केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या असून अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच ही समस्या सतावते. केस गळण्यामागे असंख्य कारणे असतात, या कारणांचा वेळीच शोध घेतला नाही आणि त्यावर उपाय केले नाहीत तर केस गळण्याची समस्या वाढत जाते. प्रदूषण, केमिकल्स असलेली उत्पादने, अन्नातून पुरेसे पोषण न होणे यांसारख्या समस्यांमुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. केस एकदा गळायला लागले की ते दिवसेंदिवस जास्तच गळतात (Easy Ayurvedic Remedy to reduce hair fall).
त्यामुळे केस पातळ होणे, टक्कल दिसणे, कंगवा केसांत घातला की केस हातात येणे यांसारख्या समस्या सुरू होतात. पण ही केसगळती वेळीच थांबवायची असेल तर त्यासाठी काही उपाय आवर्जून करायला हवेत. केसांना वरच्या बाजुने काही लावण्यापेक्षा केसांचे गळणे कमी होण्यासाठी पोटातून काही घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यासाठीच १ सोपा उपाय सांगतात. तो उपाय कोणता आणि कसा करायचा पाहूया...
१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व असलेल्या ३ गोष्टी लागणार आहेत.
२. आवळा, हरडे किंवा हरितकी आणि काळे तीळ यांची पावडर करून ती समान प्रमाणात एकत्र करायची.
३. रोज सकाळ - संध्याकाळ ही पावडर १ चमचा घ्यायची, त्यात खडीसाखर घालायची आणि पाणी घालून हे पाणी प्यायचे.
४. हा प्रयोग रिकाम्या पोटी करायचा आणि ते पाणी घेतल्यावर किमान १५ मिनिटे बाकी काहीही खायचे किंवा प्यायचे नाही.
५. किमान १ ते ३ महिने हा प्रयोग नक्की करून पाहा. त्यामुळे केस गळती बऱ्याच प्रमाणात कमी होऊन केस वाढण्यास याचा चांगला उपयोग होईल.