Join us

घरीच करा पार्लरसारखे क्लिनअप, फक्त 3 गोष्टी आणि सणावाराला तुम्ही दिसाल सुंदर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 18:42 IST

 त्वचा खराब दिसायला लागली की पार्लरमधे जाऊन क्लिनअप करण्याचे वेध लागतात. पण जिथे वेळेचाच प्रश्न आहे तिथे पार्लरमधे जाऊन क्लिनअप करणार कधी. पण मग खराब झालेल्या त्वचेसाठी करायचं काय? असा प्रश्न अनेकींना पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे घरच्याघरी क्लिनअप. हे अगदीच सोपं आहे.

ठळक मुद्देगुलाबपाण्याचा उपयोग त्वचेसाठी करताना इतर काही घटक न घालता केला तरी त्याचे फायदे उत्तम दिसतात.गुलाब पाण्यानं चेहेर्‍याचं टोनिंग केल्यानंतर एक चमचाभर मध घेऊन ते चेहेर्‍याला गोलाकार मसाज करत लावावं.त्वचा घट्ट, निरोगी आणि मऊसर ठेवण्यासाठी क्लिनअपच्या शेवटी चेहेर्‍याला नैसर्गिक तेल लावणं आवश्यक आहे.

 सध्या वेळ कमी आणि कामं जास्त अशी परिस्थिती असते. अर्थात हे फक्त नोकरी करणार्‍या स्त्रियांच्याच बाबतीत होतं असं नाही तर गृहिणी असलेल्या महिलांनाही कामांमुळे वेळच पुरत नाही. जेव्हा वेळ आणि कामं यांचा मेळ जमवण्याचा प्रश्न असतो तेव्हा सर्वात आधी स्वत:साठीच्या वेळेला कात्री लावली जाते. मग व्यायामापासून ते सौंदर्याची काळजी घेण्यापर्यंत महिला अनेक बाबतीत स्वत:कडे दुर्लक्ष करतात. पण मग त्याचा परिणाम दिसण्यावर आणि त्वचा खराब होण्यावर होतो. त्वचा खराब दिसायला लागली की पार्लरमधे जाऊन क्लिनअप करण्याचे वेध लागतात. पण जिथे वेळेचाच प्रश्न आहे तिथे पार्लरमधे जाऊन क्लिनअप करणार कधी. पण मग खराब झालेल्या त्वचेसाठी करायचं काय? असा प्रश्न अनेकींना पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे घरच्याघरी क्लिनअप.

चेहेरा क्लिनअप करण्याची इच्छा आहे आणि त्वचेची ती गरजही असेल तर मग त्याकडे दुर्लक्ष न करता घरच्याघरी क्लिनअप करण्याचा मार्ग आहे. तीन गोष्टींचा वापर करुन चेहेरा पार्लरसारखा क्लिनअप होऊन चमकतो. अर्थात या गोष्टी घरात उपलब्ध असणं अवघड आहे असं अजिबात नाही. कारण गुलाबपाणी, मध आणि नैसर्गिक तेल हे तीन घटक सहजच घरात उपलब्ध होवू शकतात. या तीन घटकांचा वापर करुन क्लिनअपचा इफेक्ट कसा मिळेल असा प्रश्न पडला असेल तर त्यावर उत्तर म्हणजे यातले सौंदर्यवर्धक गुणधर्म.

छायाचित्र- गुगल

गुलाब पाणी

त्वचा जपण्यासाठी, ती उत्तम करण्यासाठी गुलाब पाण्याला खूप महत्त्व आहे. गुलाबपाण्याचा उपयोग त्वचेसाठी करताना इतर काही घटक न घालता केला तरी त्याचे फायदे उत्तम दिसतात. त्वचा ओलसर राखण्यासाठी आणि त्वचेची रंध्र खोलात जाऊन स्वच्छ करण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग होतो.गुलाब पाण्यात जीवाणुविरोधक गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे त्वचेवरची सूज आणि दाह गुलाब पाण्यामुळे कमी होतो. गुलाब पाण्यात अँण्टिऑक्सिडण्टस गुणधर्म असतात. यामुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेवरील सुरकुत्याही कमी होतात. गुलाब पाणी हे पूर्णपणे नैसर्गिक सौंदर्य उत्पादन आहे , त्यामुळे नैसर्गिकपणे सौंदर्य वृध्दीसाठी गुलाब पाण्याचा उपयोग आधी केला जातो. टोनर म्हणून गुलाब पाणी वापरलं जातं. चेहेर्‍यावर गुलाब पाणी कापसाच्या बोळ्यानं किंवा हातानं पसरुन लावावं. चेहेरा क्लिनअप करण्यासाठी आधी टोनिंग करणं आवश्यक असतं. त्यासाठी गुलाब पाणी वापरावं.

छायाचित्र- गुगल

मध

मधात त्वचेला ओलसर ठेवणारे ,मॉश्चरायजिंग घटक मुबलक असतात. त्वचेचं वेगवेगळ्या हानिकारकर जिवाणुंपासून संरक्षण करायचं असेल तर मध हे उत्तम आहे. मधाचा उपयोग हा मेस मास्क आणि स्क्रबसाठी प्रामुख्यानं केला जातो. मधामुळे चेहेर्‍यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात आणि चेहेर्‍यावर त्याचे डागही राहात नाही. गुलाब पाण्यानं चेहेर्‍याचं टोनिंग केल्यानंतर एक चमचाभर मध घेऊन ते चेहेर्‍याला गोलाकार मसाज करत लावावं. एक ते दोन मिनिटं मधानं मसाज करावा. मसाज झाल्यानंतर चेहेर्‍यावर थोडा वेळ ते राहू द्यावं आणि मग चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. त्यानंतर मधाचा उपयोग करुन नैसर्गिक पध्दतीचं फेस स्क्रब तयार करावं. त्यासाठी बारीक केलेले ओटस किंवा ओटस पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि मध एकत्र करुन त्यानं चेहेर्‍याला हलक्या हातानं स्क्रब करावं. एक पाच ते सात मिनिटं स्क्रब झाल्यावर ते थोडावेळ तसंच ठेवावं आणि मग चेहेरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवावा. या स्क्रबमुळे त्वचा ओलसर होते आणि चमकदारही होते.

छायाचित्र- गुगल

नैसगिक तेल

चेहेर्‍याचा मसाज आणि स्क्रब झाल्यानंतर त्वचेला नैसर्गिक तेल लावणं गरजेचं असतं. त्वचा घट्ट, निरोगी आणि मऊसर ठेवण्यासाठी क्लिनअपच्या शेवटी चेहेर्‍याला नैसर्गिक तेल लावणं आवश्यक आहे. ऑइलिंगसाठी थोडं केशर आणि खोबर्‍याचं तेल घ्यावं. ते बोटानं चांगलं हलवून घ्यावं. तेल थोडं गरम करावं आणि हे तेल चेहेर्‍यावर गोलाकार मसाज करत लावावं. हा मसाज किमान चार ते पाच मिनिटं करावा. ऑइलिंग केल्यावर चेहेरा पाण्यानं धुवू नये. मसाज नंतर एक दोन मिनटं थांबावं आणि मग चेहेरा रुमाल किंवा पेपर नॅपकिन हळुवार पुसून घ्यावा. यामुळे चेहेर्‍यावर चमक येते आणि चेहेरा मऊ होतो.बघितलं, घरच्याघरी क्लिनअप करणं किती सोपं आहे ते.