प्रचंड धावपळीच्या काळात स्वत:साठी थांबायला कोणालाच वेळ नाही. सगळं एकदम पटकन व्हायला हवं अशी अपेक्षा असते. काही केलं की त्याचे परिणामही इन्स्टंटच हवे असतात. त्वचेच्या बाबतही असंच होतं. त्वचा ही पटकन उजळेल , चमकेल असं काय आहे, हे शोधण्याचा प्रत्येकीचा अट्टाहास असतो. अशा गडबडीत खरंतर अनेकदा नुकसान होतं. पण मुळात घाई आणि जलद परिणामांची अपेक्षा हे गणित साधणारं योग्य उत्पादन मिळालं तर मात्र फायदा होतो. आणि 'अरे ही एवढी सोपी गोष्ट आहे' याची जाणीव होऊन दिलासा मिळतो. फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन यातलाच एक भाग.
त्वचा तरुण आणि चमकदार दिसण्यासाठी महिलांमधे फेस शीट मास्कचा उपयोग वाढला आहे. हे फेस शीट मास्क चेहेऱ्याच्या आकाराचं असतं. या मास्कला सीरम असतं. हे शीट मास्क जेव्हा आपण चेहेऱ्याला लावतो तेव्हा ते सीरमही लागतं आणि त्याचा परिणाम होऊन चेहेऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार होते. फेस शीट मास्क हा ब्यूटी ट्रेण्ड कोरिया देशातून आला आहे. पण आज जगभरातील महिला या फेस शीट मास्कचा उपयोग करत आहे. आपल्याकडेही फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन लोकप्रिय होऊ लागलं आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोण , आलिया भट अशा अनेकजणींच्या माध्यमातून हा ट्रेण्ड आपल्याकडे सामान्या महिला आणि तरुणींमधेही रुळू लागला आहे. हा फेस शीट मास्क एकाच प्रकारच नसतो. त्वचेचे जसे कोरडी, तेलकट, मिश्र, संवेदनशील असे प्रकार असतात त्यानुसार हे फेस शीट मास्क बाजारात मिळतात. आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे , हे ओळखून त्यानुसार योग्य ते फेस शीट मास्क स्वत:साठी निवडणं गरजेचं असतं.
फेस शीट मास्क आपल्या चेहेऱ्याला कमी वेळात चमकदार आणि उजळ बनवतो. हे फेस शीट मास्क चेहेऱ्या च्या आकाराचं बनवलेलं असतं. डोळे, नाक, ओठ यानूसार ते कापलेलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेस शीट मास्कला सीरम लावलेलं असतं. आणि म्हणूनच फेस शीट मास्क काढल्यानंतर चेहेरा धुण्याची गरज पडत नाही. शीट काढल्यानंतर चेहेऱ्याला लागलेल्या सीरमद्वारे मसज करायचा असतो. हे फेस शीट मास्क वापरल्यानं त्वचा ओलसर होते परिणामी ती चमकायला लागते.
तात्काळ फायदा हा फेस शीट मास्कचं वैशिष्ट्य असलं तरी त्याचा परिणाम तात्कालिक राहात नाही. या फेस शीट मास्कद्वारे त्वचेचं पोषण होतं. चेहेरा चमकदार होतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चेहेऱ्यावरचा थकवा दूर होतो. त्वचा खोलवर जावून स्वच्छ करण्याची क्षमता या फेस शीट मास्क मधे असते. इतर प्रकारच्या फेशिअल मास्क शीटच्या तूलनेत फेस शीट मास्क चा उपयोग जास्त परिणामकारक असतो. हे फेस शीट मास्क वापरण्यास अत्यंत सोपा असतो हे खरं फक्त आपल्या त्वचेचा प्रकार बघून फेस शीट मास्क निवडायला हवं.तेलकट त्वचेसाठीतेलकट त्वचेसाठी क्ले शीट मास्क मिळतं. तसेच चारकोल शीट मास्कचा वापरही करता येतो. चारकोल मास्कमधे त्वचा डिटॉक्स करणारे अॅक्टिवेटेड चारकोल असतात. या घटकाचा तेलकट त्वचेसाठी खूप उपयोग होतो. तर क्ले मास्क चेहेऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ करतो. चेहेऱ्याच्या टी झोनवर निर्माण होणारं तेल या फेस शीट मास्कमुळे जातं.