Join us

10 मिनिटात केस होतात स्वच्छ - सुंदर, वापरा ड्राय शाम्पूचा क्विक फॉर्म्युला! बघा ड्राय शाम्पू असतो काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 16:48 IST

अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं, महत्वाची मीटिंग असते आणि तेव्हाच नेमके केस खराब झालेले असतात.. अशा तातडीच्या प्रसंगी कामास येतो ड्राय शाम्पूचा क्विक उपाय. अवघ्या 10 मिनिटात केस स्वच्छ आणि सुंदर करण्याचा पर्याय.

ठळक मुद्देप्रवासानं किंवा इतर कारणानं केस अस्वच्छ झालेले असल्यास, केस स्वच्छ होवून सेट होणं ही तातडीची गरज असल्यास ड्राय शाम्पू वापरावा असं तज्ज्ञ सांगतात. ड्राय शाम्पू पंप डिस्पेंसर, एयरसोल स्प्रे आणि पावडर या तीन स्वरुपात उपलब्ध असतो.ड्राय शाम्पू वापरताना ना केस आधी ओले करावे लागतात ना नंतर पाण्यानं धुवावे लागतात.

केसांची उत्तम निगा राखण्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणं योग्य मानलं जातं. शाम्पू करण्याआधी तेल लावणं, मग शाम्पू लावून केस स्वच्छ करणं आणि शेवटी कंडीशनर लावणं असा हा क्रम असतो. म्हणूनच बहुतेकांचं केस धुण्याचं वेळापत्रक सेट झालेलं असतं. पण कधी अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचं असतं, महत्वाची मीटिंग असते आणि तेव्हाच नेमके केस खराब झालेले असतात. काही मिनिटात तेल, शाम्पू, कडिंशनिंग करुन केस सेट करणं केवळ अशक्य होतं.  अशा घाईच्या आणि आणीबाणीच्या वेळेस ड्राय शाम्पू उपयोगात पडतो. केस स्वच्छ ठेवण्यासाठी, केसांचं आरोग्य जपण्यासाठी केसांना आठवड्यातून दोन वेळा शाम्पू कंडिशनिंग करणं योग्य मानलं जातं. पण त्यापेक्षा अधिक वेळा केस धुतल्यास केस खराब होतात असं हेअर एक्सपर्ट म्हणतात. तज्ज्ञांनी सांगितलेला हा नियम पाळून आठवड्यातून जास्त  वेळा केस धुवायचे असतील तर ड्राय शाम्पू योग्य ठरतो.

Image: Google

केस स्वच्छ आणि सुंदर करण्याचा शाॅर्टकट म्हणजे ड्राय शाम्पू.  प्रवासात, ऑफिसात कुठेही ड्राय शाम्पूचं किट बाळगता येतं.  ड्राय शाम्पू हा केस धुण्याचा नवीन पर्याय वाटत असला तरी  त्याची उपयुक्तता पाहाता त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळेच हा ड्राय शाम्पू काय आहे, तो कसा वापरावा याची माहिती असणं आवश्यक आहे. 

Image: Google

काय आहे ड्राय शाम्पू?

ड्राय शाम्पू हा केस स्वच्छ आणि सुंदर करण्याचा क्विक सोल्यूशन आहे. पण केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी पाण्यानं केस धुण्याला ड्राय शाम्पू हा पर्याय नाही हे हेअर एक्सपर्ट अधोरेखित करुन सांगतात.  प्रवासानं किंवा इतर कारणानं केस अस्वच्छ झालेले असल्यास, केस स्वच्छ होवून सेट होणं ही तातडीची गरज असल्यास ड्राय शाम्पू वापरावा असं तज्ज्ञ सांगतात. ड्राय शाम्पूनं नेहमीच्या पध्दतीनं केस स्वच्छ होण्यापेक्षा कमी वेळ लागतो. ड्राय शाम्पूमुळे केसांचा व्हाॅल्युम वाढतो. केसातील घाण, अतिरिक्त तेल निघून जातं. केस पटकन सुंदर करण्याचा पर्याय म्हणजे ड्राय शाम्पू वापरणं. पाण्यानं केस धुणं अशक्य होतं/ असतं तेव्हाच ड्राय शाम्पू वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

