अक्रोड हा सुक्यामेव्यातला असा घटक जो आपल्या आरोग्यसाठी, मेंदुच्या आरोग्यासाठी, विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. पण अक्रोडाचा उपयोग त्वचेच्या आरोग्यासाठीही आवर्जून करावा असा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात.
अक्रोडात प्रथिनं, ओमेगा 3 हे फॅटी अँसिड, ई आणि ब जीवनसत्त्व हे महत्त्वाचे गुणधर्म असतात यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यासोबतच अक्रोडमुळे त्वचा उत्तम राहते तसेच त्वचेशी निगडित महत्त्वाच्या समस्या सुटण्यासही मदत मिळते. पण त्यासाठी तसा अक्रोडचा उपयोग करावा लागतो. अक्रोडचा फायदा त्वचेला होण्यासाठी अक्रोड हे केवळ खाऊन चालत नाही तर त्याचा चेहेर्यावर उपयोग करावा लागतो.
छायाचित्र:- गुगल
त्वचेला फायदा कसा होतो?
* अक्रोडचा उपयोग चेहेर्यासाठी केल्यास चेहेर्याच्या त्वचेचा संसर्गापासून बचाव होतो. याचं कारण अक्रोडमधील गुणधर्म त्वचेचां बुरशीजन्य आजारांच्या संसर्गापासून संरक्षण करतात. तसेच अक्रोडमुळे चेहेर्यावरील सुरकुत्याही कमी होतात. यासाठी अक्रोडच्या तेलाचा उपयोग होतो.
* अक्रोडमधे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे अँण्टिऑक्सिडण्टस चेहेर्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू देत नाही आणि तसे परिणामही होवू देत नाही. अक्रोडमधल्या या गुणधर्मामुळे अक्रोडचा उपयोग सोयरासिससारख्या गंभीर त्वचा विकारावरही होतो.
छायाचित्र:- गुगल
अक्रोडाचा स्क्रब
चेहेर्यावरील सुरकुत्या, रॅश यावर अक्रोडाचा उपाय करायचा असेल तर अक्रोडाचं स्क्रब उपयुक्त ठरतं. हे घरच्याघरी सहज तयार करता येतं. अक्रोडचं स्क्रब तयार करण्यासाठी दोन ते तीन चांगल्या प्रतीचे अक्रोड घ्यावेत. हे अक्रोड ओबडधोबड (फारच नाही) अर्थात स्क्रबच्य पोताचे वाटून घ्यावेत. अक्रोडाच्या चुर्यात ऑलिव तेल घालावं. ते अक्रोडाच्या चुर्यात चांगलं मिसळून घ्यावं.
अक्रोडाचं हे मिश्रण हलक्या हातानं चेहेर्यावर हळूहळू मसाज करत लावावं. अक्रोडचं स्क्रब करताना अक्रोडाचं मिश्रण कपाळ, गाल, नाक, गाल आणि हुनवटीवर नीट लागलं पाहिजे याची काळजी घ्यायला हवी.
दहा ते पंधरा मिनिटं अक्रोडाच्या मिश्रणानं स्क्रब केल्यानंतर चेहेरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवावा. स्क्रब करताना त्वचा घासली जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. पंधरवाड्यातून एकदा असे महिन्यातून केवळ दोनदाच हे स्क्रब केलं तरी त्वचेवर त्याचे अपेक्षित परिणाम दिसतात.