Join us
Daily Top 2Weekly Top 5

केसांनाही आवडतो Detox: घरच्याघरी केसांचे करा लाड, Hair Detoxचे 5 प्रकार, सोपे आणि स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:50 IST

हेअर डिटॉक्समुळे केस आणि केसांच्या मुळाशी अर्थात टाळूशी असलेले विषारी घटक आणि इतर अपायकारक घटक निघून जातात. त्यामुळे केसांची मुळं निरोगी होतात. तसेच केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासही हेअर डिटॉक्स ही प्रक्रिया मदत करते.

ठळक मुद्दे बेकिंग सोडा डिटॉक्समुळे केस मुळांपासून स्वच्छ होतात.मध हेअर डिटॉक्समुळे केस कोरडे न राहाता छान मुलायम राहातात.काकडी लिंबू हेअर डिटॉक्समुळे डोक्याची त्वचा स्वच्छ होते आणि केसांना पोषणही मिळतं.

सध्या डिटॉक्स हा शब्द खूप प्रचलित आहे. शरीर, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी डिटॉक्स प्रक्रियेला खूप महत्त्व आलं आहे. शरीर आणि त्वचेसोबतच आपल्या केसांनाही डिटॉक्सची गरज असते. हेअर डिटॉक्समुळे केस आणि केसांच्या मुळाशी अर्थात टाळूशी असलेले विषारी घटक आणि इतर अपायकारक घटक निघून जातात. त्यामुळे केसांची मुळं निरोगी होतात. तसेच केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासही हेअर डिटॉक्स ही प्रक्रिया मदत करते. घरच्या घरी नैसर्गिक घटकांचा वापर करुन हेअर डिटॉक्स करण्याच्या विविध पध्दती आहेत.

छायाचित्र:- गुगल

बेकिंग सोडा डिटॉक्स

बेकिंग सोडा डिटॉक्समुळे केस मुळांपासून स्वच्छ होतात. केसाच्या मुळाशी असलेलं अतिरिक्त तेल नियंत्रित करण्याचं काम बेकिंग सोडा करतो तसेच केसातील कोंड्याची समस्याही बेकिंग सोडा डिटॉक्समुळे जाते.यासाठी अर्धा कप बेकिंग सोडा आणि 3 कप गरम पाणी घ्यावं.बेकिंग सोडा डिटॉक्स करताना एका भांड्यात बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून मिश्रण तयार करुन घ्यावं. सर्वात आधी केस व्यवस्थित ओले करुन घ्यावेत. आता ओल्या केसांवर बेकिंग सोड्याचं मिश्रण लावावं आणि दहा मिनिटं केसांच्या मुळांशी मसाज करावा. त्यानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनरही लावावं.

मध हेअर डिटॉक्स

 मधात ओलसरपणा असतो. मधामुळे केस कोरडे न राहाता छान मुलायम राहातात. मध केसांना मुळापासून स्वच्छ करतं शिवाय केसातील विषारी घटकही काढून टाकतं.मध हेअर डिटॉक्स करण्यासाठी मध आणि तीन चमचे फिल्टर पाणी घ्यावं. एका वाटीत मध आणि पाणी एकत्र करावं. केस आधी ओले करुन घ्यावेत आणि मग हे मध पाणी केसांना लावावं. केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत हे मिश्रण नीट लावावं. केस धुताना कोमट पाणी घ्यावं.

काकडी लिंबू हेअर डिटॉक्स

लिंबात सायट्रिक अँसिड असतं. हे अँसिड डोक्याची त्वचा स्वच्छ करतं . काकडीमधील पोषक गुणधर्म केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.काकडी लिंबू हेअर डिटॉक्स करण्यासाठी एका लिंबाचा रस आणि एक काकडी घ्यावी. सर्वात आधी काकडी आणि लिंबू कापून घ्यावं. आता मिक्सरमधून ते बारीक करुन घ्यावं. आता हे मिश्रण शाम्पू सारखं केसांना लावावं. नंतर केस पाण्यानं धुवावेत.

छायाचित्र:- गुगल

शिकेकाई हेअर डिटॉक्स

शिकेकाईमुळे टाळुला खाज, कोरडेपणा आणि तेलकटपणा या समस्या बर्‍या होतात. हे हेअर डिटॉक्स नियमित स्वरुपात केल्यास टाळू स्वच्छ आणि निरोगी राहातो.शिकेकाई हेअर डिटॉक्स तयार करण्यासाठी दोन तीन चमचे शिकेकाई पावडर आणि पाणी घ्यावं. एका भांड्यात शिकेकाई पावडर आणि पाणी एकत्र करुन त्याचं दाट मिश्रण तयार करावं. जर केस लांब असतील तर शिकेकाई जास्त घ्यावी. केसांना शिकेकाईचं मिश्रण लावून ते अर्धा तास तसंच ठेवावं. अर्ध्या तासांनी केसांच्या मुळाशी मसाज करावा आणि केस स्वच्छ धुवावेत.

नारळाचं दूध आणि कोरफड जेल हेअर डिटॉक्स

हे हेअर डिटॉक्स तयार करताना नारळाचं दूध आणि कोरफड जेल घ्यावं. एका वाटीत दोन्ही गोष्टी एकत्र करुन चांगल्या मिसळून घ्याव्यात. हे मिश्रण आइस ट्रे मध्ये टाकून ते फ्रिजरमधे ठेवावं. जेव्हा आपल्याला केस धुवायचे असतील त्याच्या एक दिवस आधी हा आइस ट्रे बाहेर काढून ठेवावा. मग हे मिश्रण केसांना लावून दहा मिनिट केसांना मसाज करावा आणि केस शाम्पूनं धुवावेत.