबूत करण्यासाठी मेहेंदीमध्ये नेमके काय मिसळावे, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नक्की कोणत्या ट्रिकमुळे (how to apply henna on hair) केसांना तो मेहेंदीचा 'परफेक्ट' गडद लाल - तपकिरी रंग मिळतो आणि मेहेंदी लावण्याची योग्य पद्धत पाहूयात...
केसांवर मेहेंदीचा परफेक्ट गडद लाल - तपकिरी रंग येण्यासाठी...
केसांवर मेहेंदीचा परफेक्ट गडद लाल - तपकिरी रंग येण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ३ ते ४ जास्वंदीची फुलं, १ ते २ कप मेहेंदी, बीटाचा रस १ कप, चहा पावडरचे पाणी इतके साहित्य लागेल.
नेमकी मेहेंदी कशी भिजवायची ?
सगळ्यातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये ३ ते ४ जास्वंदीची फुलं घेऊन त्यात गरम पाणी घालून ती फुलं १० ते १५ मिनिटं भिजत ठेवावीत. फुलं पाण्यात व्यवस्थित भिजवल्यावर त्याचे थोडे घट्टसर अशा जेलमध्ये रूपांतर होते. मग दुसऱ्या एका बाऊलमध्ये मेहेंदी पावडर घेऊन त्यात हे जास्वंदीच्या फुलांचे भिजवलेले पाणी घालावं. त्यानंतर चहा पावडर पाण्यांत उकळवून थंड केलेलं पाणी त्यात घालावं. सगळ्यात शेवटी बीटाचा रस देखील घालावा. मग हे सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून भांड्यावर झाकण ठेवून ६ ते ७ तास भिजण्यासाठी तसेच ठेवून द्यावं.
केसांवर ही मेहेंदी कशी लावावी ?
६ ते ७ तास मेहेंदी व्यवस्थित भिजल्यावर ब्रशच्या मदतीने ही मेहेंदीची तयार पेस्ट केसांच्या छोट्या - छोट्या बटा घेऊन त्यावर लावावी. केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत मेहेंदी व्यवस्थित केसांवर लावून घ्यावी. ४ ते ५ तास किंवा पूर्णपणे सुकेपर्यंत ही मेहेंदी केसांवर तशीच लावून ठेवावी. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. शाम्पूचा वापर करु नये. केस धुतल्यानंतर केसांवर थोडं खोबरेल तेल लावून मसाज करावा आणि दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने स्वच्छ धुवावेत.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
अशी मेहेंदी केसांवर लावण्याचे फायदे...
१. जास्वंदीची फुलं :- जास्वंदीची फुलं केसांसाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते आणि केस अधिक मऊ व सिल्की होतात. जास्वंदीमध्ये असलेले पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करतात, केस गळणं कमी करतात आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात. तसेच मेहेंदीचा रंग अधिक गडद आणि आकर्षक दिसण्यासही मदत होते.
२. चहा पावडरचे पाणी :- चहा पावडरमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य (टॅनिन) असतात, जे केसांना गडद तपकिरी छटा देण्यास मदत करतात. यामुळे मेहेंदीचा रंग अधिक खोल आणि टिकाऊ दिसतो. तसेच केसांना नैसर्गिक शाइन मिळते आणि केस फ्रिझी होण्याचं प्रमाण कमी होतं.
३. बीटाचा रस :- बीटाचा रस केसांना सुंदर लालसर टोन देण्यासाठी खूप उपयोगी ठरतो. यामुळे मेहेंदीचा रंग अधिक उठून दिसतो. बीटामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांना पोषण देतात, केस मऊ ठेवतात आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात.
