Join us  

चाँदसा खिलेगा चेहरा... फक्त दिवाळीत मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी ४ गोष्टी करायला विसरु नका....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2021 5:12 PM

चेहरा धुतला की मेकअप सुरू..... असं करत असाल तर थांबा. मेकअप करण्यापुर्वी या ३ गोष्टी न विसरता करा. यामुळे तुमचा मेकअप अधिक खुलेल आणि नॅचरल वाटेल. 

ठळक मुद्देमेकअप करूनही चेहरा निस्तेजच दिसतो. म्हणून मेकअप करण्यापुर्वी थोडी काळजी घ्या आणि योग्य सुरुवात करा.

दिवाळीचा मेकअप करायचा म्हणजे आपण खास वेळ काढतो. शांततेत मेकअप करतो. कारण मागच्या काही दिवसांपासून आपली यासाठीच तर तयारी सुरू असते. दिवाळीत अगदी लक्ष्मीपुजनाची वेळ येईपर्यंत आपली कामाची गडबड थांबत नाही. काही ना काही काम राहिलेलेच असते. या सगळ्या गडबडीचा, धावपळीचा ताण आपल्यावर येतो आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे मग मेकअप करूनही चेहरा निस्तेजच दिसतो. यंदाच्या दिवाळीत असे काही आपल्यासोबत होऊ नये, म्हणून मेकअप करण्यापुर्वी थोडी काळजी घ्या आणि योग्य सुरुवात करा.

 

मेकअप करताना या ३ गोष्टींची काळजी घ्या.....१. कॉफीचा वापर करा आता मेकअप करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवावा, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण कॉफीचं काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मेकअप करण्यापुर्वी जेव्हा चेहरा धुवाल तेव्हा कॉफी वापरा. दिवाळी म्हणजे थंडी. थंडीच्या दिवसांत चेहऱ्याला अधिक प्रमाणात साबण, फेसवॉश लावणे टाळावे. त्यामुळे मेकअप करण्यापुर्वी दोन टी स्पून कॉफी पावडर घ्या. यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा आणि थोडे डाळीचे पीठ टाका. एक चमचा दूध टाकून चांगली पेस्ट बनवा. या मिश्रणाने तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. कॉफीमध्ये असणारे घटक आपल्या चेहऱ्याला एक वेगळाच तजेलदारपणा देतात. 

 

२. बर्फाची जादू पहाचेहरा स्वच्छ धुवून झाला की त्यानंतर तो कोरडा करा. चेहऱ्यावरचे पाणी अलगद टिपून घ्या. खूप खसखसून चेहरा पुसू नका. चेहरा ओलसर असतानाच त्यावरून बर्फाचा तुकडा फिरवा. २० ते २५ सेकंद बर्फाने चेहऱ्याची मालिश करा. त्यानंतर पुन्हा चेहरा पुसून घ्या. आता या दोन्ही स्टेप पार पडल्यानंतर चेहऱ्याला टोनर लावायला विसरू नका. एका कापसाच्या बोळ्यावर टोनर घ्या आणि ते नुसतं टच- टच करून चेहऱ्याला लावा.

 

३. त्वचा मॉईश्चराईज करादिवाळीच्या दिवसात थंडी असते. त्यामुळे त्वचा कोरडी होणं सुरु होतं. चेहरा धुणे आणि त्यानंतर बर्फाची मालिश या दोन गोष्टी झाल्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करण्याची खूप जास्त गरज असते. त्यामुळे चेहऱ्याचं टोनिंग झालं की व्यवस्थित मॉईश्चराईज करा. यासाठी ऑईल बेस माॅईश्चरायझर वापरू नका. वॉटरबेस मॉईश्चरायझरची निवड करा. चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावलं की किमान अर्धा मिनिट तरी हळूवार मसाज करा आणि त्यानंतर प्रायमर लावून मेकअपची सुरुवात करा. 

 

४. प्रायमरचा योग्य वापर मेकअपचा सगळ्यात मुख्य भाग म्हणजे योग्य पद्धतीने प्रायमर लावणे. प्रायमर लावल्यामुळे त्वचेवरची जी छिद्रे किंवा पोअर्स असतात, तिचा आकार कमी होऊन ती झाकली जातात आणि चेहऱ्यावर मेकअप चांगल्या पद्धतीने सेट होतो. प्रायमरमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि चेहऱ्यावरचे काळे डाग, व्रण झाकले जातात. प्रायमरमुळे त्वचेचा पोत एकसारखा दिसू लागतो. यालाच इव्हन टोन स्कीन म्हणतात. कपाळ, गाल, हनुवटी अशी सगळीच त्वचा एकसारखी दिसू लागते. मेकअप केल्यावर अनेक जणींचा चेहरा भुरकट दिसू लागतो. पण योग्य पद्धतीने प्रायमर लावले तर असे होत नाही. म्हणून मेकअप करण्यापुर्वी प्रायमर लावायला विसरु नका. 

 

या गोष्टी विसरू नका- हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चराइज करून मृदू बनविणे खूप गरजेचे आहे. - वॉटर बेस्ड किंवा ऑईल बेस्ड मेकअप प्रोडक्टचा वापर करा.- पावडर प्रकारातले किंवा ऑईल फ्री मेकअप प्रोडक्ट चुकूनही वापरू नका. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीमेकअप टिप्स