Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिपस्टिक लावली की, ओठ कोरडे होतात, भेगाही पडतात? 10 सोप्या गोष्टी, ओठ सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 14:44 IST

लिपस्टिक वापरल्यानेओठ खराब होण्याचा अनुभव अनेकांना येतो. ओठांना लिपस्टिक लावली, की ओठाची समस्या झाकली जाईल असा समज करुन याकडे दुर्लक्ष करण्याची सवयही अनेकांना असते.. पण लिपस्टिक लावून खराब ओठ झाकले जात नाही उलट ते आणखी खराब होतात. पण सोप्या उपायांनी लिपस्टिकमुळे होणारं ओठांच्या सौंदर्याचं नुकसान नक्कीच टाळता येतं.

ठळक मुद्देमॅट लिपस्टिक लावल्यानंतर छान दिसते, मात्र ती लावताना काळजी घेणं आवश्यक.चेहऱ्याच्या त्वचेला जशी स्क्रबची आवश्यकता असते तीच गरज ओठांच्या त्वचेचीही असते.रोज लिपस्टिक लावायची असेल तर रात्री झोपताना एक नियम पाळणं आवश्यक.

हिवाळ्यात ओठ फाटतात, कोरडे होतात, ओठ पांढरे पडतात, ओठांच्या त्वचेचे पोपडे निघतात, ओठांना चिरा पडून रक्त यायला लागतं. या समस्यांमुळे ओठांचं सौंदर्य बिघडतं. याकडे दुर्लक्ष केल्यास ओठांची त्वचा खराब होते, ओठ काळे पडतात.  पण ओठ फाटण्याची समस्या  केवळ हिवाळ्यात उद्भवते असं नाही तर लिपस्टिक वापरल्यानेही ओठ खराब होण्याचा अनुभव अनेकांना येतो. ओठांना लिपस्टिक लावली, की ओठाची समस्या झाकली जाईल  असा समज करुन याकडे दुर्लक्ष करण्याची सवयही अनेकांना असते.. पण लिपस्टिक लावून खराब ओठ झाकले  जात  नाही उलट ते आणखी खराब होतात. असे ओठ लिपस्टिक लावूनही चांगले दिसत नाही.   लिपस्टिक लावताना काळजी घेणं, रोजच्या दिनचर्येमधे ओठांची काळजी घेण्यासाठी काही मिनिटं अवश्य काढणं, यासारख्या सोप्या उपायांनी लिपस्टिकमुळे होणारं ओठांच्या सौंदर्याचं नुकसान टाळता येतं. 

Image: Google

लिपस्टिक लावल्याने ओठ फाटू नये म्हणून..

1. ओठांची त्वचा अगदी नाजूक असते. ही त्वचा जपायची असेल तर ओठांवर जे सौंदर्य उत्पादन आपण वापरणार आहोत ते चांगल्याच दर्जाचं हवं. म्हणून लिपस्टिक निवडताना कमी किमतीची म्हणून घेतली लगेच असं करु नये. कमी किमतींच्या लिपस्टिकचा दर्जा चांगला नसतो. लिपस्टिक घेताना ओठांचं सौंदर्य तर वाढवायचं पण ओठांची त्वचाही जपायची हे डोक्यात ठेऊन चांगल्या ब्रॅण्डची लिपस्टिक घ्यावी.  प्रत्येक लिपस्टिकमधे मेण, तेल आणि रंग ( पिग्मेंटस) हे प्रमुख घटक असतात. पण याच घटकांचं प्रमाण कमी जास्त करुन मॅट लिपस्टिक आणि ग्लाॅसी लिपस्टिक हे प्रकार तयार केले जातात. मॅट लिपस्टिक वापरल्यानं अनेकांना ओठ खराब झाल्याचं आढळतं. याचां कारण मॅट लिपस्टिकमधे मेण आणि रंग अधिक वापरलेला असतो आणि तेलाचं प्रमाण कमी असतं. यामुळे मॅट लिपस्टिक लावली रंग गडद दिसतो आणि ती जास्त वेळ टिकते.  मॅट लिपस्टिकमधे तेलाचं प्रमाण कमी असल्यानं ओठ कोरडे होणं, फाटणं, खराब होणं या समस्या जाणवतात. मॅट लिपस्टिक लावण्याचे तोटे लक्षात येऊनही ही लिपस्टिक कोणतीही काळजी न घेता वापरणं सुरुच ठेवलं तर ओठ प्लेन आणि मऊ राहात नाही. ओठांवर रेषा पडतात.  त्यामुळे मॅट लिपस्टिकमुळे आपले ओठ फाटतात हे लक्षात आलं तर लिपस्टिकचा प्रकार तरी बदलावा किंवा मॅट लिपस्टिक वापरताना ओठंची काय काळजी घ्यावी हे तरी समजून घ्यावं. 

