Join us

सौंदर्य जपण्यासाठी जांभूळ खा-प्या अन चेहेऱ्याला लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:38 IST

मधुमेह आणि जांभूळ हे समीकरण खूप जूनं आहे. पण फक्त जांभळाचा उपयोग मधुमेह रोखण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठीच होतो असं नाही. तर सौंदर्य जपण्यासाठी आणि वृध्दीसाठीही जांभूळ हे फळ खूप प्रभावी आणि परिणामकारक मानलं जातं.सौंदर्य उपचारात मुरुम पुटकुळ्या, काळे डाग, अपचानं निर्माण होणाऱ्या सौंदर्य समस्या या सर्वांवर जांभळाचा उपयोग परिणामकारक मानला जातो . याकामी जांभळाच्या बियांचा देखील उपयोग होतो.

ठळक मुद्देमुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी जांभळाच्या बियांचा उपयोग प्रभावी मानला जातो. त्यासाठी जांभळाच्या बिया फेकून न देता त्या धूवून , थोड्या वाळवून, त्या मिक्सरमधे बारीक करुन त्याची पावडर करुन घ्यावी. तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठीही जांभळाचा उपयोग होतो. कारण जांभळात चेहेऱ्याचा तेलकटपणा कमी करणारा , नियंत्रित करणारा अ‍ॅस्ट्रिजेण्ट हा घटक असतो.मुरुम , पुटकुळ्या निघून गेल्यानंतर चेहेऱ्यावर उरणारे काळे डाग हे नकोसे होतात पण ते जाता जात नाही. हे डाग घालवण्यासाठी, दिसेनासे करण्यासाठी जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.

जून महिना  सुरु व्हायच्या आतच बाजारात जांभळं दिसायला लागतात. आंबट-गोड-तुरट चवीच्या जांभळांना इंडियन ब्लॅक बेरी असं म्हणतात. जांभळांचा हंगाम हा फार कमी दिवसांचा असतो, पण त्याचे उपयोग पाहाता जांभूळ आवर्जून खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ देतात. मधुमेह आणि जांभूळ हे समीकरण खूप जुनं आहे. पण फक्त जांभळाचा उपयोग मधुमेह रोखण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठीच होतो असं नाही. तर सौंदर्य जपण्यासाठी आणि वृध्दीसाठीही जांभूळ हे फळ खूप प्रभावी आणि परिणामकारक मानलं जातं.

सौंदर्य उपचारात मुरुम पुटकुळ्या, काळे डाग, अपचानं निर्माण होणाऱ्या सौंदर्य समस्या या सर्वांवर जांभळाचा उपयोग परिणामकारक मानला जातो . याकामी जांभळाच्या बियांचा देखील उपयोग होतो.

 

जांभूळ आणि सौंदर्योपचार

  1. मुरुम- पुटकुळ्याघालवण्यासाठी जांभळाच्या बियांचा उपयोग प्रभावी मानला जातो. त्यासाठी जांभळाच्या बिया फेकून न देता त्या धूवून , थोड्या वाळवून, त्या मिक्सरमधे बारीक करुन त्याची पावडर करुन घ्यावी. ही पावडर गाईच्या दूधात भिजवावी. ती नीट एकत्र करुन जिथे मूरुम पूटकूळ्या आहेत तिथे झोपण्यापूर्वी लावावी. सकाळी उठल्यावर चेहेरा धुवून टाकावा. अर्थात एका रात्रीत त्याचा परिणाम दिसत नाही. नियमित वापर केल्याने काही काळात हा परिणाम दिसतो . याच समस्येवर जांभळाचा दूसऱ्या पध्दतीनेही उपाय करता येतो. त्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर, थोडी संत्रा पावडर , बदाम तेल , थोडं मसूर पीठ, आणि गूलाब जल एकत्र करावं. ही पेस्ट संपूर्ण चेहेऱ्याला फेसपॅकसारखी लावावी. पंधरा मिनिटांनी चेहेरा पाण्यानं धुवावा.
  2.  तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठीही जांभळाचा उपयोग होतो. कारण जांभळात चेहेऱ्याचा तेलकटपणा कमी करणारा , नियंत्रित करणारा अ‍ॅस्ट्रिजेण्ट हा घटक असतो. त्यासाठी जांभळाच्या थोडा गर, जव पीठ, आवळ्याचा रस आणि थोडं गुलाब पाणी घ्यावं. हा लेप चेहेऱ्यास लावावा. तो चांगला कोरडा होवू द्यावा आणि मग पाण्यानं धुवावा. या उपायानं तैल ग्रंथीतून तेल स्त्रवण्याचं प्रमाण नियंत्रित होतं.

3.  मुरुम , पुटकुळ्या निघून गेल्यानंतर चेहेऱ्यावर उरणारे काळे डाग हे नकोसे होतात पण ते जाता जात नाही. हे डाग घालवण्यासाठी, दिसेनासे करण्यासाठी जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. यासाठी जांभळाच्या बियांची पावडर, थोडी लिंबाची पावडर आणि थोडं बेसन पीठ घ्यावं. त्यात बदामाच्या तेलाचे काही थेंब आणि थोडं गुलाब पाणी घालावं. हा लेप चेहेऱ्यावर लावावा. कोरडा झाल्यावर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा. चेहेऱ्यावरील काळे डाग पूर्णपणे जाण्यासाठी किमान एक महिना हा उपाय करावा.

4.  टसटशीत/ फुगीर दिसणाऱ्या हिरड्या सौंदर्यास बाधा आणतात. यासाठी जांभळाच्या पानांची वाळवून आणि भाजून केलेली राख आणि बदामाच्या टरफलाची पावडर समप्रमाणात घेऊन तयार होणारं मंजन हिरड्यांचा टसटशीतपणा घालवतो, हिरड्यांमधला संसर्ग बरा करतं, दात मजबूत करतो तसेच मुखदुर्गधी घालवतो.

5. जांभळाचा ज्यूस किंवा जांभळाचा गर थोड्या दह्यात घालून खाल्ल्यास पचनासंबंधीचे विकार दूर होतात.

6.  जांभळात मोठ्या प्रमाणात लोह असतं. त्याचा उपयोग रक्त शुध्दीकरणासाठी होतो. परिणामी त्वचा निरोगी होऊन सौंदर्य वाढतं. शिवाय यातील लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं.

7.  जांभळात असलेल्या लोहामुळे शरीरातील लाल पेशी वाढतात. त्यामुळे जांभूळ खाणं, जांभळाचा रस घेणं हा अ‍ॅनेमियावरील उत्तम उपाय आहे. तसेच शरीरातील थकवाही जांभळाच्या सेवनानं कमी होतो.

8. जांभळामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच जांभळात मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असल्यानं हदयाचं आरोग्यही जपलं जातं. म्हणूनच आरोग्य तज्ज्ञ , आहार तज्ज्ञ आणि सौंदर्य तज्ज्ञही जांभळाचा हंगाम संपेपर्यंत रोज जांभूळ आपल्या आहारात असण्याचा सल्ला देतात.