Image: Google

ड्राय शाम्पू पंप डिस्पेंसर, एयरसोल स्प्रे आणि पावडर या तीन स्वरुपात उपलब्ध असतो. आपल्या केसांच्या रंगाशी मिळता जुळता ड्राय शाम्पू वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अनेकदा ड्राय शाम्पूमुळे केसात पांढरे घटक तसेच राहातात. ते कोंड्यासारखे दिसतात. हे टाळण्यासाठी आपल्या केसांच्या रंगानुसार ड्राय शाम्पू निवडावा असं सांगितलं जातं. तज्ज्ञ म्हणतात केस सोनेरी रंगाचे असतील तर टिंटेड ड्राय शाम्पू वापरावा. शाम्पूचा एक शेड डार्क घ्यावा. केस ब्राऊन रंगाचे असतील तर लाइट टिंटेड ड्राय शाम्पू वापरावा. ड्राय शाम्पू नॅचरल, केमिकल फ्री आणि ऑरगॅनिक स्वरुपातही मिळतो. ड्राय शाम्पूचे विविध ब्रॅण्ड असून विविध फ्लेवर्समध्येही ड्राय शाम्पू उपलब्ध आहेत. फ्रूटी, एम्पोवेरिंग, ऑरेंज सिट्रस, क्ले बेस, अरेबिका काॅफी, कुकुम्बर ग्रीन टी, स्ट्राॅबेरी अशा विविध फ्लेवर्समध्ये ड्राय शाम्पू उपलब्ध आहेत.

 

Inage: Google

ड्राय शाम्पूचे फायदे

ड्राय शाम्पूमुळे केस कमी वेळात स्वच्छ होतात. केसांचा पोत सुधारतो आणि व्हाॅल्युमही वाढतो. ड्राय शाम्पूमुळे केस सुंगधितही होतात.  ड्राय शाम्पू वापरताना ना केस आधी ओले करावे लागतात ना नंतर पाण्यानं धुवावे लागतात.  ड्राय शाम्पूमध्ये केमिकल्स कमी असतात. ड्राय शाम्पूतील शोषक घटकांमुळे केसातील घाण, चिकटपणा केसांच्या बाहेर टकला जाऊन केस स्वच्छ आणि सुंदर होतात. 

Image: Google

ड्राय शाम्पू वापरताना..

1. पावडर स्वरुपातला ड्राय शाम्पू वापरताना ब्रशनं केसांच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सर्व केसांना ड्राय शाम्पू व्यवस्थित लावावा.

2. ड्राय शाम्पू स्प्रे स्वरुपात वापरत अस्ल्यास केसांवर 7 इंच अंतरावरुन तो स्प्रे करावा. शाम्पू स्प्रे करताना तो एकाच ठिकाणी जास्त स्प्रे करु नये. यामुळे केसांच्या मुळांशी जळजळ, खाज , कोंडा या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. 

3.  मऊ दातांच्या ब्रशचा वापर केल्यास केस नीट स्वच्छ होतात. 

4. ड्राय शाम्पू वापरताना केस अजिबात ओले नको. केस ओले असल्यास ड्राय शाम्पू वापरल्यास त्याच्या केसात गुठळ्या होतात. त्या केसातून काढणं अवघड होतं आणि या प्रयत्नात केस तुटतात. 

5. झोपण्याआधी केसांना ड्राय शाम्पू वापरल्यास केसात ड्राय शाम्पूचे अवशेष राहिल्यास सकाळी केस विंचरल्यास निघून जायला मदत होते. 

6. ड्राय शाम्पू लावल्यानंतर पुढच्या 5 मिनिटांनी केसात ब्रश फिरवून केस स्वच्च करावेत. केस लांब आणि दाट असल्यास ड्राय शाम्पू  7 ते 10 मिनिटं ठेवावा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स