आजकाल केसांची वाढ खुंटली, केस वाढतच नाहीत अशा काही कॉमन समस्या अनेकींच्या असतात. वर्षानुवर्षे केसांची लांबी आहे तितकीच...त्यात वाढ काहीच नाही, सोबतच केसांच्या अनेक समस्या यामुळे केसांचे आरोग्य व सौंदर्य बिघडते. केस भराभर वाढावेत म्हणून आपण अनेक उपायही करुन पाहतो.. महागडे तेल, सीरम, शाम्पू असं सगळंच करुन पाहिल्यावरही हवा तसा परिणाम केसांवर दिसत नाही. केस वाढीसाठी अनेक उपाय करूनही केसांची लांबी वाढत नाही किंवा केस निर्जीव आणि कोरडे दिसू लागतात, तेव्हा आपण निराश होतो. अशावेळी घरगुती, पारंपरिक उपाय कारणं हाच एकमेव सोपा पर्याय असतो( hair growth oil with potli massage).
आपल्या आयुर्वेदात केसांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत असरदार आणि पारंपरिक पद्धत सांगितली आहे, ती म्हणजे 'औषधी पोटली मसाज'. केसांच्या मुळांना पोषण देऊन रक्ताभिसरण वाढवण्यासाठी घरगुती औषधांनी तयार केलेली पोटली केसांवर एखाद्या जादूच्या काठीप्रमाणे काम करते. या विशेष तेलात बुडवलेल्या पोटलीने मसाज केल्यामुळे केसांची वाढ होण्यासोबतच, केसगळती, कोंडा आणि अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. औषधी घटकांची पोटली करून ती तेलात बुडवून डोक्याला मसाज करणे हा उपाय केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि केसांची नैसर्गिक वाढ करण्यास मदत करतो. हा जुना पण परिणामकारक उपाय आजही केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण ठरतो. घरच्याघरीच ही औषधी पोटली कशी (potli massage for hair growth) तयार करायची आणि तिचा वापर करून (homemade hair growth oil) केसांची काळजी कशी घ्यावी पाहूयात...
केसांसाठी औषधी पोटली आहे फायदेशीर...
केसांची वाढ खुंटली असेल तर घरगुती उपाय म्हणून औषधी पोटली कशी तयार करायची हा उपाय इंस्टाग्रामवरील beautifulyoutips या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला १ छोटे मलमलचे किंवा सुती कापड, १ टेबलस्पून किसलेलं आलं, १ टेबलस्पून किसलेला कांदा, ४ ते ५ लवंग काड्या आणि वाटीभर तिळाचे तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांसाठी पोटली मसाज म्हणजे नेमकं काय ?
सगळ्यात आधी एक स्वच्छ सुती किंवा मलमलचे कापड घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून किसलेलं आलं, किसलेला कांदा आणि ४ ते ५ लवंग काड्या घालाव्यात. हे सगळे घटक पदार्थ त्या कापडात गुंडाळून त्याची छोटीशी गोलाकार अशी पोटली तयार करून घ्यावी. ही तयार पोटली वाटीभर तिळाच्या तेलात रात्रभर किंवा किमान १२ तासांसाठी भिजत ठेवावी.
या पोटलीने केसांवर मसाज कसा करायचा ?
ही तेलात भिजवून घेतलेली पोटली तशीच थेट केसांवर किंवा स्कॅल्पवर हलकेच हाताने दाब देत, तेल लावून घ्यावे. त्यानंतर बोटांनी व्यवस्थित तेल पसरवून घ्यावे. ५ ते १० मिनिटे स्काल्पचा व केसांचा चांगला मसाज करावा. आपण हे तेल केसांवर रात्रभर लावून ठेवू शकता किंवा केस धुण्याच्या २ तास आधी लावून मसाज करून सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवू शकता.
पोटली मसाज केसांसाठी कसा फायदेशीर...
१. आलं :- आलं हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म स्काल्पवरील सूज आणि खाज कमी करतात. आलं रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.
२. कांदा :- कांद्यामध्ये असलेल्या मुबलक सल्फरमुळे केसांचे तुटणे कमी होते आणि पातळ झालेले केस पुन्हा दाट व मजबूत होतात.
३. लवंग काड्या :- लवंग काड्या स्काल्पवरील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन दूर ठेवण्यास मदत करतात. यामुळे कोंडा कमी होतो आणि स्काल्प स्वच्छ राहतो. लवंग केसांच्या मुळांना बळकटी देऊन केसांची वाढ सुधारते.
४. तिळाचे तेल :- तिळाचे तेल स्काल्पला खोलवर पोषण देते, केसांच्या मुळांना बळकट करते आणि केसगळती कमी करते.