Image: Google

2.  आपले ओठ खरबरीत असतील, ओठांना पोपडे पडून जखम झाली असेल आणि अशा परिस्थितीत जर मॅट लिपस्टिक लावली तर ओठांना असलेल्या फटींधून ओठांच्या त्वचेच्या आत शिरते आणि ओठांची त्वचा खराब होते. हे होऊ नये म्हणून ओठांना मधून मधून एक्सफोलिएट करणं आवश्यक असतं. त्वचा खोलतून स्वच्छ होण्यासाठी एक्सफोलिएशन जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ते ओठांसाठीही महत्त्वाचं असतं. लिपस्टिक वापरत असा किंवा नसा आठवड्यातून दोन वेळा ओठ स्क्रब करावेत. यासाठी खास लिप स्क्रबर मिळतं ते वापरावं. किंवा घरच्या घरी एक चमचा खोबऱ्याचं तेले आणि एक चमचा साखर घ्यावी. ते चांगलं मिसळून 2-3 मिनिट या मिश्रणानी ओठांवर हलका मसाज करावा. यामुळे ओठांवरील पापुद्रे, खडबडीतपणा निघून जातो. ओठ मऊ होतात. तसेच चेहरा धुतल्यानंतर चेहरा  सुती रुमालानं पुसताना हा रुमाल ओठांवरुनही फिरवावा. यामुळेही ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. 

3.  लिपस्टिक मॅट असो की ग्लाॅसी.. ती लावण्याआधी ओठांन लिप बाम लावावा. लिप बाममुळे ओठांची त्वचा ओलसर राहाते. त्यामुळे लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे पडून फाटत नाही. शिवाय लिप बाम लिपस्टिक लावण्याआधी लावला तर ओठ चमकतात. शिवाय लिप बाम लावल्यानेही ओठांचं सौंदर्य वाढतं. लिप बामच्या इफेक्टमुळे लिपस्टिकचीही कधी कधी गरज पडत नाही. 

Image: Google

4. ओठांची त्वचा नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे ओठांची त्वचा जपावी लागते. ओठांवर दिवसभरात मधून मधून माॅश्चरायझरचं बोट फिरवावं लागतं. तसेच ओठ एक्सफोलिएट केल्यानंतर लगेच ओठांना माॅश्चरायझर लावावं. तसेच दिवसातून एकदा विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी नैसर्गिक आर्गन तेल किंवा खोबऱ्याचं तेल लावावं. तसेच ह्यालूरोनिक ॲसिड आणि ग्लिसरीन हे घटक असलेले लिप बाम लावू  नये. कारण या घटकांनी ओठ कोरडे पडतात. हे घटक ओठांच्या त्वचेतील ओलावा शोषून् घेतात आणि ओठ कोरडे पडतात. त्यामुळे ओठांना सारखं माॅश्चरायझर लावावं आणि लिप बाम घेतांनाही तो चांगल्या गुणवत्तेचा असला तरच तो लावून ओठांचा फायदा होतो. 

5.  लिपस्टिक लावताना विशेषत: मॅट लिपस्टिक लावताना लायनरचा उपयोग करावा. लायनर लावल्याने  लिपस्टिक जशी नीट लावता  येते, ती पसरुन विचित्र  दिसत नाही . लायनरचा फायदा इतकाच नाही.  लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लायनर लावलं तर लायनरमुळे ओठांच्या कडांवर लिपस्टिकचा थर साचत नाही. आणि ओठांच्या कडा यामुळे सुकत, फाटत नाही. 

Image: Google

6. दिवसभर ओठांवर लिपस्टिक लावून ठेवू नये. गरज नसेल तेव्हा ओठांवरची लिपस्टिक काढून टाकायला हवी. कारण ओठांवर लिपस्टिक जास्त वेळ राहिल्यास ओठांच्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो. लिपस्टिक रोज आणि दिवसभर ओठांवर ठेवत असाल तर ओठ खराब होणार हे नक्की.

7. रोज लिपस्टिक लावण्याची सवय असेल तर रोज रात्री ओठांचं नैसर्गिक सौंदर्य, ओठांचा नैसर्गिक ओलावा आणि कोमलपणा जपण्यासाठी एक नियम पाळावा. रोज रात्री झोपण्याआधी ओठांना थोडी साय चोळावी आणि किमान एक तासभर ती तशीच राहू द्यावी. झोपण्याआधी ओठांवरची साय काढून टाकावी. यामुळे ओठ मऊ आणि गुलाबी होतात. 

Image: Google

8. रात्री झोपण्याआधी ओठांना शुध्द बदामाचं तेल आणि थोडं ऑर्गन तेल एकत्र करुन लावावं. ऑर्गन तेलात अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतं. हा घटक क्रीम,लोशन, फेस पॅक आणि केसांच्या तेलांमधेही करतात. या घटकाचा उपयोग ओठांची त्वचा लवचिक आणि मऊ राहाण्यासाठी होतो. तसेच केवळ ऑर्गन तेलाचे थेंब घेऊन ओठांना त्याचा रोज रात्री मसाज केला तरी ओठांची त्वचा चांगली राहाते. ओठांना केवळ खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब घेऊन त्याने मसाज  केला तर ओठांमधलं माॅश्चरायझर टिकून् राहातं.

Image: Google

9. ओठांवरची लिपस्टिक  काढताना क्लीजिंग मिल्क वापरावं.

10. चेहरा फेसवाॅश किंवा साबणानं धुतांना चुकूनही ते ओठांना लावू नये. ओठांची त्वचा पातळ आणि संवेदनशील असल्याने फेसवाॅश आणि साबणातील घटक ओठांवर वाईट परिणाम करतात आणि ओठ काळे आणि कोरडे पडतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सओठांची काळजी