Join us

चेहरा धुतला तरी दिसतो खराब, खरखरीत? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात चेहरा धुताना होणाऱ्या 5चुका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 19:46 IST

चेहरा नियमित स्वच्छ धुवूनही त्वचा खराब का पडते? असा अनेकींचा प्रश्न असतो त्याला उत्तर म्हणून त्वचारोगतज्ज्ञ चेहरा धुण्याच्या पाच चुकांबद्दल बोलतात.

ठळक मुद्देअर्ध्या मिनिटांपेक्षाही कमी वेळात कसातरी चेहरा धुतल्यानं त्वचा हवी तशी स्वच्छ होत नाही.चेहरा धुताना अति गरम पाणी वापरणं घातकच.चुकीचा फेसवॉश वापरणं ही चेहरा धुताना होणारी सर्वात मोठी चूक.

चेहर्‍याचं सौंदर्य जपण्याची पहिली पायरी म्हणजे चेहरा धुणं. चेहरा धुतल्यानं चेहर्‍याच्या त्वचेवरची घाण, प्रदूषण, धुळीचे कण, अतिरिक्त तेल हे निघून जाऊन चेहरा स्वच्छ होतो. चेहरा धुतल्यानं चेहरा सुंदर होतो हे आजपर्यंत माहिती होतं. पण चेहरा धुतल्यानं चेहरा खराब होतो हे कधी ऐकलंय का?

पण जेव्हा त्वचारोगतज्ज्ञच चेहरा धुण्याचे दुष्परिणाम सांगतात तेव्हा ते पटतं.त्वचारोगतज्ज्ञ गीतिका मित्तल सांगतात की, चेहरा धुतल्यानं चेहरा खराब होत नाही तर चेहरा धुतांना होणार्‍या चुकांमुळे चेहरा खराब होतो.चुकीच्या पध्दतीनं चेहरा धुतला तर त्वचा कोरडी होणं, चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येणं, पुरळ उठणं यासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात. गीतिका मित्तल म्हणतात या चुका आपण मुद्दाम करतो असं नाही तर या चुका अशा आहेत ज्या करताना आपल्या लक्षातही येत नाही. चेहरा नियमित स्वच्छ धुवूनही त्वचा खराब का पडते? असा अनेकींचा प्रश्न असतो त्याला उत्तर म्हणून त्वचारोगतज्ज्ञ चेहरा धुण्याच्या पाच चुकांबद्दल बोलतात.

Image: Google

फेसवॉश आणि चुका

1. चेहरा जर नीट स्वच्छ करायचा असेल तर कमीतकमी अर्धा मिनिटं आणि जास्तीत जास्त एक मिनिट तरी स्वच्छ पाण्यानं धुवायला हवा. पण अर्ध्या मिनिटांपेक्षाही कमी वेळात कसातरी चेहरा धुतल्यानं त्वचा हवी तशी स्वच्छ होत नाही. अशा पध्दतीने कितीही वेळा चेहरा धुतला तरी काहीच उपयोग होत नाही.

2. आता चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबणाऐवजी फेसवॉश वापरला जातो. टीव्हीवरल्या जाहिराती पाहून फेसवॉश विकत घेऊन वापरले जातात. पण आपली त्वचा कोणत्या प्रकारचे आहे त्या अनुरुप फेसवॉश निवडणं आवश्यक असतं. आपल्या त्वचेला सूट न होणारं फेसवॉश वापरल्यानं त्वचेचं नुकसान होतं. खूप प्रमाणात फेसवॉश घेऊन त्यानं चेहरा घासल्यानंही चेहर्‍याची त्वचा खराब होते. त्यामुळे आपली त्वचा कोणती आहे ते ओळखून त्याला सूट होणारं फेसवॉश वापरावं आणि ते वापरताना कमी प्रमाणात घेऊन त्यात थोडं पाणी मिसळून घ्यावं. चेहेरा कोरडा असताना थेट फेसवॉश चेहर्‍याला लावल्यानेही त्वचा खराब होते. त्यामुळे आधी चेहरा पाण्यानं ओला करुन मगच फेसवॉश चेहेर्‍यावर वापरावा असं त्वचा तज्ज्ञ म्हणतात.

3. चेहरा धुताना गरम पाणी वापरल्यानं त्वचा कोरडी पडते. त्वचेवरचं नैसर्गिक तेल अति गरम पाणी वापरल्यास निघून जातं. चेहर्‍याची त्वचा शुष्क होते.

4. सौंदर्यतज्ज़ सांगतात त्वचा खोलवर स्वच्छ होण्यासाठी डबल क्लीन्जिंग करणं आवश्यक असतं. त्यासाठी पहिल्यांदा ऑइल बेस्ड क्लीन्जर आणि दुसर्‍यांदा वॉटर बेस्ड क्लीन्जर वापरण अपेक्षित असतं. तशा पध्दतीने चेहरा न धुतल्यास त्वचा खराब होते.

5. चेहरा धुताना कान, मान, हेअर लाइन हे ही नीट धुवून स्वच्छ करणं अपेक्षित असतं. पण तसं न झाल्यास तिथली त्वचा खराब होते आणि चेहरा खराब दिसतो.

Image: Google

चेहरा धुताना..

गीतिका मित्तल सांगतात, चेहरा धुताना जास्त गरम आणि जास्त गार पाणी वापरणं धोक्याचं असतं. चेहरा धुताना कोमट पाणी वापरावं. यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते, त्वचेखालची रंध्र स्वच्छ होतात. मोकळी होतात. श्वास घेऊ लागतात. अशा पाण्यानं योग्य फेसवॉशचा उपयोग करत चेहरा धुतला तरच चेहरा धुण्याचा उद्देश सफल होईल.